नांदगाव शिंगवे (जिल्हा नगर) येथील हनुमान मंदिरात अज्ञातांनी चटया जाळल्या !
|
|
नगर – नांदगाव शिंगवे (जिल्हा नगर) येथील हनुमान मंदिरातून १३ मार्च या दिवशी दुपारी ४ वाजता धूर येत होता. ही गोष्ट स्थानिक ग्रामपंचायत कर्मचारी श्री. प्रभाकर भागवत यांच्या लक्षात आली. त्यांनी मंदिरात जाऊन पाहिले, तर काही अज्ञातांनी मंदिरात चटया जाळल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चटयांना लागलेल्या आगीचे प्रमाण इतके होते की, मंदिरात भिंतीला लावलेली श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांची चित्रेही अर्धवट जळली अन् मंदिरातील मूर्तीपासून पूर्वेकडील बाजूच्या भिंतीचा रंग पूर्णपणे गेला, तसेच हनुमानाची मूर्ती आगीमुळे काळी पडली. स्थानिकांनी आग विझवली. या घटनेमुळे ग्रामस्थांनी संतप्त होऊन ‘आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत’, अशी तक्रार अज्ञाताच्या विरोधात पोलिसांकडे दिली आहे.
ग्रामस्थांच्या सांगितलेल्या माहितीनुसार मंदिरात विटंबना, तोडफोड असे प्रकार अधिक प्रमाणात घडत आहेत. मागील आठवड्यात येथील सावता महाराज मंदिरासमोरील तुळशी वृंदावन अज्ञातांनी पाडले होते, तसेच मंदिरावरील भगवे झेंडे जाळणे, मंदिरातील घंटा चोरीला जाणे, मंदिरात गुटखा खाऊन थुंकणे असे प्रकार वाढले आहेत. या संदर्भात पोलीस प्रशासनास कळवले आहे.