परात्पर गुरु पांडे महाराज यांनी साधकांशी बोलण्याच्या संदर्भात केलेले मार्गदर्शन !
११.३.२०२१ या दिवशी परात्पर गुरु पांडे महाराज यांची द्वितीय पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने…
१. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी मार्गदर्शन करून चैतन्याच्या अनुसंधानात रहाण्याची जाणीव करून देणे
५.९.२०१८ या दिवशी सायंकाळी मी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याकडे सेवेनिमित्त गेलो होतो. त्या वेळी त्यांनी ‘काल कशाविषयी सत्संग होता ? त्या सत्संगात काय झाले ?’, असे मला विचारले. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘माझ्याकडून साधकांशी अनावश्यक बोलणे, अयोग्य आणि प्रतिक्रियात्मक बोलणे, चेष्टेत बोलणे, अशा चुका झाल्या होत्या. त्याची मला सत्संगात जाणीव करून दिली.’’ तेव्हा परात्पर गुरु पांडे महाराज यांनी मला मार्गदर्शन केले आणि चैतन्याच्या अनुसंधानात रहाण्याची जाणीव करून दिली.
अ. साधकांशी बोलतांना ‘मी त्या साधकाशी बोलत नाही, तर ‘त्याच्या आत्म्याशी बोलत आहे’, असा विचार करावा.
आ. ‘मी’ बोलत नाही, तर ‘माझे आत्मरूप तत्त्व बोलत आहे’, असा विचार करून बोलावे.
इ. मी आत्मा आहे आणि सर्व व्यक्ती, वस्तू, प्राणी यांच्यात आत्मस्वरूपात भगवंत आहे, म्हणजे त्यांच्याशी वागतांना, बोलतांना, त्यांना हाताळतांना ‘आपण भगवंताशी बोलत आहोत’, असा भाव ठेवला पाहिजे.
ई. आपण देवघरातील देवतांच्या चित्रांची पूजा करतो. तेव्हा आपल्या मनात त्या चित्रांविषयी पूजनीय भाव असतो. त्यामुळे आपण त्यांना काळजीपूर्वक आणि प्रेमपूर्वक हाताळतो.
उ. आत्मानुसंधानात राहून होणारे कार्य किंवा बोलणे हे चैतन्याला जोडून कार्य करते. त्यामुळे ते विघातक नसते. याउलट चैतन्याशी अनुसंधान न ठेवता केलेले कार्य हे मायेशी संबंधित असते. त्यामुळे ते अपायकारक असते.
ऊ. सर्वांत शेवटी शेष रहाते, ते आपल्यातील चैतन्य ! ते बाहेरील चैतन्याशी एकरूप करायचे असते, म्हणजेच ‘शेषशायी होणे’ होय. शेवटी शिल्लक असलेल्या चैतन्याशी एकरूप, समरस होऊन स्थिर रहाणे, म्हणजे ‘शेषशायी होणे !’ हाच आपल्या साधनेचा उद्देश आहे. त्यामुळे आपल्याला जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होता येते. चैतन्याशी एकरूप होणे, म्हणजे जीवन्मुक्त होणे.
ए. जे शाश्वत नाही, त्याच्याशी संबंध ठेवल्याने आपण जन्म-मृत्यूच्या फेर्यांत अडकतो. माया म्हणजे ‘जी नाही.’ तिच्याशी संबंध ठेवल्यामुळे आपण स्वप्नवत् अवस्थेत रहातो. आपल्याला त्यापासून काही प्राप्त होत नाही.
ऐ. ‘मीही चैतन्य आहे’, असा भाव ठेवून वागले पाहिजे. अखेरच्या श्वासापर्यंत चैतन्याच्या अनुसंधानात रहाता येण्यासाठी आतापासून केलेले प्रयत्नच उपयोगी पडतील. मृत्यूच्या वेळी आपण चैतन्याच्या अनुसंधानात राहिलो, तरच जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होऊ, नाहीतर पुन्हा या चक्रव्यूहात अडकणार !’
२. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘परात्पर गुरुदेवा, तुम्हीच परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या माध्यमातून आम्हाला स्थुलातून मार्गदर्शन करून साधनेत पुढे जाण्यासाठी मार्ग दाखवत आहात’, त्याविषयी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘परात्पर गुरु पांडे महाराज यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार माझ्याकडून प्रयत्न करवून घ्यावेत’, हीच आपल्या आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.
– श्री. महेंद्र सहस्रबुद्धे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.९.२०१८)