पुणे येथील उड्डाणपुलावरील हिंदी सुविचाराला मनसेने काळे फासले
मराठी भाषेच्या अस्मितेचा विषय असल्याचे प्रतिपादन भविष्यात मराठीला डावलल्यास आंदोलनाची चेतावणी
पुणे, १४ मार्च – येथील कोथरूडमधील कर्वेनगर चौकातील कै. नानासाहेब बराटे उड्डाणपुलावर सुशोभीकरणाच्या नावाखाली हिंदी भाषेत संदेश लिहिण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या या कृतीचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या उड्डाणपुलावरील हिंदी भाषेतील संदेशाला काळे फासून कर्वेनगर येथील स्थानिक महाराष्ट्र सैनिक संतोष वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली तेथे आंदोलन केले. तसेच मनसेच्या वतीने कोथरूड येथील कक्ष कार्यालयाला याविषयी निवेदन देण्यात आले. हिंदीतून सुविचार लिहिण्याच्या सूचना देणार्या संबंधित अधिकार्यावर याविषयी कारवाई करण्याचे आश्वासनही कक्ष अधिकार्यांनी दिले आहे. तसेच ‘भविष्यात जर मराठीला डावलण्यात आले, तर मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी मनसेने दिली आहे.