शिवाचे कार्य
आपल्या शरिरात मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञा ही षट्चक्रे आहेत. कुंडलिनीशक्तीचा प्रवास या चक्रांतून झाल्यावर ती सहस्रारचक्रात प्रवेश करते. ही चक्रे विविध देवतांशी संबंधित आहेत, उदा. मूलाधारचक्र श्री गणपतीशी आणि स्वाधिष्ठानचक्र दत्ताशी संबंधित आहे. थोडक्यात ती ती देवता त्या त्या चक्राची अधिपती आहे. शिव आज्ञाचक्राचा अधिपती आहे. शिव आदिगुरु आहे. गुरुसेवेतील शिष्याचा ‘आज्ञापालन’ हा सर्वांत महत्त्वाचा गुण आहे. आज्ञाचक्राच्या ठिकाणी असलेले शिवाचे स्थान हे शिवाच्या गुरुत्वाची साक्ष देते. शिवाचा तृतीय नेत्र (ज्ञानचक्षू) असण्याचे स्थानही तेच आहे.
महादेवाला ‘सोमदेव’ असेही म्हणतात. दक्षिण दिशेचा स्वामी यम. ही मृत्यूची देवता आहे, तर सोम (शिव) हा मृत्युंजय असून उत्तर दिशेचा स्वामी आहे. शंकराची पिंडीही नेहमी उत्तरेलाच ठेवतात. यम स्मशानातील स्वामी, तर स्मशानात राहून रुंडमाला धारण करणारा आणि ध्यानधारणा करणारा देव म्हणजे शिव. जीव तपसाधनेने अग्नितत्त्व, यम, वरुण आणि वायुतत्त्व यांना ओलांडून मृत्युंजय अशा शिवतत्त्वाजवळ येतो. त्या वेळी शिव त्या जिवाला अभय देऊन र्ईश्वरी तत्त्वाच्या स्वाधीन करतो. त्या वेळी जीव आणि शिव एक होतात.’
– (परात्पर गुरु) परशराम पांडे महाराज