पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’कडून अटक
|
मुंबई – २५ फेब्रुवारी या दिवशी मध्यरात्री २ वाजता मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ वाहनात स्फोटके सापडली होती. या प्रकरणाचे अन्वेषण ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’ (एन्.आय.ए)कडून चालू आहे. सचिन वाझे यांची १३ मार्च या दिवशी एन्.आय.ए.च्या अधिकार्यांनी १३ घंटे चौकशी करून नंतर त्यांना अटक केली. अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ वाहन उभे करण्यात वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप एन्.आय.ए.ने केला आहे. याच आरोपाखाली वाझे यांना अटक करण्यात आली असून त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवलेले स्कॉर्पिओ वाहन मनसुख हिरेन यांच्या कह्यात होते. त्यामुळे व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हत्या आणि त्यांच्या वाहनाची चोरी ही प्रकरणे एकाच गुन्ह्याचे पैलू असल्याने एन्.आय.ए.ने २ दिवसांपूर्वी हिरेन कुटुंबाकडून माहिती घेतली. १३ मार्च या दिवशी मनसुख हिरेन यांच्या कुटुंबाला समोर ठेवत एन्.आय.ए.च्या अधिकार्यांनी वाझे यांची चौकशी केली.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी राज्य आतंकवादविरोधी पथक (ए.टी.एस्.)अटक करू शकेल, अशी शक्यता असल्याने वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. या अर्जावर ‘निकाल होईपर्यंत अटक करू नये’, अशी मागणी त्यात होती; मात्र ‘हे प्रकरण गंभीर असून वाझे यांना अटक करून कोठडीतील चौकशी आवश्यक आहे’, असा युक्तीवाद करत ए.टी.एस्.ने या अर्जास विरोध केला होता.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून ‘अन्वेषण यंत्रणेकडे वाझे यांच्या विरोधात प्राथमिक पुरावे असल्याने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज देता येणार नाही’, असे सांगत याचिका फेटाळून लावली. त्यानंतर वाझे यांचा एन्.आय.ए.ने जबाब नोंदवला होता.
संशयास्पद इनोव्हा कार मुंबई पोलिसांचीच !
या प्रकरणात स्कॉर्पिओ वाहनासमवेत दिसलेली ‘इनोव्हा कार’ही सापडली आहे. विशेष म्हणजे ही कार मुंबई पोलिसांचीच आहे. अंबानी यांच्या घराजवळ अज्ञात व्यक्तींनी स्कॉर्पिओ वाहन बेवारस अवस्थेत सोडले होते. ‘मुंबई इंडियन्स’ लिहिलेल्या बॅगेत अंबानी कुटुंबियांना धमकी देणारी चिठ्ठीही सापडली होती. या संपूर्ण प्रकरणात ‘स्कॉर्पिओ’सह इनोव्हा कार सहभागी होती. यापैकी स्कॉर्पिओ कार १७ फेब्रुवारीच्या रात्री मुलुंड उड्डाणपुलाजवळून (ऐरोलीकडे जाणार्या मार्गावरील) चोरण्यात आली, तर इनोव्हा कारवरील नोंदणी क्रमांक बनावट असल्याचे स्पष्ट झाले होेते. ही इनोव्हा कार १३ मार्च या दिवशी रात्री एन्.आय.ए.च्या कार्यालयात आणण्यात आली. इनोव्हा वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ८०० सीसीटीव्ही कॅमेर्यांचे चित्रण पडताळले आहे. त्याचसमवेत ३० पेक्षा अधिक लोकांचे जबाब नोंदवले होते. तरीही या पांढर्या इनोव्हाविषयी कोणतीही माहिती मिळाली नव्हती.
मनसुख हिरेन यांच्या वस्तू चोरून नेल्याचा बनाव केला !
मनसुख घरातून बाहेर पडले, तेव्हा त्यांच्या तोंडावळ्यावर ‘मास्क’ होता; मात्र त्यांचा मृतदेह सापडला, तेव्हा चेहर्यावर न वापरलेल्या ५-६ रुमालांच्या घड्या होत्या. त्यांचे मनगटी घड्याळ, पुष्कराज खड्याची अंगठी, पैशांचे पाकीट, डेबिट-क्रेडिट कार्ड, पैसे आणि भ्रमणभाष यांपैकी एकही वस्तू मृतदेहासमवेत नव्हती. या सर्व वस्तू पळवून चोरीच्या उद्देशाने मनसुख यांची हत्या करण्यात आली, असा बनाव रचण्यात आल्याचा संशय अन्वेषणाशी संबंधित वरिष्ठ अधिकार्यांनी व्यक्त केला.
सचिन वाझे यांना १० दिवसांची पोलीस कोठडी !
सचिन वाझे यांना एन्.आय.ए.च्या विशेष न्यायालयात १४ मार्च या दिवशी सकाळी उपस्थित करण्यात आले. तेव्हा न्यायालयात एन्.आय.ए.च्या अधिवक्त्यांनी वाझे यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती; मात्र दोन्ही पक्षांचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वाझे यांना १० दिवसांची म्हणजे २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.