नाथ संप्रदायाचे गाढे अभ्यासक आणि सनातन संस्थेच्या कार्याप्रती आत्मीयता असणारे नगर येथील पू. (प्रा.) अशोक नेवासकर यांचा देहत्याग
नगर, १३ मार्च (वार्ता.) – येथील पू. (प्रा.) अशोक नेवासकर (वय ७९ वर्षे) यांनी १२ मार्च २०२१ या दिवशी सायंकाळी देहत्याग केला. देहत्यागापूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार नेवासकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
पू. (प्रा.) अशोक नेवासकर यांचा परिचय
पू. (प्रा.) नेवासकरकाका यांनी ‘इतिहास’ आणि ‘पुरातत्वशास्त्र’ या विषयांत एम्.ए. ही पदवी प्राप्त केली. मूळचे नगर येथील असलेले पू. (प्रा.) नेवासकर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होताच डेक्कन कॉलेज, पुणे येथे पुरातत्व विभागात संशोधन करू लागले. अध्ययन, अध्यापन आणि संशोधन हा त्यांचा जीवनाधार होता. वर्ष १९६९ मध्ये ‘नगर महाविद्यालया’तील इतिहास विभागात ते व्याख्याते होते. त्यांनी इतिहासाच्या विविध कालखंडावर विपुल लेखन केले होते. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांना ‘संदर्भग्रंथ’ म्हणून पुणे विद्यापिठाने मान्यता दिली आहे. त्यांनी ‘नाथ संप्रदाय’ या विषयावर सखोल अभ्यास करून ‘अलख निरंजन’ हे नाथ संप्रदायाचे वार्षिक प्रकाशन चालू केले. स्वतः सर्वकाही करूनही ते नामानिराळे रहात. ‘सर्व काही माझे सद्गुरु देवेंद्रनाथच करत आहेत’, असे ते म्हणायचे.
एकदा पत्नीच्या आग्रहामुळे ते नाथभक्त असलेल्या सद्गुरु श्री देवेंद्रनाथ (पूर्वाश्रमीचे श्री. विजयकुमार सुळे, जे स्वतः अभियंता (इंजिनिअर) आणि वास्तूविशारद (आर्किटेक्ट) होते. त्यांना त्यांचे गुरु राघवेंद्रस्वामी यांनी सूक्ष्मातून ‘देवेंद्रनाथ’ या नावाने दीक्षा दिली.) यांच्याकडे गेले. त्यांचे नाथांवरचे प्रवचन ऐकतांनाच पू. (प्रा.) नेवासकर यांच्या सगळ्या शंकांचे निरसन होऊन ते नाथमय झाले आणि नाथ संप्रदायाचा अभ्यास, संशोधन अन् प्रचार-प्रसार यांचे पुरस्कर्तेच झाले.
सनातन संस्था आणि पू. (प्रा.) अशोक नेवासकर !
पू. (प्रा.) अशोक नेवासकर यांना सनातनच्या कार्याप्रती आत्मीयता होती. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’साठी सर्वतोपरी साहाय्य करण्याची सिद्धताही त्यांनी दर्शवली होती. पू. नेवासकरकाकांकडे ग्रंथ आणि ज्ञान यांचे सामर्थ्य पुष्कळ मोठे आहे. त्यांनी त्यांच्या ग्रंथांचा अमूल्य ठेवा महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयासाठी देऊ केला. पू. नेवासकरकाका यांना सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी पुष्कळ प्रेम होते. त्यांचेे सनातनच्या कार्याकडे पुष्कळ लक्ष असायचे. ते वेळोवेळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना संपर्कही करायचे आणि सनातनच्या साधकांविषयी विचारपूसही करायचे.
सनातनच्या कार्यातील अडथळे दूर होण्यासाठीही त्यांनी अनेकदा मंत्रोपाय दिले, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आणि साधकांच्या रक्षणासाठी वेळोवेळी प्रार्थनाही केल्या. पू. नेवासकरकाकांच्या माध्यमातून सनातनच्या कार्याला प्रत्यक्ष नवनाथांचेच आशीर्वाद लाभले असून त्यांच्या आशीर्वादामुळेच सनातनचे कार्य अनेक पटींनी वृद्धींगत होत आहे. ६ फेब्रुवारी २०२१ या दिवशी झालेली ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभा त्यांनी शेवटपर्यंत पाहिली होती.
‘सिद्ध साधक साधना परिवार’ यांनी त्यांच्या यू ट्यूब वाहिनीवरून पू. काकांचे नाथ संप्रदायाविषयीचे प्रवचन आयोजित केले होते. त्यात पू. काकांनी सनातनच्या आश्रमाचा उल्लेख केला होता.
३ जून २०१४ या दिवशी प्रा. नेवासकर हे संतपदी विराजमान झाल्याचे घोषित !
२५ ते २९ मे २०१४ या कालावधीत सनातनच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ महाराष्ट्रात ठिकठिकाणी भ्रमण करत होत्या. त्या नगरच्या दौर्यावर असतांना त्यांची पू. नेवासकर काकांशी भेट झाली. ते थोर इतिहास संशोधक असून त्यांच्यातील नम्रतेमुळे साधकांना त्यांच्याशी जवळीक वाटली. तेव्हापासून सनातन संस्थेशी त्यांचे जिव्हाळ्याचेे संबंध निर्माण झाले. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना त्यांच्या संतत्वाची प्रचीती आल्याने ३ जून २०१४ या दिवशी प्रा. नेवासकर हे संतपदी विराजमान झाल्याचे घोषित केले होते.