राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह २० जणांवर खुनाचा गुन्हा नोंद
सातारा, १३ मार्च (वार्ता.) – खटाव तालुक्यातील पडळ गावातील खटाव-माण साखर कारखान्यातील प्रोसेसिंग विभागाचे प्रमुख जगदीप थोरात यांना मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीमध्ये थोरात यांचा मृत्यू झाला. संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह कह्यात घेणार नसल्याचा पवित्रा थोरात यांच्या नातेवाईकांनी घेतला होता. वडूज पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर थोरात यांच्यावर नातेवाइकांनी अंत्यसंस्कार केले. या प्रकरणी नातेवाइकांनी तक्रारी दिल्या होत्या. त्यानुसार वडूज पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, कार्यकर्ते मनोज घोरपडे, संग्राम घोरपडे यांच्यासह २० जणांवर थोरात यांचा खून केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणी वडूज पोलिसांनी आतापर्यंत ६ जणांना अटक करून न्यायालयापुढे उपस्थित केले. न्यायालयाने या ६ जणांना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.