अनधिकृत ‘धिर्यो’ची पशूसंवर्धन खात्याने स्वेच्छा नोंद घेऊन पोलिसांना दिली कारवाईसंबंधीची सूचना
पणजी – राज्यात ठिकठिकाणी अनधिकृतपणे होत असलेल्या ‘धिर्यो’संबंधी (बैलांची झुंज) वृत्तपत्रांमध्ये सातत्याने प्रसिद्ध होत असलेली वृत्ते, तसेच प्राणीप्रेमींनी केलेल्या तक्रारी यांची राज्यातील पशूसंवर्धन खात्याने स्वेच्छेने नोंद घेतली आहे. या प्रकरणी पशूसंवर्धन खात्याने दक्षिण आणि उत्तर गोवा पोलीस यांना पत्र लिहून ‘धिर्यो’वर कारवाई करण्याची मागणी लेखी स्वरूपात केली आहे. ‘पीपल फॉर अॅनिमल’ या प्राणीप्रेमी संघटनेनेही ‘धिर्यो’वर कारवाई करण्याची मागणी पशूसंवर्धन खात्याकडे केली आहे.
पशूसंवर्धन खात्याने पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दक्षिण गोव्यात कोलवा, फातोर्डा, मडगाव, वेर्णा, तसेच उत्तर गोव्यात पेडणे, बार्देश आदी भागांत मोठ्या प्रमाणात ‘धिर्यो’चे आयोजन केले जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने वर्ष १९९६ मध्ये ‘धिर्यो’च्या आयोजनाबर प्रतिबंध घातला आहे. या प्रकरणी प्राणीप्रेमी तथा अधिवक्त्या नॉर्मा आल्वारीस यांनी ‘धिर्यो’चे आयोजन करून न्यायालयाचा अवमान केल्याची कायदेशीर नोटीस संबंधितांना बजावली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दक्षिण आणि उत्तर गोवा येथे ‘प्राणी अत्याचार प्रतिबंध कायदा १९६०’चे काटेकोरपणे पालन करून ‘धिर्यो’चे आयोजन करण्यावर प्रतिबंध घालावा.
याविषयी पशूसंवर्धन खात्याचे संचालक डॉ. आगोस्तिनो मिस्किता प्रसारमाध्यमांना म्हणाले, ‘‘प्राण्यांवरील अत्याचार बंद होण्यास आणखी काही कालावधी लागेल. पोलिसांना पत्र पाठवण्यात आले आहे. नागरिकांचे या विषयावर प्रबोधन व्हायला काही कालावधी लागू शकतो; मात्र एक दिवस प्राण्यांवरील सर्व अत्याचार बंद होतील.’’