परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी साधकांना केलेले मार्गदर्शन

प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. १० मार्च या दिवशी ‘साधनेविषयी शंकांचे निरसन’ हा विषय पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.

(भाग ४.)

भाग ३. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/457878.html


(परात्पर गुरु) डॉ. आठवले

२. साधनेविषयी शंकांचे निरसन

२ ऊ. ईश्‍वरप्राप्ती करण्यासाठी पूर्णवेळ साधना करणे आवश्यक आहे !

श्री. चंद्रशेखर सिंह : माझ्या मुलीच्या संदर्भात विचारायचे होते. तिची पूर्णवेळ साधना करण्याची इच्छा आहे. तिच्यामध्ये व्यवस्थितपणा, चांगले व्यवस्थापन हे गुण आहेत. तिला जी सेवा दिली जाते, ती सेवा ती एकाग्रतेने करते. ती सतत सेवा करण्याचा प्रयत्न करते. ती काही वेळा सनातनच्या आश्रमातसुद्धा जाते.

परात्पर गुरु डॉक्टर : चांगले आहे. तिला ईश्‍वरप्राप्ती करायची आहे ! साधना ही अर्धवेळ करण्याची कृती नाहीच, त्यासाठी पूर्णवेळच द्यायला हवा. ती त्या विचारापर्यंत पोचली आहे. हे प्रगतीचे लक्षण आहे. सर्कशीत एक लाकडी फळी टांगलेली असते. ती पकडून एक मुलगी झोके घेते. दुसर्‍या बाजूने एक उलटी टांगलेली व्यक्ती असते. त्या मुलीने ती फळी सोडून दिल्यावरच दुसर्‍या बाजूची व्यक्ती तिला पकडू शकते. जोपर्यंत मायेला आपण पकडून ठेवतो, तोपर्यंत ईश्‍वर आपल्याला कसे पकडणार ? तिचे विचार हे प्रगतीचे लक्षण आहे, असे तिला सांगा; परंतु पूर्णवेळ साधना करण्याचा निश्‍चय झाल्यानंतर काही काळ, म्हणजे १ – २ मासच येथे राहून शिकायचे. जे तिला तिथे शिकायला मिळत नाही, ते तिने आश्रमात शिकायचे आणि त्यानंतर जाऊन अध्यात्माचा प्रचार किंवा जे काही तिला करायचे आहे, ते तिने करावे. त्यात तिला कौशल्य प्राप्त होईल. जे स्वतः करते, ते दुसर्‍यांना शिकवले, तर लवकर प्रगती होईल.

व्यष्टी साधनेच्या संदर्भात सर्वांना शिकवावे लागते ! त्यासाठी तिची थोडीतरी व्यष्टी साधना व्हायला पाहिजे. व्यष्टी साधनेचे महत्त्व तिच्या लक्षात यायला पाहिजे. येथे राहून इतरांना शिकवायचे कसे, ते ती शिकेल. त्यानंतर आपले संत (सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे), नाहीतर अध्यात्मप्रसार करणारे साधक, यांच्या समवेत ती एक दोन मास राहील आणि सर्व शिकेल. नंतर शिकणे परिपूर्ण झाल्यावर आपला दुसर्‍या राज्यात जाऊन प्रसार करू लागेल. तुमची तिच्या पूर्णवेळ साधना करण्याला अनुमती आहे कि नाही ?

श्री. चंद्रशेखर सिंह : हो. ईश्‍वराच्या कृपेने अनुमती आहे. मी तिला म्हटले, ‘तुझी जी इच्छा असेल, तसे कर. आम्ही त्यात अडथळा आणणार नाही.’

परात्पर गुरु डॉक्टर : उद्या किंवा परवा नाही, आजच नाही, तर आता जा आणि तिला सांगा. आता एक-एक सेकंद महत्त्वाचा आहे. तिला आतून साधना करावीशी वाटतेय, तर रोखायचे कशाला ? ‘ज्याला साधना करायची आहे, त्याच्या साधनेत अडथळा आणणे’, हे सर्वांत मोठे पाप आहे. तिचे नियोजन लवकर करा.

श्री. चंद्रशेखर सिंह : मलासुद्धा पूर्णवेळ साधना करण्याची इच्छा आहे.

परात्पर गुरु डॉक्टर : तुम्हाला कुणी रोखले आहे ? दोघेही या. प्रथम एक दोन मासांची सुटी घेऊन प्रयत्न करा. या नवीन जीवनपद्धतीशी जुळवून घेणे शक्य होते का, ते पहा आणि नंतर पूर्णवेळ साधना करा. येथे शिकण्यासाठी यायचे आणि लवकर समष्टीत (समाजात) जाऊन प्रसार करायचा. ‘येऊन इथेच रहायचे’, असे करायचे नाही.

२ ए. ‘साधना केल्यानंतरही प्रगती होत नाही’, या विचाराने निराश न होता फळाची अपेक्षा न करता साधना करायला हवी !

श्री. चेतन जनार्दन : साधनेमध्ये एकेकदा प्रगतीचा विचार येऊन निराशा येते. ४ वर्षे झाली, तरीही माझी प्रगती होत नाही.

परात्पर गुरु डॉक्टर : यामध्ये चूक कोणती आहे ? प्रगतीचा विचार करणे, म्हणजे फळाची अपेक्षा करणे. श्रीमद्भगवद्गीतेत म्हटले आहेच, ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।’ म्हणजे ‘कर्म करतांना फळाची अपेक्षा ठेवू नये.’ प्रगतीचा विचार दूर होण्यासाठी स्वयंसूचना द्यावी. ही स्वयंसूचना नियमितपणे सतत दोन-तीन सप्ताह द्या. नंतर हा स्वभावदोष न्यून होईल.

आणखी एक उदाहरण आहे. दोन व्यक्ती चाकरी करत असतात. दोघांचीही प्रत्येक मासाला ५ सहस्र रुपयांची बचत होते. एकाला कर्ज असल्याने तो प्रति मास ५ सहस्र रुपये कर्जमुक्त होण्यासाठी अधिकोषात भरतो. दुसर्‍या व्यक्तीला कर्ज नव्हते, तो ५ सहस्र रुपये अधिकोषात साठवतो. पहिल्या व्यक्तीचे अधिकोषातील पैसे वाढत नाहीत; पण दुसर्‍या व्यक्तीचे पैसे वाढतात. ‘अरे हा अधिकोषात पैसे ठेवतो, मी ठेवू शकत नाही’, असा विचार पहिल्या व्यक्तीने करून काय लाभ होणार ? हाच दृष्टीकोन ठेवून साधना करायची. ‘त्या साधकाची प्रगती झाली, माझी झाली नाही’, असा विचार करू नये. आपले जे प्रारब्ध आहे, ते न्यून करण्यासाठी साधना वापरली जाते ! कुणाशीही तुलना करायची नाही. आपण केवळ फळाचा विचार न करता साधना करत रहायचे.

श्री. चेतन जनार्दन : म्हणजे प्रथम असे झाले होते की, माझी अधोगती झाली. त्यानंतर माझ्याकडून पुन्हा पहिल्यासारखे प्रयत्न होत नाहीत. मी पुष्कळ गमावले आहे. आता चार वर्षे झाली, तरीही माझ्याकडून साधनेचे प्रयत्न होत नाहीत. ‘माझी पुढे प्रगती होणार नाही’, असे मला वाटते.

परात्पर गुरु डॉक्टर : इथे तीच गोष्ट लागू होते. एकाला लक्षावधी रुपयांचे कर्ज आहे. तो ते फेडण्यासाठी प्रति मास ५ सहस्र रुपये अधिकोशात भरतो. ते फेडायला किती वर्षे जातील ? म्हणजेच तुलना करायची नाही. आपण मनुष्यजन्म घेतला, हे महत्त्वाचे ! ‘आपल्या प्रारब्धात काय आहे’, हे आपल्याला ठाऊक आहे का ? जशी कर्जाची गोष्ट आहे, तशीच प्रारब्धाची गोष्ट असते. साधना करत रहावे. कर्माच्या फळाची अपेक्षा करायची नाही, यासाठी स्वयंसूचना द्या आणि जी सेवा अन् साधना करतो, त्यातून आनंद मिळतो ना, याकडे लक्ष द्या. आपण आनंद मिळवण्यासाठीच साधना केली पाहिजे.

(क्रमश:)