इन्सुली येथे अनधिकृतपणे वाळूची वाहतूक करणार्या ४ डंपरवर महसूल विभागाची कारवाई
सावंतवाडी – मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली पोलीस तपासणी नाका येथे महसूल विभाग आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत अनधिकृरित्या वाळूची वाहतूक करणारे ४ डंपर कह्यात घेतले. ८ मार्चला रात्री ही कारवाई करण्यात आल्याची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली.
जिल्ह्यात अद्याप वाळूचा उपसा करण्याचा लिलाव झालेला नाही; मात्र वाळूची मागणी वाढत असल्याने वाळूचा अवैध उपसा आणि वाहतूक करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. एकीकडे हे प्रकार वाढत आहेत, तर प्रशासनही अवैध प्रकारांना पायबंद घालण्यासाठी कार्यरत आहे. सावंतवाडी तालुक्यात दिवसा आणि रात्रीही तहसीलदार म्हात्रे यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाचे पथक कार्यरत असून क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणारे, तसेच खडी, दगड आणि वाळू यांची अवैध वाहतूक करणारे यांच्यावर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे; मात्र अवैध वाहतूक चालूच आहे. या पार्श्वभूमीवर उपरोक्त कारवाई करण्यात आली.