पू. सदानंद भस्मे महाराज यांचे सनातनच्या रामनाथी आश्रमात वास्तव्य असतांना आणि त्यांच्या कीर्तनाच्या वेळी कु. मधुरा भोसले यांना आलेल्या अनुभूती !
‘कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील जमखंडीच्या जवळ असणार्या रामपूर येथील कीर्तनकार श्री. सदानंद भस्मे महाराज यांचे २४.११.२०२० या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात शुभागमन झाले. २५.११.२०२० या दिवशी श्री. सदानंद भस्मे महाराज यांना ‘संत’ घोषित करण्यात आले. त्यानंतर त्याच दिवशी रात्री ८.१५ ते रात्री ९.३० या कालावधीत पू. सदानंद भस्मे महाराज आणि त्यांचे अनुयायी यांनी कीर्तन सादर केले. पू. सदानंद भस्मे महाराज यांचे आश्रमात वास्तव्य असतांना आणि त्यांच्या कीर्तनाच्या वेळी देवाच्या कृपेने मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.
१. पू. भस्मे महाराज यांनी संतपद प्राप्त केल्याचे घोषित करण्यापूर्वीच ते संत असल्याचे जाणवणे
पू. भस्मे महाराज यांनी संतपद प्राप्त केल्याचे घोषित करण्यापूर्वीच ते संत असल्याचे जाणवत होते. ‘कीर्तनकार श्री. सदानंद भस्मे महाराज यांचे आश्रमात शुभागमन झाले आहे’, असे भोजनकक्षातील फलकावर लिहिले होते. फलकावर ते वाचत असतांना त्यांच्या नावातून निळसर पांढर्या रंगाचे प्रकाशकिरण वातावरणात प्रक्षेपित होतांना जाणवले. यांतील निळसर रंगाचे प्रकाशकिरण हे रामतत्त्वाचे आणि पांढरे रंगाचे प्रकाशकिरण हे निर्गुण चैतन्याचे प्रतीक असल्याचे जाणवले. त्यामुळे ‘ते सर्वसामान्य कीर्तनकार नसून कदाचित् संतपद प्राप्त केलेले कीर्तनकार असतील’, असा विचार माझ्या मनात येऊन गेला.
२. श्री. भस्मे महाराज यांच्यातील भावामुळे त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ठिकाणी प्रभु श्रीराम आणि प.पू. दास महाराज यांच्या ठिकाणी हनुमान यांचे दर्शन झाल्याचे साधिकेला जाणवणे
परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. दास महाराज यांची श्री. भस्मे महाराज यांच्याशी भावभेट झाली. तेव्हा श्री. भस्मे महाराज यांच्यातील भावामुळे त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ठिकाणी प्रभु श्रीराम आणि प.पू. दास महाराज यांच्या ठिकाणी हनुमान यांचे दर्शन झाल्याचे मला जाणवले.
३. श्री. भस्मे महाराज यांनी संतपद प्राप्त करण्यामागील गमक
श्री. भस्मे महाराज यांनी कीर्तनाच्या माध्यमातून भक्तीचा प्रसार करून भगवंताचे संकीर्तन करून खर्या अर्थाने कीर्तनभक्ती केल्यामुळे त्यांची आध्यात्मिक पातळी ७१ टक्के इतकी झाली. त्यांच्यातील ‘विनम्रता आणि कर्तेपणा स्वत:कडे न घेता भगवंताच्या चरणी अर्पण करणे’, या गुणांमुळे त्यांच्यातील अहंभाव पूर्णत: भगवंताच्या चरणी अर्पण झाल्यामुळे ‘त्यांनी संतपद प्राप्त केले आहे’, असे जाणवले.
४. पू. भस्मे महाराज यांनी संतपद प्राप्त केल्यामुळे श्रीविष्णूने त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालून गौरवान्वित करणे
संतपद प्राप्त केल्यानंतर पू. भस्मे महाराज जेव्हा कीर्तन करण्यासाठी ध्वनीचित्रीकरण विभागात आले, तेव्हा मला त्यांच्या हृदयात भक्तीचा तेजस्वी निळसर रंगाचा गोळा कार्यरत असल्याचे दिसले. त्यांच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी ज्ञानाचा आणि ब्राह्मतेजाचा पिवळसर रंगाचा तेजस्वी बिंदू दिसला. त्यांच्या गळ्यात सूक्ष्मातून पुष्पांचा हार असल्याचे जाणवले.
‘पू. भस्मे महाराज यांनी संतपद प्राप्त केल्याबद्दल श्रीविष्णूने त्यांच्या गळ्यात सूक्ष्मातून पुष्पहार घातलेला आहे’, असे मला जाणवले. त्यामुळे तो सतत त्यांच्या गळ्यात असतो आणि ‘पुष्पहारातील फुलांतून मंद सुगंध वातावरणात दरवळत असतो’, असे जाणवले.
५. पू. भस्मे महाराज यांच्या मनातील भक्तीमय ज्ञानाच्या अमृताचा आस्वाद समस्त श्रोत्यांना कीर्तनाच्या रूपाने घेता येणे
जेव्हा पू. भस्मे महाराज यांनी कीर्तनाला प्रारंभ केला, तेव्हा मला त्यांच्या डोक्यावर पांढर्या रंगाचा प्रकाशझोत पडलेला दिसला. ‘हा प्रकाशझोत म्हणजे त्यांच्याकडे येणारा ईश्वरी चैतन्याचा झोत आहे’, असे जाणवले.’ ईश्वराकडून प्रक्षेपित होणारे निर्गुण चैतन्य पू. भस्मे महाराज त्यांच्या सहस्रारचक्राद्वारे ग्रहण करत असल्याचे जाणवले. या चैतन्याचे रूपांतर ज्ञानतेजात होऊन ते शब्दांद्वारे त्यांच्या मुखातून वातावरणात प्रक्षेपित झाले. त्यामुळे त्यांच्या मनातील भक्तीमय ज्ञानाच्या अमृताचा आस्वाद समस्त श्रोत्यांना कीर्तनाच्या रूपाने घेता आला. जेव्हा त्यांनी कीर्तन आरंभ केले, तेव्हा त्यांच्या हृदयात आत्मज्योत प्रज्वलित झालेली दिसली.
६. पू. भस्मे महाराज यांच्या कीर्तनाच्या वेळी आलेल्या अनुभूती
६ अ. पू. भस्मे महाराज संत तुकाराम महाराज यांचा अभंग म्हणत असतांना साधिकेच्या मनाला विठ्ठल भक्तीची ओढ लागल्याचे जाणवणे
‘देव माझा, मी देवाचा,
हीच माझी सत्य वाचा ॥ १ ॥
देह देवाचे देऊळ,
आत बाहेर निर्मळ ॥ २ ॥
देव पहावया गेलो,
तेथे देवची होऊनी आलो ॥ ३ ॥
तुका म्हणे धन्य झालो,
आजी विठ्ठल भेटलो ॥ ४ ॥’
पू. भस्मे महाराज हे अभंग अतिशय तन्मयतेने गात होते. त्यांचे गायन ऐकत असतांना माझा विठ्ठलाप्रतीचा भाव जागृत होऊन मन अंतर्मुख झाले. हे भजन ऐकत असतांना माझ्याकडून ते गुणगुणले जाऊन माझ्या मनाला विठ्ठल भक्तीची ओढ लागल्याचे जाणवले.
६ आ. श्रीगुरूंविषयीचे भजन म्हणत असतांना श्रोत्यांच्या मनातील श्रीगुरूंविषयीचा भक्तीभाव जागृत होणे
गुरु माता-पिता, गुरु बंधु-सखा,
तेरे चरणोंमे स्वामी मेरे कोटी प्रणाम ।
ते हे भजन म्हणत असतांना त्यांना गुरुरूपात पूजनीय असणार्या संत तुकारामांप्रतीचा निस्सीम भक्तीभाव त्यांच्या देहबोलीतून आणि वाणीतून प्रगट झाला. त्यामुळे श्रोत्यांच्या मनातील श्रीगुरूंविषयीचा भक्तीभाव जागृत झाल्याचे जाणवले. हे गुरुभक्तीचे अमृत किती प्राशन करू, असे झाले होते. गुरुभक्तीच्या अमृत प्राशनामुळे माझे अतृप्त मन तृप्त झाल्याचे मला जाणवले.
६ इ. देवाच्या भेटीची ओढ लागणे आणि त्याची भेट झाल्यावर मनाला मिळणारी तृप्ती अभंगाच्या रूपाने अनुभवता येणे
‘जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता ।’
‘जातो माघारी पंढरीनाथा,
तुझे दर्शन झाले आता ॥ धृ. ॥
तुझ्या नादाने पाहिले मी,
ही तुझीच रे पंढरी ।
धन्य झालो आम्ही जन्मांचे,
नाम तुझे घेऊ आवडीचे ॥ १ ॥
दीपावली तुझी पंढरी,
चालू झाली भगवंताची वारी ।
तुका म्हणे भक्ती करा तुझी,
जाती पापें जन्मांची पळोनी ॥ २ ॥
हे भजन ऐकत असतांना देवाप्रतीचा आर्तभाव जागृत होऊन देवदर्शनाची आर्तता माझ्या मनात निर्माण झाली आणि पुढच्या क्षणी देवाच्या भेटीची अनुभूती येऊन मन तृप्त झाल्याचे जाणवले. ‘संतांना देवाची भेट झाल्यावर ते देवाचा निरोप कसा घेतात’, हे मला या अभंगातून शिकायला आणि अनुभवायला मिळाले.
७. भक्तीची चव चाखता आली आणि भक्तीतील आनंद अनुभवण्याची सुवर्ण संधी देवकृपा आणि गुरुकृपा यांच्यामुळे लाभल्याविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता !
२५.११.२०२० या दिवशी स्मार्त एकादशीच्या शुभदिनी आम्हाला पू. भस्मे महाराजांचे दर्शन होऊन त्यांच्या अमृतवाणीतील कीर्तनाचा अलभ्य लाभ झाला आणि विठ्ठलभक्ती अनुभवता आली, यासाठी श्रीविठ्ठलाच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता. त्यांनी कीर्तनातून संत तुकारामांच्या जीवनातील काही प्रसंग कन्नड भाषेत सांगून काही कन्नड भजनेही म्हटली. तेव्हा मला कन्नड भाषा कळत नव्हती; परंतु पू. भस्मे महाराज आणि त्यांचे अनुयायी यांच्याकडून वातावरणात प्रवाहित होणार्या भावतरंगांनी मी न्हाऊन निघाले होते. पू. भस्मे महाराज यांच्या भक्तीभावामुळे त्यांच्या ठिकाणी काही वेळा प्रभु श्रीराम, श्रीविठ्ठल, तर काही वेळा संत तुकाराम यांचे दर्शन होऊन माझ्या डोळ्यांत भावाश्रू तरळले. पू. भस्मे महाराजांमुळे आम्हाला भक्तीची चव चाखता आली आणि भक्तीतील आनंद अनुभवण्याची सुवर्ण संधी देवकृपा आणि गुरुकृपा यांच्यामुळे प्राप्त झाली. यासाठी मी देवाच्या आणि श्रीगुरूंच्या चरणी मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त करते.
– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.११.२०२०)