‘लॉकडाऊन’ शब्दाची भुरळ !
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परदेशांत दळणवळण बंदी लागू करण्यात आली होती. भारतातील कोरोनाच्या संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेत त्या विषाणूची साखळी तोडण्यासाठी येथेही ‘दळणवळण बंदी’ लागू केली होती. या सर्वांचे स्मरण करून देण्याचे कारण म्हणजे कोरोनाच्या निमित्ताने ‘लॉकडाऊन’ या नवीन इंग्रजी शब्दाची झालेली ओळख. ! आधीच इंग्रजी भाषा आणि शब्द यांचा भडिमार चालू आहे. त्यात आणखी एका नवीन शब्दाची भर पडली. ज्या देशांची मूळ भाषा इंग्रजी आहे, त्यांनी ‘लॉकडाऊन’ हा शब्दप्रयोग करणे समजण्याजोगे आहे; मात्र भारतातही तो शब्द सरकार, प्रसारमाध्यमे, तसेच सामाजिक माध्यमे यांच्याकडून सर्रासपणे उपयोगात आणला गेला आणि आजमितीस तोच शब्द प्रत्येकाकडून उच्चारला जात आहे.
‘लॉकडाऊन’ या शब्दाला मराठी भाषेत ‘दळणवळण बंदी’ अथवा ‘टाळेबंदी’, असे शब्द आहेत. त्यांचा उपयोग करण्यात मराठीजनांनाच संकोच वाटतो. किंबहुना यांपैकी अनेकांना ‘लॉकडाऊन’ला मराठी शब्द कोणता आहे ? याचीही कल्पना नाही. असे असले, तरी योग्य तो शब्द जाणून घेण्याची जिज्ञासाही नाही. त्यामुळे इतरांप्रमाणे ‘लॉकडाऊन’ या इंग्रजी शब्दाचा घोषा लावण्याकडेच कल आहे. ‘इंग्रजी शब्दांचा उपयोग म्हणजे पुढारलेपणा आणि मराठी शब्दांचा उपयोग करणे म्हणजे वैचारिक मागासलेपणा’, असा चुकीचा विचार मराठीजनांवर बिंबला आहे. याची प्रचीती अनेकदा येत असते. आपल्या स्वतःला बोलत असतांना वापरलेला इंग्रजी शब्द लिहिता येत नसला, तरी चालेल; पण ‘बोलतांना इंग्रजी शब्दच कसा उच्चारला जाईल, याची काळजी घेतली जाते कि काय ?’ असे वाटावे, अशी दु:स्थिती आहे. भाषा कोणत्या देशाची आणि ती बोलत आहेत कोणत्या देशाचे लोक ? हा निवळ हास्यास्पद प्रकार आहे. चारचौघांत ‘दळणवळण बंदी’ या शब्दाचा उपयोग केला, तर ऐकणारे हसतील आणि आपली टिंगल करतील, असे गृहीत धरून ‘लॉकडाऊन’ या शब्दाचीच कास धरणारेही आहेत. इंग्रजी शब्दांचा उपयोग करतांना सहजपणे होतो; मात्र मराठी शब्दाचा उपयोग करतांना तसे होत नाही. तिथे प्रतिमा आड येते. तिच बाजूला ठेवत सात्त्विक भाषा असलेल्या मराठीची कास धरूया आणि तिचे संवर्धन करूया !
– श्री. जयेश राणे, भांडुप, मुंबई