धर्माचरणी आणि साधनेची आवड असणारे चंद्रपूर येथील श्री. अक्षय केळोदे अन् सेवेची तळमळ आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर अपार श्रद्धा असलेली वर्धा येथील सौ. अनुश्री केळोदे !
वर्धा येथील साधिका सौ. अनुश्री केळोदे (पूर्वाश्रमीची कु. श्वेता जमनारे) आणि वरोरा (जिल्हा चंद्रपूर) येथील चि. अक्षय केळोदे यांचा ३०.१.२०२० या दिवशी विवाह झाला. यानिमित्त सौ. अनुश्री यांच्या आई-वडिलांना आलेल्या अनुभूती आणि उभयतांविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. अनुभूती – ‘ईश्वराच्या इच्छेविना काहीच होऊ शकत नाही’, हे ठाऊक असल्याने मुलीच्या विवाहाची काळजी न वाटणे आणि परात्पर गुरुदेवांच्या कृपेने योग्य स्थळ मिळणे
‘मागील ४ – ५ वर्षांपासून श्वेतासाठी स्थळ शोधणे चालू होते. आम्हाला ‘जावई आणि त्यांचे कुटुंबीय साधना करणारे असावेत’, असे वाटत होते. ‘ईश्वराच्या इच्छेविना काहीच होऊ शकत नाही’, हे ठाऊक असल्याने ‘मुलीचा विवाह जुळत नाही’, याचा आम्हाला कधीही ताण आला नाही. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने आम्हाला अपेक्षित असे स्थळ मिळाले. जावई धर्माचरण आणि साधना करणारे, तसेच समजूतदार, कुटुंबातील इतरांची काळजी वाहणारे आहेत. त्यांच्या कुटुंबातील आई आणि भाऊ हेसुद्धा सात्त्विक असून साधना करणारे आणि प्रेमळ आहेत.
२. जावई श्री. अक्षय केळोदे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
२ अ. धर्माचरणी आणि साधनेची आवड : श्री. अक्षय (जावई) प्रतिदिन सकाळी उठल्यावर देवाला, तसेच आईलाही नमस्कार करतात. ‘प्रत्येक व्यक्तीमध्ये ईश्वराचा अंश आहे’, असा त्यांचा भाव आहे. त्यामुळे ते थोरामोठ्यांना वाकून नमस्कार करतात. त्यांना कपाळावर कुंकू लावायला आवडते. ते प्रतिदिन हनुमान चालिसा म्हणतात, तसेच शनिवारी उपवासही करतात. त्यांना भक्तीगीते आणि भावगीते ऐकायला आवडते. त्यांना ३१ डिसेंबरला नववर्ष साजरे करून पाश्चात्त्य प्रथेचे आचरण करायला आवडत नाही. याउलट धार्मिक सण, व्रते आणि उत्सव ते आनंदाने साजरे करतात.
२ आ. प्रेमळ : कुटुंबीय, तसेच इतर लोकांना साहाय्य करणे, त्यांची काळजी घेणे, हे गुण श्री. अक्षय यांच्यात आहेत.
२ इ. पुढाकार घेणे : श्री. अक्षय यांना कोणतेही काम सांगितल्यानंतर ते त्वरित स्वीकारून तशी कृती करतात. कौटुंबिक, सामाजिक किंवा आध्यात्मिक कार्यात ते पुढाकार घेतात आणि दायित्व घेऊन ते कार्य पूर्ण करतात.
‘हे गुरुदेवा, आम्हाला अपेक्षित अशा कुटुंबाशी आमचे स्नेह जुळून आले, यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
३. सौ. अनुश्री केळोदे (पूर्वाश्रमीची श्वेता)
३ अ. प्रेमभाव : ‘श्वेतातील प्रेमभावामुळे ती सर्वांशी जवळीक साधते. वेगवेगळे पदार्थ बनवणे आणि ते इतरांना खायला घालणे तिला आवडते. त्यामुळे नातेवाईक आणि साधक यांना ती विशेष आवडते.
३ आ. नियोजनकौशल्य : श्वेतामध्ये नियोजनकौशल्य असल्यामुळे ती कोणतेही नियोजन परिपूर्ण करते. तिचे हस्ताक्षरही सुंदर आहे.
३ इ. सेवेची तळमळ : श्वेताला सनातन संस्थेच्या कार्याची तळमळ आहे. हिंदु जनजागृती समितीशी संबंधित कार्य, प्रसिद्धी सेवा, स्वरक्षण प्रशिक्षण वर्ग घेणे आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे आदी सेवा ती नियमितपणे अन् आनंदाने करते.
३ ई. संतांप्रती भाव : परात्पर गुरु डॉक्टरांवर तिची अपार श्रद्धा आहे, तसेच सनातनच्या संतांविषयीही तिचा भाव आहे.
अनुभूती : श्वेताविषयी सूत्रे लिहून देतांना मन निर्विचार आणि शांत होते. मला सतत आनंद जाणवत होता.’
४. श्वेताच्या विवाहाच्या वेळी आलेल्या अनुभूती
४ अ. विवाह ठरल्यापासून सर्व गोष्टी आध्यात्मिक स्तरावर आणि सहजतेने पार पडणे : विवाह ठरल्यापासून कुलदेवतेचे दर्शन, तसेच विवाहाचे सर्व विधी शास्त्रोक्त पद्धतीने आणि सहजतेने पार पडले. प्रत्येक कृती भावपूर्ण रितीने होत होती. या कालावधीत नामजप, प्रार्थना आणि कृतज्ञता सतत वाढल्याने घरात प्रसन्नता अन् आनंद जाणवत होता. कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक यांनाही आनंद जाणवत होता. विवाहाच्या वेळी घरात पुष्कळ जण असूनही जराही गडबड, धावपळ किंवा अशांतता जाणवली नाही.
४ आ. विवाहसोहळा सात्त्विक वातावरणात पार पडणे : मुलाकडील मंडळींना ‘हा विवाह आध्यात्मिक स्तरावर व्हावा’, असे वाटत होते. त्यामुळे त्यांनी कोणतीही अयोग्य कृती केली नाही. फटाके फोडणे, अक्षता फेकणे आदी गोष्टी टाळल्या. त्यांच्या सहकार्यामुळे सनई-चौघड्याच्या सात्त्विक सुरांमध्ये विवाह विधी पार पडला. लग्नस्थळी सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. नातेवाईक आणि समाजातील परिचित यांनी त्याचा लाभ घेतला. अनेकांनी ‘लग्न चांगले झाले’, असे सांगितले, तसेच ग्रंथ आणि सात्त्विक साहित्य यांच्या भेटवस्तू आवडल्याचे सांगितले.
‘हे गुरुदेवा, कर्ते-करविते तुम्हीच आहात. ‘तुमच्याविना आम्ही काहीच करू शकत नाही’, याची प्रचीती आम्हाला क्षणोक्षणी आली. हे गुरुदेवा, तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– गुरुचरणसेवक,
– श्री. दीपक जमनारे आणि सौ. सुनीता जमनारे (सौ. अनुश्री यांचे आई-वडील), वर्धा (११.२.२०२०)
५. श्री. दीपक जमनारे यांनी पत्नी आणि नातेवाईक यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता
‘विवाहाचे सर्व नियोजन माझी पत्नी सौ. सुनीता हिने सनातन संस्थेच्या शिकवणीप्रमाणे केले. माझ्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक यांनी आम्हाला भरभरून साहाय्य केले. त्यामुळे त्यांच्याविषयी मला कृतज्ञता वाटते.’ – श्री. दीपक रामकृष्ण जमनारे, वर्धा
श्री. अक्षय केळोदे आणि सौ. अनुश्री केळोदे यांची वर्धा येथील सनातनच्या साधकांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये
१. श्री. अक्षय केळोदे
१ अ. धर्माभिमानी : ‘श्वेताने (सौ. अनुश्री केळोदे यांनी) श्री. अक्षयना १ जानेवारीला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. याविषयी त्यांनी विचारल्यावर तिने सांगितले, ‘‘नवीन वर्ष गुढीपाडव्याला असते.’’ श्वेताचे हे उत्तर त्यांना आवडले. त्यानंतर ‘मला हवी तशी सहचारिणी मिळाली’, असे ते म्हणाले.’
– कु. अर्चना निखार, सौ. विजया भोेळे आणि सौ. वनिता किरसान
१ आ. मितभाषी आणि नम्र स्वभाव : ‘श्री. अक्षय मितभाषी आहेत. लग्नापूर्वी एका नातेवाइकाच्या लग्नात त्यांची भेट झाली होती. त्या वेळी ते धर्माचरणी असून ‘नम्रता’ आणि ‘मोठ्यांना मान देणे’, हे गुुण त्यांच्यात आहेत’, असे माझ्या लक्षात आले.’ – सौ. मंदाकिनी डगवार
२. सौ. अनुश्री केळोदे (पूर्वाश्रमीची श्वेता)
२ अ. नम्रपणा : ‘ श्वेताचा (सौ. अनुश्री यांचा) आवाज गोड आहे. तिच्यातील ‘नम्रता’ या गुणामुळे तो ऐकावासा वाटतोे. तिच्या बोलण्यात मनमोकळेपणा आहे. ती कधीही मोठ्या आवाजात किंवा अधिकारवाणीने बोलत नाही. अध्यात्मप्रसाराची सेवा करतांना तिची वागणूक साधकत्वाला धरून असते. तिच्या वागण्या-बोलण्यात व्यवस्थितपणा आहे.
२ आ. समजूतदारपणा : एकदा तिच्या कुटुंबातील सर्वजण प्रवासासाठी लांब जाणार होते. त्या वेळी ती त्यांच्यासमवेत प्रवासाला न जाता आजोबांना सांभाळण्यासाठी घरी राहिली.
२ इ. आईला घरकामांत साहाय्य करणे : श्वेता लहानपणापासून आईला घरकामांत साहाय्य करते. आईला सेवेसाठी घराबाहेर किंवा बाहेरगावी जाण्यासाठी तिने कधीही आडकाठी केली नाही. आई सेवेला गेल्यावर ती घरातील कामे करायची. एक दिवस तिची आई सेवेला बाहेर गेल्यावर त्यांच्याकडे १५ – २० पाहुणे आले होते. तेव्हा तिने आम्हाला भ्रमणभाषवर विचारून त्यांच्यासाठी स्वयंपाक केला.
२ ई. प्रत्येक सेवा आनंदाने करणे : तिच्याकडे अध्यात्मप्रसाराच्या कार्यासाठी लागणार्या वस्तूंचे दायित्व होते, तसेच ‘सनातन कार्या’च्या वार्ता स्थानिक वृत्तपत्रांना प्रसिद्धीसाठी देण्याची सेवा होती. या सेवा तिने आनंदाने केल्या. तिने अनेक कार्यक्रमांत सूत्रसंचालनाची सेवाही केली आहे.
२ उ. महाविद्यालयात जात असलेली श्वेता साधना करत असल्याने वाचकांना तिचे कौतुक वाटणे : ती साप्ताहिक, तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करायची. ‘सनातन प्रभात’च्या वाचकांशी तिची जवळीक होती. ते तिला कौतुकाने म्हणायचे, ‘तू महाविद्यालयात जातेस, अभ्यास करतेस, तरी ईश्वराच्या कार्याची सेवाही करतेस. आताच्या मुलांना हे करायला आवडत नाही.’
– सौ. मंदाकिनी डगवार, सौ. वनिता किरसान आणि सौ. विजया भोळे (१०.२.२०२०)
२ ऊ. यजमान रुग्णाईत असतांना श्वेताने त्यांना रुग्णालयात नेणे आणि त्यांची काळजी घेणे : ‘श्वेता एकदा माझ्या घरी आली होती. त्या वेळी तिला श्री. डगवार रुग्णाईत असल्याचे समजले. तेव्हा ती त्यांना चिकित्सालयात घेऊन गेली आणि तेथे पूर्णवेळ थांबली. घरी आल्यावरही तिने त्यांची विचारपूस करणे, त्यांना नारळपाणी आणून देणे आदी सेवा केल्या.’
– सौ. मंदाकिनी डगवार