गोव्यात युवती घर सोडून ‘ऑनलाईन’ प्रियकरासमवेत जाण्याचे वाढते प्रकार !
पालकांचा मुलींसमवेत घरी सुसंवाद होत नसल्याचा दुष्परिणाम !एकत्र कुटुंबपद्धत नसल्याचा, मुलांना सुसंस्कारित करण्याकडे लक्ष न देता मुलांचे लाड करतांना त्यांना ‘स्मार्ट फोन’ दिल्याचा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वातंत्र्यानंतर समाजाला धर्मशिक्षण न दिल्याचा हा परिणाम आहे ! |
पणजी, ११ मार्च (वार्ता.) – गोव्यात १३ ते १७ वर्षे वयोगटातील युवती घर सोडून ‘इन्स्टाग्राम’ आदी सामाजिक माध्यमांतून प्रेमात पडलेल्या युवकासमवेत जात असल्याच्या घटना वाढत आहेत. बांबोळी येथील ‘वन स्टॉप सेंंटर’ (ओ.एस्.सी.) येथे प्रत्येक मासाला अशा स्वरूपाच्या अनुमाने ५-६ तक्रारी येत आहेत. पालक युवती बेपत्ता झाल्याची पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट करून ‘ओ.एस्.सी.’कडे संपर्क साधतात. विशेष म्हणजे या युवती कायद्याने सज्ञान झालेल्या नाहीत. या सर्व प्रकरणांमध्ये बेपत्ता होणारी युवती आणि तिचे पालक यांच्यामध्ये सुसंवाद होत नसल्याचे उघड झाले आहे. पालकांचे दुर्लक्ष होत असल्याचे या सर्व घटनांमध्ये समोर आले आहे. ‘ओ.एस्.सी’ कडे आलेल्या काही घटना पुढे देत आहे.
१. नुकतेच म्हापसा येथील १४ वर्षीय मुलगी घरून वास्को येथे तिच्या प्रियकराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली. ही युवती ‘इन्स्टाग्राम’च्या माध्यमातून त्याच्या प्रेमात पडली होती. युवतीचा शोध घेतला असता ती दुसर्या दिवशी प्रियकारासमवेत सापडली.
२. गतवर्षी दळणवळण बंदीच्या काळात एका १३ वर्षीय युवतीने प्रवासासाठी सर्व प्रकारचे निर्बंध असतांनाही तिच्या पालकांच्या वाहनाने कर्नाटकमध्ये तिच्या प्रियकराला भेटायला गेली. या मुलीला ‘ओ.एस्.सी.’चे पदाधिकारी कर्नाटक येथे परत आणायला जातांना त्यांना सर्व प्रकारच्या निर्बंधांना सामोरे जावे लागले.
३. अन्य एका प्रकरणात एका शालेय शिक्षण घेणार्या युवतीने घरी अभ्यास करणे आणि संवाद साधणे यांसाठी म्हणून पालकांकडून महागड्या किमतीचा भ्रमणभाष घेतला. भ्रमणभाषच्या माध्यमातून अभ्यास करणे शक्य आहे, असे तिने पालकांना पटवून दिले. या प्रकरणी युवती प्रियकरासमवेत गेल्यानंतर ‘ओ.एस्.सी.’च्या साहायाने तिला परत आणण्यात आले.
याविषयी अधिक माहिती देतांना ‘ओ.एस्.सी.’च्या समन्वयक इमिडियो पिन्हो म्हणाल्या, ‘‘बहुतेक प्रकरणांत पालक सुशिक्षित आहेत आणि त्यांची आर्थिक स्थितीही चांगली आहे; मात्र त्यांचा पाल्यांशी सुसंवाद नाही. पालकांना त्यांच्या पाल्यांच्या भ्रमणभाषमध्ये कोणते ‘फिचर’ आहेत, कोणते लिखाण आहे आणि युवती इंटरनेटवर काय पहातात ? याविषयी कोणतीच कल्पना नसते.’’ ‘ओ.एस्.सी.’ ही केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या साहाय्याने स्थापन झालेली एक संस्था आहे. या संस्थेद्वारे गरजूंना पोलिसांचे सहकार्य देणे, वैद्यकीय साहाय्य पुरवणे, समुपदेशन करणे आणि कायदेशीर साहाय्य करणे आदी सुविधा पुरवल्या जातात.