परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी साधकांना केलेले मार्गदर्शन
प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. १४ मार्च या दिवशी ‘साधनेविषयी शंकांचे निरसन’ हा विषय पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.
भाग ७
भाग ६. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/458907.html
३. स्वभावदोष निर्मूलन
३ उ. क्रोध आल्यास ‘योग्य प्रतिक्रिया कोणती असायला पाहिजे’, हे समजून स्वयंसूचना घ्यावी !
कु. अनन्या मोदी : परात्पर गुरुदेव, मी म्हणजे अतिशय शीघ्रकोपी (शॉर्ट टेंपर्ड) आहे. मी स्वतःला नियंत्रित करण्याचा पुष्कळ प्रयत्न करते; पण मला क्रोध येतो.
परात्पर गुरु डॉक्टर : प्रयत्न नाही; स्वयंसूचना द्यायची आहे. राग येतो, तेव्हा ‘योग्य प्रतिक्रिया कोणती असायला हवी’, हे समजून घेऊन स्वयंसूचना दे.
कु. अनन्या मोदी : म्हणजे माझी सहन करण्याची सीमा (सैचुरशन पॉइंट) संपते. त्यानंतर पुन्हा असा क्रोध येतो की, मग लहान मोठे न बघता मी कुणालाही काहीही बोलते.
परात्पर गुरु डॉक्टर : त्यासाठी स्वयंसूचना द्यायची. (सौ. मोदी यांना उद्देशून) तुम्ही हिला शिकवले नाही का ? ‘क्रोध येतो, तर त्यामागचे मूळ कारण काय आहे ?’ स्वयंसूचना देण्यासाठी अ २ पद्धतीचा उपयोग करायचा. ‘मला क्रोध आला’, ही प्रतिक्रिया झाली. त्याऐवजी ‘कोणती प्रतिक्रिया असायला पाहिजे ? दुसर्याच्या मनात कोणते विचार चालले आहेत, हे मी समजून घेईन आणि त्याच्याशी बोलून घेईन.’ तुम्हाला ‘अ २’ ही स्वयंसूचना देण्याची पद्धत ठाऊक आहे ना ?
कु. अनन्या मोदी : हो.
परात्पर गुरु डॉक्टर : प्रतिक्रिया योग्यच असायला पाहिजे, अयोग्य नाही. तू उद्या येथे आहेस ना ? तुझ्यात जे स्वभावदोष आहेत, ते लिहून काढ. एक-एक स्वभावदोषाचे एक-एक उदाहरण लिही. त्यासाठी ‘अ १, अ २, अ ३’ यांपैकी कोणती पद्धत वापरायची, ते शोधून काढ आणि त्याची स्वयंसूचना बनव. कुणीतरी ‘ती योग्य आहे का ?’ हे तुला पडताळून देईल. जेवढे १० – १५ स्वभावदोष असतील, त्यांची लक्षणे असतील ना ? त्यापैकी स्वयंसूचना देण्यासाठी प्राधान्य कुणाला द्यायचे आहे, हेसुद्धा तुला ते सांगतील. असे २ – ३ सप्ताह केलेस, तर २ – ३ स्वभावदोष नष्ट होतील. नंतर दुसर्या आणि तिसर्या स्वभावदोषांच्या संदर्भात सूचना घ्यायच्या. असे ५ – ६ मास केले, तर तुझ्यामध्ये कोणताही स्वभावदोष रहाणार नाही. नंतर यांच्याप्रमाणे आनंदी रहाशील.
३ ऊ. स्वभावदोष लक्षात येतात; परंतु प्रयत्न होत नाहीत, तर स्वतःला शिक्षा द्या !
श्री. वसंत सणस : आता मला माझे स्वभावदोष लक्षात येतात; परंतु पुढे जाऊन जे प्रयत्न करायला पाहिजेत, ते माझ्याकडून होत नाहीत.
परात्पर गुरु डॉक्टर : पुन्हा तीच गोष्ट. प्रयत्न केले नाहीत, तर स्वतःला शिक्षा करायची. ‘मी सारणी लिखाण किंवा स्वयंसूचना घेत नाही, तोपर्यंत अल्पाहार करणार नाही किंवा भोजन करणार नाही.’ स्वतःला शिक्षा का करावी लागते ? पुढे युद्धकाळ येणार आहे, तर आताच स्वयंसूचना देत रहा. आपल्याकडे आता वेळ फार अल्प राहिला आहे. युद्ध चालू होण्यापूर्वी, आपत्काल चालू होण्यापूर्वी, आपल्याला स्वतःला सुधारायचे आहे. तिसर्या महायुद्धात ईश्वर जो सत्त्वगुणप्रधान आहे, चांगला आहे, त्याला जिवंत ठेवणार आहे. आपल्याला जिवंत रहायचे असेल, तर साधना करून मनुष्यजन्माचे सार्थक केले पाहिजे. आता कुठे कलियुगांतर्गत कलियुगाचा (कलियुगाची केवळ ५ सहस्र वर्षे पूर्ण झाली आहेत.) आरंभ झाला आहे, तरीही कसे वातावरण आहे ना ? कलियुगाची पुढे साडेचार लक्ष वर्षे शिल्लक आहेत. त्या कलियुगात कुणाला पुनःपुन्हा जन्म घ्यायचा आहे ? या जन्मात आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाली, तर जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होता येईल.
३ ए. स्वयंसूचनेमुळे अंतर्मनात असलेले स्वभावदोष दूर होतात आणि नामजप केल्याने बाह्यमनात येणार्या विचारांमुळे मन विचलित होत नाही !
कु. रुचि पवार : परात्पर गुरुदेव, माझ्या मनात अनावश्यक विचारांचे प्रमाण पुष्कळ असते. ‘मनोराज्यात रमणे’ या स्वभावदोषासाठी मी स्वयंसूचना घेते; परंतु मनातील विचारांचे प्रमाण अल्प होत नाही.
परात्पर गुरु डॉक्टर : अशा स्थितीत नामजपाचा लाभ होतो. अधिकाधिक सेवा करण्याची तळमळ असणार्या साधकांना वाटते, ‘मला ही सेवा करायची आहे, ती सेवा करायची आहे.’ त्यामुळे तो त्याच विचारात रहातो. एवढे विचार कुठून येतात ? आपल्याला बाह्यमन आणि अंतर्मन असते. अंतर्मनात जन्मोजन्मीच्या सर्व गुण-दोषांचा साठा (स्टॉक) असतो. ते विचार बनून मनात येतात. सर्वांत वरच्या पातळीवर (सुपरफिशियल) त्यांच्याविषयी स्वयंसूचना देऊन पालट होत नाही. स्वयंसूचना देऊन आतला साठा (स्टॉक) आपल्याला नष्ट करायचा आहे. त्यासाठी स्वयंसूचनेवर अधिक जोर द्यायचा आहे. तसेच नामजपही करा. नामजप करतांना अंतर्मनातील विचार बाह्यमनात येतात. त्याकडे आपले लक्ष जात नाही. भावपूर्ण नामजप केला, तर भावाची स्थिती एवढी आनंददायी असते की, दुसर्या विचारांकडे आपले मन कसे जाईल ? दोन्ही (नामजप आणि स्वयंसूचना) प्रयत्न लवकर लवकर केले पाहिजेत. त्यामुळे ५ – ६ मासांत स्वभावदोष अल्प व्हायला आरंभ होतो.
(क्रमश:)
भाग ८. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/459648.html