आजारी साधिकांची सेवा स्वतःच्या कुटुंबियांप्रमाणे करणारी कु. सिद्धी गावस (वय १९ वर्षे) !
‘श्रीमती रजनी नगरकर यांनी लिहिलेल्या या लेखामुळे ‘कु. सिद्धी गावससारख्या मुली आश्रमात आहेत’, हे वाचून मला आनंद झाला. रुग्णांची सेवा करणार्या सर्वच साधकांनी कु. सिद्धीचा आदर्श ठेवून सेवा केल्यास त्यांचीही साधनेत प्रगती लवकर होईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. प्रेमळपणा
अ. ‘तिला ज्या साधिकेची सेवा मिळेल, तिचा ती अभ्यास करते. नंतर प्रेमाने त्यांना ‘आई, काकू, ताई’, असे संबोधून, ती त्यांची सेवा त्याच भावाने करते. आजारी साधिका कंटाळून एखादी कृती करण्यास नकार देत असेल, तर ती त्या साधिकेला ‘करूया ना आई’, असे प्रेमाने म्हणते. त्यामुळे साधिका लगेच ती कृती करण्यास होकार देेते.
आ. एकदा तिला तीव्र आध्यात्मिक आणि मानसिक त्रास असलेल्या साधिकेची सेवा मिळाली होती. तेव्हा ती त्यांच्याकडून त्यांचे प्रेमाने वैयक्तिक आवरून घेत होती. नंतर त्यांच्याकडून उपाय करवून घेऊन त्यांना प्रसाद आणि महाप्रसाद वेळेवर देऊन त्यांचे सर्व प्रेमाने करत होती. हे करतांना तिला त्रास होत होता, तरी ती तो जाणवून देत नव्हती. तिच्या मनातील वादळ किंवा प्रश्न न दाखवता ती हसतमुखाने आणि शांततेने त्यांची सेवा करत होती.
२. जागरूकता
आमच्या खोलीतील एका वयस्कर आणि आजारी साधिकेची सेवा तिच्याकडे होती. त्यांच्या साहाय्यासाठी तिला रात्री खोलीत झोपावे लागत होते. या लहान वयात मुलांना अतिशय गाढ झोप लागते, तरी ती खोलीतील दुसरे कुणी उठले की, लगेच उठायची आणि ‘ती साधिका उठली नाही ना ?’, हे बघायची. तेव्हा मला तिचे कौतुक आणि आश्चर्य वाटत होते.
३. परिपूर्ण सेवेची तळमळ
एकदा तिच्याकडे स्वागतकक्षाबाहेरील भाग पुसायची सेवा होती. तिने पुसायला प्रारंभ करण्यापूर्वी तेथे बसण्यासाठी असलेला बाक आडवा केला. तिच्या मानाने तो बाक जड होता, तरी तिने तो आडवा केला आणि त्याच्या खालील सर्व धूळ काढली. नंतर ओले कापड आणून तो पूर्ण भाग स्वच्छ केला. त्या सेवेला तिला २० मिनिटांपेक्षा अधिक कालावधी लागला, तरी तिने त्या सेवेचा कंटाळा केला नाही.
४. तत्परता
मला वाटले, ‘स्वागतकक्षाबाहेरील सेवा करून ती दमली असल्याने विश्रांती घेईल’; परंतु ती लगेच वर आली अन् तत्परतेने आजारी साधिकेच्या सेवेला लागली.
५. प्रसादाचे मूल्य
ती आजारी साधकांसाठी केलेले सरबत किंवा काही वेगळे पदार्थ असतील, तर ती प्रथम त्या आजारी साधकाला विचारून भरवते; पण उरलेला पदार्थ ती टाकून देत नाही. ‘तो प्रसाद आहे’, या भावाने ती ग्रहण करते.
६. व्यष्टीचे गांभीर्य
हे सर्व करत असतांना तिला वेळ मिळाला, तर ती सारणी लिखाण, ग्रंथ वाचन, स्वयंसूचनांचे सत्र किंवा नामजप करते. ती वेळ वाया न घालवता, तो वेळ लगेच साधनेला देते.
७. नियोजन कौशल्य
आता तिला आजारी साधिकांची सेवा करण्याचे कौशल्य प्राप्त झाले आहे; म्हणून देवाने तिला नियोजनाची सेवा दिली आहे. ती नियोजन करतांना त्या साधकांचा वेळ, त्यांचे आपल्याला कुठे साहाय्य मिळू शकते, कोणती सेवा कोण अधिक कौशल्याने आणि क्षमतेने करू शकतो, हे अभ्यासपूर्ण बघते.
अशी गुणी साधिका ईश्वरचरणी लवकर जाऊदे आणि तिच्यातील गुण मला आत्मसात करता येऊ देत, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते.’
– श्रीमती रजनी नगरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.७.२०१९)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |