मगोपने प्रविष्ट केलेल्या २ पैकी एक याचिका मागे घेतली
आमदार अपात्रता प्रकरण
पणजी – सध्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर आणि सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभु पाऊसकर यांनी मगोपशी बंडखोरी करून भाजपात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर मगोपने गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे २ अपात्रता याचिका प्रविष्ट केलेल्या दोन्हीही याचिका त्याच मंत्र्यांच्या विरोधात आणि एकाच स्वरूपाच्या होण्याची शक्यता असल्याने यामधील एक याचिका मगोपने १० मार्च या दिवशी मागे घेतली.
याविषयी अधिक माहिती देतांना मगोपचे नेते तथा आमदार श्री. सुदिन ढवळीकर म्हणाले, ‘‘दोन्ही मंत्र्यांच्या विरोधात मगोपने २ निरनिराळ्या याचिका प्रविष्ट केल्या आहेत. गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी यामधील एक याचिका मला मागे घेण्यास सांगितले आहे. या प्रकरणी दुसरी याचिका सभापती राजेश पाटणेकर यांनी ग्राह्य धरली आहे. या प्रकरणी सभापती आता कोणत्याही क्षणी निर्णय देऊ शकणार आहेत.’’ आमदार अपात्रता प्रकरणी सभापती राजेश पाटणेकर यांनी २८ फेब्रुवारी या दिवशी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन याविषयी निर्णय राखून ठेवला आहे.
उपमुख्यमंत्री आजगावकर आणि मंत्री दीपक प्रभु पाऊसकर यांच्याकडून बनावट ठराव सुपुर्द करून सभापतींची दिशाभूल ! – सुदिन ढवळीकर यांचा आरोप
आमदार अपात्रता प्रकरणी प्रसारमाध्यमांशी बोलतांना आमदार श्री. सुदिन ढवळीकर म्हणाले, ‘‘उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक प्रभु पाऊसकर यांनी त्यांची बाजू सभापतींसमोर मांडतांना दीपक प्रभु पाऊसकर यांचा लहान भाऊ संदीप हा मगो पक्षाचा अध्यक्ष असल्याचा दावा केला आहे. याविषयी एक बनावट ठराव सभापतींना सुपुर्द करण्यात आला आहे. वास्तविक त्या वेळी श्री. दीपक ढवळीकर हे पक्षाचे अध्यक्ष होते आणि आताही आहेत. पक्षाचे अध्यक्ष या नात्याने श्री. दीपक ढवळीकर यांच्या विरोधात उच्च न्यायालयासमवेतच अन्य अनेक न्यायालयांत विरोधी गटाकडून विविध याचिका प्रविष्ट करण्यात आल्या होत्या आणि न्यायालयाने श्री. दीपक ढवळीकर हे पक्षाचे अध्यक्ष असल्याचा निवाडा दिलेला आहे. सभापती राजेश पाटणेकर हे अपात्रता प्रकरणी निर्णय देतांना विरोधी गटाने प्रविष्ट केलेल्या खोट्या ठरावाचा विचार करतील, अशी आशा आहे.’’