मनकर्णिका कुंडावरील अतिक्रमण हटवा; अन्यथा शिवसेना पद्धतीने ते हटवू ! – शिवसेनेची चेतावणी

कोल्हापूर – करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या पुढे कुणीही मोठे नाही. मंदिराच्या उत्खननाच्या कामात आडकाठी आणू नका. मनकर्णिका कुंडावरील १० फूट अतिक्रमण तातडीने काढून घ्या; अन्यथा शिवसेना पद्धतीने ते हटवू, अशी चेतावणी शिवसेनेच्या वतीने ‘माऊली लॉज’च्या मालकांना देण्यात आली. कुंडाच्या ठिकाणी शिवसेनेने केलेल्या आंदोलनात चेतावणी देण्यात आली. या वेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सुजित चव्हाण यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी माऊली लॉजसह परिसरात काही यात्री निवास, धर्मशाळा यांवर लावलेले कन्नड भाषेतील फलक फाडून टाकण्यात आले. संजय पवार म्हणाले, ‘‘महाराष्ट्राची सीमा ओलांडल्यावर एकही फलक मराठीत दिसत नाही. त्यामुळे येथे कन्नड फलक लावण्याचे कारण काय ? मराठी भाषेचा अभिमान आहे कि नाही ? कोल्हापुरात ज्या दुकानांवर कन्नड फलक दिसतील, ते फाडले जातील.’’