फाल्गुन मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व
साप्ताहिक शास्त्रार्थ
‘१४.३.२०२१ या दिवसापासून फाल्गुन मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.१४.३.२०२१ ते २०.३.२०२१ या सप्ताहातील दिनविशेष देत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘शार्वरी’ नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४२, उत्तरायण, शिशिरऋतू, फाल्गुन मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे.
(संदर्भ : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. चंद्रदर्शन : अमावास्येनंतर चंद्राचे प्रथम दर्शन ‘चंद्रकोर’ रूपात होते. हिंदु धर्मात चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी चंद्रदर्शन होणे भाग्यकारक आहे; कारण चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. सूर्यास्तानंतर लगेचच केवळ थोड्या वेळासाठी चंद्रकोर दिसते. या तिथीची देवता ब्रह्मा आहे. १४.३.२०२१ या दिवशी सायंकाळी ७.४४ पर्यंत चंद्रदर्शन आहे.
२ आ. अमृत योग : अमृत योगावर कोणतेही शुभ कार्य केल्यावर यश प्राप्त होते. १६.३.२०२१ या दिवशी हा योग अहोरात्र (संपूर्ण दिवस आणि रात्र) आणि २०.३.२०२१ या दिवशी सायंकाळी ४.४५ पर्यंत आहे.
२ इ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यात विलंब होण्याचा संभव असतो. १७.३.२०२१ या दिवशी सकाळी १०.२२ पासून रात्री ११.२९ पर्यंत विष्टी करण आहे.
२ ई. दग्ध योग : दग्ध योग हा अशुभ योग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. १८.३.२०२१ या दिवशी गुरुवार असून उत्तररात्री २.१० पासून षष्ठी तिथी आहे. १८.३.२०२१ या दिवशी उत्तररात्री २.१० पासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत ‘दग्ध योग’ आहे.
२ उ. यमघंट : वार आणि नक्षत्र यांच्या संयोगाने ‘यमघंट योग’ होतो. १८.३.२०२१ या दिवशी सकाळी १०.३४ पासून दुसर्या दिवशी सूर्योदयापर्यंत कृत्तिका नक्षत्र आणि गुरुवार एकत्र आल्याने अन् १९.३.२०२१ या दिवशी दुपारी १.४४ पासून दुसर्या दिवशी सूर्योदयापर्यंत रोहिणी नक्षत्र आणि शुक्रवार एकत्र आल्याने ‘यमघंट योग’ होतो. हा अनिष्ट योग आहे. या योगावर कधीही प्रवास करू नये.
२ ऊ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. १९.३.२०२१ या दिवशी दुपारी १.४४ पासून उत्तररात्री ४.४९ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ ए. मेषायन : २०.३.२०२१ या दिवशी दुपारी ३.०७ मि. नंतर रवि ग्रह सायन पद्धतीनुसार (पाश्चात्त्य पद्धतीनुसार) मेष राशीत प्रवेश करत आहे.
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (६.३.२०२१)
टीप १ – शुक्र पूर्व लोप (अस्त), अमृत योग, दग्ध योग, भद्रा (विष्टी करण), एकादशी, घबाड मुहूर्त, यमघंट, प्रदोष, गुरुपुष्यामृत योग आणि कल्पादि यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.
टीप २ – वरील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत. १. हरिचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ॥ – संत एकनाथअर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो. २. तुका म्हणे हरिच्या दासा । शुभ काळ दाही दिशा ॥ – संत तुकारामअर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’ ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्वर घेतो.’ |