परिपूर्ण सेवा करणार्या वाराणसी सेवाकेंद्रातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. श्रेया प्रभु !
१. प्रेमभाव
१ अ. ‘साधकाची प्रकृती आणि त्याच्या मनाची स्थिती’, याचा अभ्यास करून सूत्र सांगणे : ‘सौ. श्रेयाताई अत्यंत प्रेमळ आहेत. त्या प्रत्येक साधकाला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या स्तरांवर सांभाळून घेतात. प्रत्येक साधकाला त्यांचा आधार वाटतो. त्या प्रत्येक साधकाची परिस्थिती, त्याची प्रकृती आणि त्याचा स्वभाव यांचा अभ्यास करतात. एखाद्या साधकाला काही सूत्रे सांगायची असल्यास ‘त्याची प्रकृती आणि त्याच्या मनाची स्थिती’, याचा अभ्यास करून संबंधित साधकाला त्या सूत्रे सांगतात. अनेक प्रसंगांमध्ये लक्षात येते, ‘साधकही श्रेयाताईने सांगितलेल्या गोष्टी सहजतेने स्वीकारतात.’
१ आ. साधकाच्या प्रकृतीचा अभ्यास करून त्यांना साहाय्य करणे : काही साधकांकडून काही वेळा समयमर्यादेत सेवा पूर्ण झाली नाही किंवा काही साधकांकडून काही चुका झाल्यास श्रेयाताई ‘साधकाकडून अशी चूक होण्यामागे काय कारण आहे ? त्याच्या मनाची स्थिती ठीक होती ना ? त्याला सेवा नीट समजली होती का ?’, असा अभ्यास करून उपाययोजनेचा विचार करतात. यावरून मला शिकायला मिळाले, ‘सर्वांत प्रथम आपण साधकांचा चांगला अभ्यास करायला पाहिजे आणि त्यानंतर ‘साधकांना साहाय्य होईल’, अशा तर्हेने सांगितले पाहिजे.’
२. परिपूर्ण सेवा करणे
श्रेयाताई प्रत्येक सेवा चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करतात. त्या ‘सेवा चांगली आणि सुंदर व्हावी अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी व्हावी’, असा प्रयत्न करतात. त्या युवा साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टर त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत’, असे वाटते.
३. विचारण्याची वृत्ती
साधकांनी त्यांना काही सूत्रे विचारल्यास त्या उत्तरदायी साधकांना विचारून संबंधित साधकांना उत्तर देतात.
४. शिकण्याची वृत्ती
त्या साधकांकडून आणि प्रसंगातून शिकण्याच्या स्थितीत रहातात.
५. श्रेयाताई सत्संगात भावपूर्ण दृष्टीकोन देतात. त्यांनी दिलेले दृष्टीकोन ऐकून साधकांची परात्पर गुरुदेवांप्रती श्रद्धा अधिकाधिक दृढ होते.
आपण म्हणतो, ‘‘प्रत्येक साधकात परात्पर गुरुदेवांचाच अंश आहे.’’ श्रेयाताईंच्या संदर्भात असेच अनुभवायला येते. परात्पर गुरुदेवांनी आम्हाला गुणवंत आणि भाव असणार्या साधिकेच्या सहवासात रहायला दिल्यानेे मी त्यांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. जया सिंह, वाराणसी सेवाकेंद्र (१३.१.२०२१)
ध्यास असे तिचा गुरुचरणांवरी सर्वस्व अर्पण करण्याचा ।
पौष कृष्ण पक्ष एकादशी (७.२.२०२१) या दिवशी वाराणसी सेवाकेंद्रातील साधिका सौ. श्रेया गुरुराज प्रभु यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांचे वडील श्री. अनिल कुलकर्णी आणि यजमान श्री. गुरुराज प्रभु यांनी त्यांच्यावर केलेली कविता पुढे दिली आहे.
पौष कृष्ण पक्ष एकादशी ।
याची दिनी पाठवले गुरूंनी आमच्या घरी एका जिवासी ।
नाव ठेवले आम्ही तिचे ‘प्राजक्ता’ ।
गुण आहेत तिच्यात आनंद आणि प्रांजळता ॥ १ ॥
अभ्यास असो वा घरकाम ।
मनापासून असते तिचे सर्व काम ।
सेवेसाठी जिथे जिथे ती जाई ।
तेथील सर्वांना ती आपलेसे करून घेई ॥ २ ॥
पूर्वीची प्राजक्ता आता झाली ‘सौ. श्रेया’ ।
ध्यास असे तिचा गुरुचरणांवरी सर्वस्व अर्पण करण्याचा ।
प्रेमळ स्वभावामुळे वाटतो तिचा सर्वांना आधार ।
प्रत्येक गोष्टीत करते ती इतरांचा विचार ॥ ३ ॥
प्रसार असो, वा असो कोणतीही सेवा ।
प्रत्येक क्षण करते ती गुरुसेवेसाठी अर्पण ।
ध्यास असे मनी, कशी करू गुरुसेवा अचूक ।
सेवेमध्ये मग्न झाल्यावर नाही लागत तिला तहान-भूक ॥ ४ ॥
स्वभावदोष असती तिचे भावनाप्रधानता, अपेक्षा अन् भीती ।
ते घालवण्यासाठी सोपवले तिने स्वतःला पू. नीलेशदादांच्या (टीप) हाती ।
कठीण प्रसंगांत सतत करते ती मनन आणि चिंतन ।
त्या वेळी घेते ती सद्गुरु अन् संत यांचे मार्गदर्शन ॥ ५ ॥
अशी आमची प्राजक्ता म्हणजे सौ. श्रेया ।
आपण सारे मिळून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया ।
प्रार्थना असे आमची प.पू. गुरुदेवांच्या चरणी ।
आपल्या आशीर्वादाने होवो तिची शीघ्र आध्यात्मिक प्रगती ॥ ६ ॥
टीप – सनातनचे संत पू. नीलेश सिंगबाळ
– श्री. अनिल कुलकर्णी (वडील), सनातन आश्रम, देवद, पनवेल आणि श्री. गुरुराज प्रभु (पती), वाराणसी (७.२.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |