लोभी वृत्ती, लाचखोरी आणि कामचुकारपणा यांमुळे कर्तव्यभ्रष्ट झालेले पोलीस !
सुराज्य स्थापनेचे एक अंग : आदर्श पोलीसपोलिसांविषयी वाचनात येणारी वृत्ते, त्यांचे चित्रपटांंमध्ये दाखवले जाणारे खलनायकीकरण यांमुळे आणि अनेकदा स्वत:च्या अनुभवांमुळे पोलीस अन् समाज यात अंतर पडल्याचे दिसून येते. हे खरेतर पालटायला हवे. समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत. – संपादक |
१. कपड्याच्या गोदामाच्या आगीमध्ये शेष राहिलेल्या चांगल्या कपड्यांची लूट करणारे मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारे लोभी पोलीस !
‘काही वर्षांपूर्वी मुंबईतील एका पोलीस ठाण्याच्या स्थलसीमेत (हद्दीत) तयार (रेडीमेड) कपड्यांच्या गोदामाला आग लागली होती. त्यात अर्ध्याहून अधिक कपडे जळून खाक झाले होते आणि काही ‘रेडीमेड’ शर्ट चांगल्या अवस्थेत राहिले होते. त्यातील काही शर्टची पोलिसांनी लूट केली. असे प्रकार अनेक वेळा होत असतात. काही पोलीस बंदोबस्त चोख ठेवला; म्हणून मालकाकडे पैशांची मागणीही करतात. आगीमुळे आधीच हानी झालेली असते. त्या झालेल्या हानीचा पंचनामा करण्यासाठीही पोलीस आणि अग्नीशमन दलाचे अधिकारी मालकाकडे पैशांची मागणी करतात.
२. स्वतः मद्यपान केले असल्याने अपघातग्रस्त वाहनचालकाला साहाय्य न करता तेथून पळ काढणारे कर्तव्यभ्रष्ट पोलीस !
२ अ. रात्रीच्या वेळी पोलीस वाहनातच मद्य पिऊन पत्ते खेळत असल्याने दुचाकीस्वाराने मागून धडक देऊनही त्याला साहाय्य न करता पळ काढणे : अपघात आणि संंकटसमयी साहाय्य करणे, हे पोलिसांचे आद्यकर्तव्य आहे; परंतु ‘या कर्तव्याचे सर्वच पोलीस पालन करतात’, असे नाही. काही वर्षांपूर्वी मुंबई उपनगरातील एका पोलीस ठाण्याच्या क्षेत्रामध्ये रात्री १२ ते १ च्या सुमारास महामार्गाच्या बाजूला गाडी उभी करून २ पोलीस अधिकारी आणि २ अंमलदार गाडीतच मद्य पिऊन पत्ते खेळत बसले होते. रात्री एका दुचाकीस्वाराने त्या पोलिसांच्या गाडीला जोरात धडक दिली आणि तो घायाळ होऊन खाली पडला. त्या वेळी पोलिसांनी त्या घायाळ दुचाकीस्वाराला रुग्णालयामध्ये घेऊन जाणे आवश्यक होते; परंतु पोलीस मद्य प्यायलेले असल्यामुळे घाबरले. रात्रीची सामसूम आणि अंधार असल्यामुळे त्यांनी तेथून पळ काढला; पण त्या घायाळ व्यक्तीला काहीच साहाय्य केले नाही.
२ आ. क्षतीग्रस्त झालेली जीप खासगी गॅरेजमध्ये दुरुस्त करतांना त्यातील पिस्तुलामुळे एक जण घायाळ झाल्यानंतर खरा प्रकार समोर येणे : त्यांनी हे पाप पचवण्याचा प्रयत्न केला; परंतु नियतीला ते मान्य नव्हते. दुसर्या दिवशी सकाळी वाहनचालकाला जीपच्या पाठीमागील भागाची हानी पोचल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी ती जीप दुरुस्तीसाठी एका खासगी गॅरेजमध्ये नेली. जीप दुरुस्ती करण्यासाठी गॅरेजमधील एक मुलगा त्यातील एक एक साहित्य काढून बाहेर ठेवत होता. तेव्हा त्याला जीपच्या पाठीमागील सीटखाली एक गावठी कट्टा (पिस्तुल) मिळाले. त्याने ते पिस्तुल वाहनचालकाकडे दिले. दोघेही बंदुक हाताळत असतांना त्यातून गोळी निसटली आणि ती समोर उभ्या असलेल्या मुलाच्या डोक्याला खेटून केली. त्यामुळे तो मुलगा गंभीर घायाळ झाला आणि त्याला खासगी रुग्णालयात भरती करावे लागले. मुलाला रुग्णालयात भरती केल्यानंतर खरी गोेष्ट उघड झाली.
या प्रकरणाचे अन्वेषण झाले. यात केवळ पोलीस अंमलदार आणि तो चालक यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले अन् नंतर त्यांना निलंबित करण्यात आले; परंतु २ अधिकार्यांवर काहीच कारवाई झाली नाही. यातून ‘पोलीस अत्यंत निष्काळजीपणे कसे वागतात’, हे दिसून आले.
३. पालघर येथे जमावाकडून साधूंची हत्या होत असूनही निष्क्रीय रहाणारे अकार्यक्षम पोलीस !
दळणवळण बंदी चालू असतांना पालघरमध्ये पोलिसांसमोर जमावाने २ साधूंचा जीव घेतला. (अशा प्रकारे कर्तव्य बजावण्यास हयगय केल्यास आणि भित्रेपणा केल्याचे दोषी ठरल्यास मुंबई पोलीस कायदा १९५१ कलम १४५ अन्वये संबंधित पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.)
४. पोलिसांनी ‘मुंबई पोलीस कायदा १९५१’ या कायद्यातील कलमांचा अपवापर करणे
४ अ. कलम १०२ अन्वये सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्यांवर कारवाई करण्याऐवजी कारवाईची भीती दाखवून संबंधितांकडून पैसे उकळणे : एखाद्या व्यक्तीने रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीला अडथळा होईल, अशा प्रकारे गुरे बांधल्याने, बांधकामाचे साहित्य ठेवल्याने, रस्त्यावर कोणती वस्तू विकण्यास ठेवल्याने पादचार्यांना अडथळा निर्माण होत असेल, तर अशा लोकांवर ‘मुंबई पोलीस कायदा १९५१ कलम १०२ अन्वये कारवाई होऊ शकते. त्यामुळे अनधिकृत फेरीवाले, दुकानदार, रस्त्यावर गुरे बांधणारे, अनधिकृतपणे बांधकामाचे साहित्य रस्त्यावर ठेवणारे बांधकाम व्यावसायिक यांच्याकडून वरील कायद्याचे उल्लंघन झाल्यास पोलीस त्यांना कारवाईची भीती दाखवतात आणि पैसे उकळतात.
४ अ १. लाचस्वरूपातील हप्ते न देणार्या अवैध फेरीवाल्यांवर वारंवार दंडात्मक कारवाई करणे : या कलमाप्रमाणे पोलिसांना ‘वॉरंट’विना अटक करण्याचा अधिकार आहे. अवैध फेरीवाल्यांकडून पोलिसांना ठराविक हप्ते ठरलेले असतात. जे फेरीवाले हप्ता देत नसतील, त्यांच्यावर पोलीस कायदेशीर कारवाई करतात. त्या वेळी पोलीस त्यांच्याकडून १ सहस्र २०० रुपयांचा द्रव्यदंड डिपॉझिट म्हणून (दंड) घेतात. (कार्यपद्धतीप्रमाणे पावती देऊन फेरीवार्याला दुसर्या दिवशी सकाळी न्यायालयात येण्यास सांगितले जाते. एखाद्याकडे ‘डिपॉझिट’ भरण्यास पैसे नसतील, तर पोलीस त्याला ‘वॉरंट’विना अटक करून दुसर्या दिवशी सकाळी न्यायालयात उपस्थित करतात. ज्यांनी ‘डिपॉझिट’ भरलेले असते, त्यांना न्यायालय ‘गुन्हा मान्य आहे का ?’, असे विचारून ठराविक दंड करतात आणि बाकीचे पैसे परत करतात. (न्यायालयाने सांगितलेला दंड मान्य नसेल, तर अल्प कालावधीत सुनावणी करून आणि दोष सिद्ध झाल्यानंतर शिक्षा फर्मावून कारागृहात पाठवले जाते.) अशी कारवाई वारंवार झाली, तर फेरीवाले मुकाट्याने पोलिसांना हप्ता देत असतात.
४ अ २. कायदेशीर साहाय्य करण्याचे आमीष दाखवून असाहाय्य महिला व्यावसायिकांना वासनेची शिकार बनवणे : काही महिला आणि मुली यांच्या घरामध्ये कुणीही कमावते नसल्याने उदरनिर्वाहासाठी त्या लहान-मोठे व्यवसाय करत असतात. तेव्हा काही पोलीस असाहाय्य महिला फेरीवाल्या किंवा व्यावसायिक यांना कारवाईची भीती दाखवतात. त्यामुळे काही महिला पोलिसांच्या वासनेची शिकार होतात. एका शहरात एका महिलेचे पोलीस ठाण्याजवळ बांगड्याचे दुकान आहे. एका पोलीस कर्मचार्याने तिच्यावर १४ वर्षांपूर्वी केलेल्या बलात्कार प्रकरणात तो पोलीस कर्मचारी निर्दोष सुटला होता. या प्रकरणी कायदेशीर साहाय्य करण्याचे आमीष दाखवून अन्य एका पोलीस कर्मचार्याने मागील १० वर्षांच्या काळात वारंवार बलात्कार केल्याची तक्रार सदर महिलेने पोलिसांकडे नोंदवली.
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– एक निवृत्त पोलीस अधिकारी (१५.११.२०२०)
पोलीस कोठडीतील अस्वच्छता आणि दुरवस्था‘सामान्य पोलीस कोठडीत १० ते १२ पोलीस ठाण्यांंमधील कच्चे अपराधी ठेवण्यात येतात. एक स्वतंत्र इमारत असते. तेथे सर्वांना रहाण्यासाठी एक मोठे सामूहिक सभागृह असते. ते अतिशय अस्वच्छ असते. त्यामुळे तेथे दुर्गंधी येत असते. कैद्याला पाव, पोळी आणि उसळ दिली जाते. हे देण्यासाठी बाहेरील उपाहारगृह कंत्राटदाराची नेमणूक केली जाते. सरकार या कंत्राटदारांची देयके विलंबाने संमत करतात. त्यामुळे ते जेवण निकृष्ट बनवतात.’ – एक निवृत्त पोलीस अधिकारी (१५.११.२०२०) |
पोलीस आणि प्रशासन यांच्या संदर्भात येणारे कटू अनुभव कळवा !साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !पोलीस-प्रशासन यांतील कर्मचारी किंवा अधिकारी यांच्याविषयी कटू अनुभव आले असल्यास ते पुढे दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत. या लेखाचे प्रयोजन ‘पोलीस आणि प्रशासन कसे नसावे’ हे ध्यानात यावे, संबंधित कर्मचारी/अधिकारी यांना त्यांच्या अयोग्य कृत्यांची जाणीव होऊन त्यांनी त्यात सुधारणा करावी आणि नागरिकांनी आपले राष्ट्रकर्तव्य म्हणून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता ते सुधारण्यास प्रयत्न करावेत, वेळप्रसंगी या विरोधात तक्रारी द्याव्यात, हे आहे. पत्ता : अधिवक्ता नीलेश सांगोलकर द्वारा सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. संपर्क क्रमांक : ९५९५९८४८४४ ई-मेल : socialchange.n@gmail.com |
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! : https://sanatanprabhat.org/marathi/463279.html
‘या लेखात छापण्यात आलेले अनुभव वैयक्तिक आहेत. हा लेख छापण्यामागे कुणाची मानहानी वा अपकीर्ती करण्याचा उद्देश नाही, तर प्रशासकीय व्यवस्थेत सुधारणा व्हावी’, हा उद्देश आहे. – संपादक