आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कु. तेजल पात्रीकर आणि कु. प्रियांका लोटलीकर ‘नारी शक्ती पुरस्कारा’ने सन्मानित !

आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त ‘उर्वशी डान्स, म्युझिक आर्ट अँड कल्चरल सोसायटी’च्या वतीने महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कु. तेजल पात्रीकर आणि कु. प्रियांका लोटलीकर ‘नारी शक्ती पुरस्कारा’ने सन्मानित !

  • अमेरिकेतील कथ्थक नृत्यांगना प्राची दीक्षित आणि रिता मुस्तफी, इंग्लंडमधील नृत्यांगना काजल शर्मा, पॅरिस येथील शर्मिला शर्मा, दुबईतील निशी सिंह आणि रशिया येथील स्वेटलाना निगम या विशेष रूपाने विदेशात भारतीय नृत्यकला प्रसाराचे कार्य मोठ्या प्रमाणात करत आहेत. या सर्वांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
  • या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतल्याविषयी डॉ. रेखा मेहरा आणि अधिवक्ता उमेश शर्मा यांचे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने आभार मानले आहेत.

फोंडा (गोवा) – आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या निमित्ताने ८ मार्च २०२१ या दिवशी ‘उर्वशी डान्स, म्युझिक आर्ट अँड कल्चरल सोसायटी’च्या वतीने ‘सुर-ताल हुनर का कमाल – वुमन्स डे स्पेशल’ या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत, नृत्य आणि कला यांमध्ये विशेष कार्य करणार्‍या महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या पुरस्कारप्राप्त महिलांमध्ये ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या संगीत समन्वयक कु. तेजल पात्रीकर आणि संशोधन समन्वयक कु. प्रियांका लोटलीकर यांचाही समावेश आहे.

​या कार्यक्रमात अमेरिका, इंग्लंड, पॅरिस, दुबई आणि रशिया येथील कथ्थक नृत्य प्रशिक्षणाकरता कार्यरत असलेल्या नृत्य गुरु, तसेच भारतातील उत्तर भारत अन् दक्षिण भारत येथील संगीत आणि नृत्य क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिला गुरु अन् कलाकार अशा एकूण

१६ जणींना ‘नारी शक्ती पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त झालेल्या महिलांनी या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करून उर्वशी डान्स, म्युझिक आर्ट अँड कल्चरल सोसायटीच्या संचालिका डॉ. रेखा मेहरा यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्.जे. राहुल यांनी केले.

कु. तेजल पात्रीकर

जिजाबाईंचा आदर्श ठेवून आजच्या महिलांनी समाज आणि राष्ट्र सुसंस्कारित करण्यासाठी प्रयत्न करावेत ! – कु. तेजल पात्रीकर

कु. तेजल पात्रीकर यांनी त्यांना मिळालेला हा पुरस्कार महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी समर्पित केला. त्या म्हणाल्या की, स्त्री एक शक्ती आहे. जिच्यामुळे घर आणि समाज यांच्यावर चांगले संस्कार होतात. तीच स्त्री जर साधना करणारी असेल, तर तिच्यामुळे समाज अन् राष्ट्र सुसंस्कारित होईल. याचे उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाबाई ! ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्राकरता घडवले. त्यांचा आदर्श समोर ठेवून आजच्या महिलांनी समाज आणि राष्ट्र सुसंस्कारित करण्यासाठी प्रयत्न करावेत.

कु. प्रियांका लोटलीकर

आध्यात्मिक साधनेनेच नारीमध्ये ईश्‍वरी शक्तीचा विकास शक्य ! – कु. प्रियांका लोटलीकर

​हा पुरस्कार मिळणे, ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचीच कृपा आहे. नारी ही ईश्‍वरी शक्तीचे प्रतीक आहे. आध्यात्मिक साधनेनेच या ईश्‍वरी शक्तीचा विकास नारीमध्ये होणे शक्य आहे. यामुळे स्त्रीला शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरावरील लाभ होतात. त्यासाठी सर्वांनी जीवनात सतत ईश्‍वराची भक्ती करावी, असे मनोगत कु. प्रियांका लोटलीकर यांनी व्यक्त केले.