केरळमध्ये ‘नमः शिवाय’ ऑनलाईन सामूहिक नामजप पार पडला भावपूर्ण वातावरणात !
कोची (केरळ) – येथे महाशिवरात्रीच्या पावन दिवशी, म्हणजेच ११ मार्च या दिवशी ‘नमः शिवाय’ हा सामूहिक नामजप हिंदी आणि मल्याळम् भाषेत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. या दोन्ही भाषांतील कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हिंदी भाषेतील कार्यक्रमाच्या प्रारंभी महाशिवरात्रीविषयीची माहिती आणि भावार्चना घेण्यात आली. सनातनच्या साधिका सौ. अवनी लुकतुके आणि श्रीमती नीता सुखठणकर यांनी विषय मांडला. अशाच प्रकारे मल्याळम् भाषेतील साूमहिक नामजपाच्या प्रारंभी सनातनच्या साधिका सौ. स्मिता सिजू यांनी भावार्चना केली. दोन्ही कार्यक्रमांमध्ये सर्वांनी भावार्चनेनंतर नामजप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मेघना सिजू यांनी केले. या दोन्ही कार्यक्रमांचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.
क्षणचित्रे
१. एका जिज्ञासूंनी नामजपाच्या वेळी मुलांनाही नामजप करण्यास बसवले आणि त्यांच्याकडून नामजप करवून घेतला.
२. जपाच्या वेळी अनेकांना चांगले वाटण्यासह काहींना नामजपाच्या वेळी मन शांत होऊन प्रसन्न वाटले.
जिज्ञासूंना आलेल्या अनुभूती
१. श्रीमती श्यामला यांना ‘प्रत्यक्ष भगवान शिव समोर उभे आहेत’, असे वाटले. त्यांचे भस्म विभूषित रूप दिसले.
२. श्रीमती राधा दिलीप यांना नामजप करतांना त्यांनी ‘शिवाला बिल्वपत्र अर्पण करत आहोत’, असा भाव ठेवल्यावर सूक्ष्म गंध आला आणि देवाचे रूप डोळ्यांसमोर आले.
३. श्री. सामजित यांना नामजप करतांना आज्ञाचक्राकडे संवेदना जाणवल्या आणि त्या शरिरात जात आहेत, असे वाटले.
४. सौ. सबिता यांना एकाग्रतेने नामजप करतांना देवाचे रूप पूर्ण दिसत होते.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |