शिवाचे ‘अर्धनारी नटेश्वरा’च्या रूपात झालेले दर्शन आणि शिवाच्या प्रेरणेने ‘अर्धनारी नटेश्वरा’चे सुंदर चित्र रेखाटतांना आलेली अनुभूती
निःशब्द तू, निरंकार तू ।
निर्विकार तू, निरंजन तू ।
असे असूनही चराचरांत व्यापून उरलेला ।
शिवस्वरूप अर्धनारेश्वर तू ॥
१. सायंकाळी शिवाचे अर्धनारी नटेश्वराच्या रूपात दर्शन होणे आणि त्याने ते रूप चित्रबद्ध करण्यास सुचवणे, ‘चित्र रेखाटण्यायोग्य कागद जवळ नाही’, असे त्याला सांगितल्यावर तेव्हा ‘तो कुठे आहे’, हे सांगणे
‘३.३.२०२१ या दिवशी सायंकाळी मला शिवाचे पुष्कळ स्मरण होत होते. मला डोळ्यांसमोर ‘अर्धनारी नटेश्वर’ या रूपातील शिवाचे दर्शन झाले. त्या वेळी ‘प्रत्यक्ष शिवच मला ‘ते रूप चित्रात साकार कर’, असे सांगत आहे’, असे वाटले. प्रथम मी त्या विचारांकडे दुर्लक्ष केले; पण पुनःपुन्हा शिवाचे तेच रूप माझ्या डोळ्यांसमोर येऊन शिव मला ते चित्रबद्ध करण्यास सांगत होता; म्हणून मी शिवाला सांगितले, ‘आत्ता माझ्याकडे चित्र रेखाटण्यायोग्य कागद नाही आणि साध्या कागदावर कसे काढू ?’ तेव्हा शिवाने मला सांगितले, ‘तुझ्या जवळच्या वस्तूंमध्येच तुला कागद मिळेल.’
२. ‘पॅड’ला चांगला कागद लावलेला असणे, त्यावर आधी शिवाचे अर्धे मुख रेखाटले जाणे, नंतर पार्वतीमातेचे मुख रेखाटले जाणे
तेव्हा माझी दृष्टी माझ्याकडे असलेल्या लिखाणाच्या ‘पॅड’कडे गेली. त्याला खाली एक कोरा कागद लावला होता आणि तो चांगल्या प्रतीचा होता. त्यामुळे मी त्या कागदावर चित्र काढायला घेतले. प्रथम मी शिवाचा तोंडवळा काढायला आरंभ केला. आधी माझ्याकडून शिवाचा अर्धा तोंडवळा काढला गेला आणि नंतर अर्ध्या बाजूला पार्वतीचे चित्र रेखाटले गेले; मात्र शिवाच्या नेत्रांपूर्वी पार्वतीचे नेत्र प्रथम रेखाटले गेले. साधारण १० ते १५ मिनिटांमध्येच माझ्याकडून हे चित्र काढून पूर्ण झाले.
३. चित्राच्या माध्यमातून देवाची प्रीती अनुभवता येणे
हे चित्र काढून पूर्ण झाल्यावर माझ्या मनाला एक वेगळीच शांतीची अनुभूती आली. त्यातून मला देवाची प्रीती अनुभवता आली. नंतर काव्य स्वरूपात देवानेच ती शब्दबद्धही केली.
अनादि अनंत असे प्रेम तुझे देवा ।
एकरूपता अशी यावी की, ‘स्व’अस्तित्व विसरून केवळ स्मरण रहावे तुझे देवा ।
प्रेम असे करावे वाटते की, प्रेमाच्या सागरात बुडून ।
सागराच्या प्रत्येक थेंबात अनुभवावे वाटते तुला देवा ॥ १ ॥
प्रेम असे करावे वाटते की, तुझ्या अस्तित्वातच माझी दृष्टी रहावी ।
अन् त्या दृष्टीत ‘तू किती सुंदर आहेस’, हे मी प्रत्येक क्षणी अनुभवावे, असे वाटते देवा ॥ २ ॥
‘अनंत’ हा शब्द, महासागराचा किनारा, ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि शेवट जसे शोधू शकत नाही, त्याप्रमाणे तुझे प्रेम आहे देवा ।
जे अनुभवले मी जरी, तरी समजू शकत नाही, असे वाटते देवा ॥ ३ ॥
प्रेमाची ही व्याख्या किती सुंदर आहे ।
ज्याचा आरंभ ना अंत, असे अनादि प्रेम तुझे आहे देवा ॥ ४ ॥
(प्रेम : ईश्वराविषयी वाटलेली प्रीती)
४. निसर्गातील ईश्वराचे निःशब्द अस्तित्व अनुभवतांना प्रीतीत द्वैत असले, तरी देवाच्या प्रीतीमुळे कृतज्ञताभावात रहाता येत असल्यामुळे मोक्षापेक्षा तेच चांगले वाटणे
वरील काव्य झाल्यावर माझ्या मनाला फार शांत वाटले. मी खोलीच्या आगाशीत जाऊन निसर्गाला न्याहाळले. त्या वेळी मला ईश्वराचे चराचरातील अस्तित्व अनुभवता येत होते. सगळे निःशब्द होते; मात्र शब्दांपलीकडील फार काही त्या क्षणांत साठले होते. तेव्हा मला वाटले, ‘मोक्षापेक्षाही देवावरील प्रीती किती छान वाटते; कारण द्वैत असले, तरी त्यात देवाची प्रीती सामावलेली असल्याने मन नेहमीच कृतज्ञतेत राहू शकते.’
५. प्रार्थना
‘हे गुरुमाऊली, तुम्ही मला देवाची प्रीती अनुभवायला दिली, तरी ती आपल्या प्रीतीने संपृक्त (ओतप्रोत) आहे. ज्या प्रेमाला मी आयुष्यात मुकले, ते प्रेम तुम्ही माझ्यावर मुक्तहस्ते उधळून सूक्ष्मातील आपल्या प्रेमाचा आनंद देऊन मला आपल्या प्रेमाने ऋणी केले. हे ऋण मी कधीही फेडू शकत नाही; कारण ते अमूल्य आहे. गुरुमाऊली, या जिवाचा शरणागत आणि कृतज्ञता भाव आपल्या चरणी सदैव जागृत ठेवा’, हीच आपल्या श्री चरणी प्रार्थना !’
– कु. रजनीगंधा कुर्हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.३.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |