वाझे यांचे गुन्हे शाखेतून स्थानांतर करणार ! – गृहमंत्री
-
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेसाठी विधान परिषदेत विरोधक आक्रमक !
-
सभागृहाचे कामकाज ४ वेळा स्थगित
सत्ताधारी आणि विरोधक यांच्या गदारोळामुळे जनतेच्या पैशांतून चालणार्या सभागृहाचा वेळ वाया घालवणे कितपत योग्य ? अशांकडून जनहितार्थ कार्याची अपेक्षा कशी करता येईल ?
मुंबई, १० मार्च (वार्ता.) – मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तवार्ता पथकाच्या प्रभारीपदी नियुक्त असलेले सचिन वाझे यांना निलंबित करून अटक करण्यासाठी १० मार्च या दिवशी विधान परिषदेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. ‘वाझे यांना अटक होत नाही, तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही’, अशी भूमिका घेत विरोधकांनी सभापतींच्या आसनापुढील मोकळ्या जागेत येऊन सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्याला सत्ताधार्यांनीही घोषणा देऊन प्रत्युत्तर दिले. या गोंधळात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘सचिन वाझे यांचे गुन्हे शाखेतून स्थानांतर (बदली) करण्यात येईल’, अशी घोषणा केली. गृहमंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्यामुळे वाझे यांच्या अटकेची मागणी विरोधकांनी लावून धरली. या वेळी झालेल्या गोंधळामुळे कामकाज अनुक्रमे ५ मिनिटे, २ वेळा १५ मिनिटे आणि ३५ मिनिटे असे १ घंटा ४० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले.
Mansukh Hiren Death Case: Police officer Sachin Vaze to be transferred from Mumbai crime branch | Catch the day’s latest news and updates: https://t.co/XG3ucGn60I pic.twitter.com/A17UIIlrqc
— Economic Times (@EconomicTimes) March 10, 2021
१. सभागृहात कायदा आणि सुव्यवस्था यांवरील चर्चेवर गृहमंत्री अनिल देशमुख उत्तर देत असतांना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रथम सचिन वाझे यांच्यावरील कारवाईची माहिती देण्याची मागणी केली. या वेळी सचिन वाझे यांचे स्थानांतर केल्याची माहिती दिली. या वेळी देशमुख यांनी भाजपचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
२. त्यावर विरोधकांनी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी लावून सभागृहात घोषणा चालूच ठेवल्या. या गोंधळामुळे सभागृहात कायदा आणि सुव्यवस्था यांवर चर्चा अपूर्ण राहिली, तसेच प्रश्नोत्तराचा वेळही वाया गेला.