परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी साधकांना केलेले मार्गदर्शन
प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. १२ मार्च या दिवशी ‘साधनेविषयी शंकांचे निरसन’ हा विषय पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.
भाग ५
भाग ४. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/458455.html
२. साधनेविषयी शंकांचे निरसन
२ ऐ. साधना सांगणार्याची गोष्ट ऐकल्यामुळे स्वेच्छा नष्ट होऊन ईश्वरेच्छा लक्षात येते !
श्री. आकाश गोयल : ‘जयपूरमध्ये रहाणार्या माझ्या आईला कधी कधी एकटेपणा जाणवतो. त्यामुळे आई म्हणते, ‘‘तू उत्तर भारतात येऊन सेवा कर.’’ माझ्या सेवेचे ठिकाण दक्षिण भारतात भाग्यनगर येथे म्हणजे पुष्कळ दूर आहे. मी तिला समजावण्याचा प्रयत्न करतो की, जेथे राहून सेवा करणे आवश्यक आहे, ती तेथेच करावी लागेल. काही काळाने पुन्हा तिच्या मनात तो विचार येतो की, ‘मी उत्तर भारतात यावे.’ नंतर तीच म्हणते, ‘‘बरं, ठीक आहे, जशी ईश्वराची इच्छा आहे, तसे होऊ दे.’’
परात्पर गुरु डॉक्टर : आई सांगते, ते विचार तू मनात ठेवत नाहीस ना ?
श्री. आकाश गोयल : नाही.
परात्पर गुरु डॉक्टर : पुष्कळ छान. ‘मुलाने असे करावे’, ही आईची स्वेच्छा आहे. स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्वरेच्छा असे टप्पे आहेत. आपल्या इच्छेने झाडाचे एक पानसुद्धा हलत नाही, तर आपल्या इच्छेने, म्हणजेच स्वेच्छेने दुसर्यांमध्ये पालट होऊ शकेल का ? कधीच नाही. स्वेच्छा असायला नको. दुसरी परेच्छा आहे. सहसाधक, आपले उत्तरदायी साधक, आपल्याला साधना सांगणारे किंवा शिकवणारे आहेत, त्यांचे ऐकत रहायचे. ही झाली परेच्छा. त्यामुळे आपली स्वेच्छा नष्ट होते, हा लाभ आहे. स्वेच्छा नष्ट झाली की, ‘ईश्वरेच्छा काय आहे ?’, ते समजते, म्हणजे संत, महात्मा बनता येते !
२ ओ. साधनेच्या उद्देशाने प्रयत्न केल्यावरच ईश्वर आनंद देतो !
श्री. आनंद जाखोटिया : हे श्री. गुरुराज प्रभु आहेत. प्रयागमध्ये अध्यात्मप्रसाराची सेवा करतात.
परात्पर गुरु डॉक्टर : आता तुझ्या तोंडवळ्यावर पूर्वीपेक्षा पुष्कळ आनंद दिसून येतो. तू काय केलेस ?
श्री. गुरुराज प्रभु : आपली कृपा आहे.
परात्पर गुरु डॉक्टर : तुम्ही काही तरी प्रयत्न केलेच असतील ना ? त्यामुळेच ईश्वराची कृपा होते. पहिले पाऊल आपले असायला पाहिजे. नंतर ईश्वर दहा पावले चालून आपल्याकडे येतो.
२ औ. श्रीगुरूंना स्थुलातून भेटण्याची आवश्यकता न वाटणे, हे प्रगतीचे लक्षण आहे !
श्रीमती जुवेकर : परात्पर गुरुदेव, ‘मागील वेळी आपल्याला भेटतांना आणि या वेळी आपल्याला भेटतांना तुलनेत मनाची स्थिती चांगली आहे’, असे वाटते.
परात्पर गुरु डॉक्टर : तोंडवळा (चेहरा) हा मनाचा आरसा असतो ना ! ते दिसून येत आहे.
श्रीमती जुवेकर : गुरुदेव, या वेळी तुम्हाला भेटण्याची वेळ आली, तर मनाला संवेदना जाणवल्या नाहीत. म्हणजे आपल्याला भेटण्याचा जो आनंद व्हायला पाहिजे ना, तसे मला काही झाले नाही. असे का झाले ? म्हणजे अशी भेटण्याची एक ओढ वाटायला पाहिजे; परंतु असे वाटले की, ‘मी आपल्याशी सूक्ष्मातून बोलतच असते’, तर त्यातच ….
परात्पर गुरु डॉक्टर : सूक्ष्मातून बोलणे महत्त्वाचे आहे. आपण स्थुलातून किती वेळा कुणाला भेटू शकतो ? भेटणे, बघणे आणि बोलणे त्यात काय आहे ? आरंभी वाटते, ‘मला गुरुदेवांना भेटायचे आहे, त्यांच्याशी बोलायचे आहे.’ पुढे त्याची किंमत रहात नाही. जिथे आपण आहोत, तिथे नामजप चालू आहे, साधना चालू आहे, तर आनंद आहे. कुणाला भेटून आनंद आणखी वाढणार आहे का ? हा पुढचा टप्पा झाला. सूक्ष्मातून बोलल्यामुळे ‘आपण निर्गुणाकडे जात आहोत’, असा अर्थ होतो. तुमचे चांगले चालले आहे. त्याची काळजी करू नका. हे साधनेतील प्रगतीचे लक्षण आहे.
२ अं. ६० टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केल्यानंतर मनोलय होण्याला आरंभ झाल्यामुळे मनात प्रश्न येत नाहीत !
श्री. विजय रेवणकर (६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले साधक) : मला काहीच विचारायचे नाही.
परात्पर गुरु डॉक्टर : पुष्कळ छान आहे. साधक साधनेत पुढे पुढे जातात, तेव्हा काय होते ? मनात प्रश्नच निर्माण होत नाहीत आणि निर्माण झाले, तर त्यांचे उत्तर आपोआप मिळते. असे पुढे जाऊन ६० टक्के आध्यात्मिक पातळी झाल्यानंतर मनोलय होऊ लागतो. बुद्धीमुळे मनात प्रश्न येतात. मनच नष्ट होऊ लागते, तेव्हा प्रश्न कुठे असणार ? आणखी प्रश्न विचारत राहिले, तर अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. अनंत जन्मांंत प्रश्नच-प्रश्न निर्माण होत रहातील. त्यापेक्षा हे ठीक आहे. मनात प्रश्नच नाहीत. नामजप करणे, सांगितलेली सेवा करणे, साधना मनोभावे करणे आणि त्यातून जो आनंद मिळत आहे, त्या आनंदातच रहायचे बस ! ‘माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली’, हे ध्येय होऊ शकत नाही. सच्चिदानंदावस्था हे ईश्वरप्राप्तीचे ध्येय असायला पाहिजे !
(क्रमश:)