साधिकेला कैलास पर्वत आणि मानससरोवर यांचे संदर्भात आलेली अनुभूती
साधिकेला कैलास पर्वत आणि मानससरोवर यांचे दर्शन घेण्याची इच्छा झाल्याने तिने सूक्ष्मातून कैलास प्रदक्षिणा करणे अन् भगवान शिवाने परात्पर गुरु डॉक्टरांनाच प्रदक्षिणा घालून ‘गुरुचरणांशीच सर्व तीर्थे आणि सप्तलोक आहेत’, असे सांगणे
१. कैलास पर्वताचे चित्र पाहिल्यावर ‘कैलास पर्वत आणि मानससरोवर’ यांचे दर्शन घेण्याची इच्छा निर्माण होऊन सूक्ष्मातून दर्शन घेणे
‘एकदा मी कैलास पर्वताचे चित्र पाहिले आणि चित्र पाहिल्यावर ‘कैलास पर्वत आणि मानससरोवर यांचे दर्शन घ्यावे’, अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. त्यानंतर २ – ३ दिवस मी सूक्ष्मातून कैलास पर्वताची प्रदक्षिणा करत होते. तिथे भगवान शिव, पार्वती, श्री गणपति, श्री कार्तिकेय आणि नंदी यांना भेटून या सर्वांची मी मनोभावे पूजा करत होते. त्यांची पूजा करतांना मला पुष्कळ आनंद मिळत होता.
२. एका शिवभक्ताने कैलास पर्वतावरील विभूती, मानससरोवरातील तीर्थ आणि ‘कैलास प्रदक्षिणा’ हा ग्रंथ आणून देणे
त्यानंतर २ – ३ दिवसांनी मला एका शिवभक्ताने कैलास पर्वतावरील विभूती, मानससरोवरातील तीर्थ आणि ‘कैलास प्रदक्षिणा’ हा ग्रंथ दिला. २७ वेळा कैलास मानससरोवरची प्रदक्षिणा केलेल्या श्री. शंकर वैद्य यांनी हा ग्रंथ लिहिला होता. माझ्यासाठी ही पुष्कळ मोठी अनुभूती होती. कैलास प्रदक्षिणेला जाण्यापूर्वीच देवाने मला प्रसाद आणि आशीर्वाद दिला होता.
३. भगवान शिवाने ‘आज मीही तुझ्या समवेत प्रदक्षिणा घालणार’, असे सांगून माता पार्वती, श्री गणपति, श्री कार्तिकेय आणि नंदी यांच्यासह परात्पर गुरुमाऊलीला शरणागतभावाने प्रदक्षिणा घालणे
त्यानंतर मी नेहमीप्रमाणे कैलास पर्वताची सूक्ष्मातून प्रदक्षिणा करू लागले. तिथे ‘शिव-पंचायतन’ही होते. भगवान शिवाने मला सांगितले, ‘आज मीही तुझ्या समवेत प्रदक्षिणा घालणार आहे.’ ‘शिव-पंचायतना’तील माता पार्वती, श्री गणपति, श्री कार्तिकेय आणि नंदी यांनीही माझ्या समवेत कैलास प्रदक्षिणा करण्याचा मानस व्यक्त केला. नंतर भगवान शिवाने सूक्ष्म रूपाने आम्हाला रामनाथी आश्रमातील परात्पर गुरुदेवांच्या खोलीत नेले. भगवान शिवाने खोलीबाहेर उभे राहून आत जाण्याची अनुमती घेतली. नंतर आम्ही सर्वांनी आत जाऊन आसंदीवर बसलेल्या परात्पर गुरुमाऊलीची पुष्कळ शरणागतभावाने परिक्रमा केली. (प्रदक्षिणा घातली.)
४. भगवान शिवाने वर्णिलेले गुरुचरणांचे महत्त्व !
भगवान शिवाने मला सांगितले, ‘तुझ्या गुरूंच्या चरणांच्या अंगठ्यामध्येच सर्व तीर्थे सामावली आहेत. सप्तलोकांतील सर्व लोक त्यांच्या चरणांशीच आहेत, तर तू आणखी काय शोधत आहेस ? गुरुचरणी संपूर्णपणे शरण जाऊन तन, मन आणि बुद्धी यांचा त्याग केलास, तर तुला अन्य कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. तुला गुरुचरणांशीच सर्वकाही मिळणार आहे.’
ही अनुभूती गुरूंची महती दृढ करण्यासाठी आणि माझे मन गुरुचरणी स्थिर करण्यासाठीच होती. त्यानंतर मी गुरुमाऊलीची क्षमा मागितली, ‘हे गुरुमाऊली, माझ्यासारख्या क्षुद्र जिवाला तुमचे अवतारत्व कळत नाही, तरीही तुम्ही माझ्यावर सतत कृपा करता.’ ही अनुभूती दिल्याविषयी मी तुमच्या श्री चरणांवर पुष्प अर्पण करते आणि प्रार्थना करते, ‘मला सतत तुमची कृपा संपादन करण्याचा ध्यास लागू दे.’
– सौ. धनश्री प्रदीप केळशीकर, ठाणे, महाराष्ट्र. (५.९.२०१८)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |