ब्रिटीश सूनबाईंची कथा !

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्या नात सूनबाई मेगन मर्केल यांनी ओपरा विन्फ्रे यांना दिलेल्या मुलाखतीत ब्रिटनच्या राजघराण्यात वावरतांना त्यांना आलेल्या वाईट अनुभवांविषयी गौप्यस्फोट केले. पुढे जाऊन ‘स्वतःच्या होणार्‍या बाळाच्या रंगाविषयी राजघराण्याला चिंता होती’, असा गंभीर आरोपही केला. यानंतर जगभरातून मेगन मर्केल यांना सहानुभूती मिळाली आणि ब्रिटीश राजघराण्याला दूषणे देण्यात आली. एवढेच कशाला अमेरिकेच्या व्हाईट हाऊसनेही या मुलाखतीची नोंद घेत मेगनबाईंना पाठिंबा दिला. विशेष म्हणजे हे प्रकरण भारतीय प्रसारमाध्यमांमध्येही चघळले गेले. पत्रकारिता करतांना एखादे प्रकरण किती उचलून धरावे, त्याचे बातमीमूल्य आणि समाजमूल्य यांचा सारासार विचार करून त्या घटनेला महत्त्व देणे आवश्यक असते; मात्र याचे भान विदेशी प्रसारमाध्यमांना असल्याचे दिसले नाही.

डावीकडून प्रिंस हैरी आणि पत्नी मेगन मर्केल

रविवारी ही मुलाखत प्रसारित झाली आणि त्यानंतर जगभरातील सर्वच प्रसारमाध्यमांनी ‘जगातील सर्वच समस्या संपल्या’ या आविर्भावात हा एकच विषय चघळत ठेवला. विदेशातील बर्‍याच आघाडीच्या वृत्तपत्रांनी ही मुलाखत मुख्य बातमी म्हणून छापली. म्हणजे कोरोना महामारी, जागतिक तापमानवाढ, बेरोजगारी आदी अनेक समस्या मागे पडल्या आणि मेगन मर्केल या ‘भोळ्याभाबड्या’ राजकन्येवर जो काही अन्याय झाला, ती एक जागतिक समस्या होऊन बसली, असे एकंदरीत चित्र आहे. हे प्रकरण इतक्यात शांत होण्याचीही चिन्हे नाहीत. विदेशी पत्रकारिता ही प्रगल्भ समजली जाते; मात्र अशा ‘गॉसिप’मध्ये विदेशी प्रसारमाध्यमांना बराच रस असतो, याची या प्रकरणात प्रचीती आली. त्यातही या मुलाखतीमध्ये ‘प्रिन्स हॅरी याला भेटण्याआधी त्याच्याविषयी माहिती नव्हती’, ‘विवाहाच्या आधी ब्रिटीश राजघराण्याचे नियम ठाऊक नव्हते’, असेही मेगन मर्केल यांनी सांगितले. यावर किती विश्‍वास ठेवायचा ? त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, हेही पडताळून पहायला हवे. मेगन मर्केल यांचे आजे सासरे प्रिन्स फिलीप यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्यामुळे ‘प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांनी ही मुलाखत देण्यासाठी निवडलेली वेळ चुकीची होती’, अशीही त्यांच्यावर टीका होत आहे. या मुलाखतीनंतर भारतियांनीही मेगन मर्केल आणि प्रिन्स हॅरी यांना समाजमाध्यमांवरून सहानुभूती दाखवली, तर काहींनी राजघराण्याची कड घेतली. विदेशी प्रसारमाध्यमांच्या पाठोपाठ आता भारतातही ही चर्चा रंगत आहे, हे दुर्दैवी आहे. प्रिन्स हॅरी, मेगन मर्केल किंवा राजघराण्यातील अन्य कुठल्याही सदस्याचे कर्तृत्व काय ? ब्रिटीश राजघराण्यात जन्म घेतला किंवा त्या घराण्यात विवाह होऊन कुणी आले, हीच त्यांची जमेची बाजू. भारतावर अनेक आक्रमक चाल करून आले; मात्र ब्रिटिशांनी भारतावर राज्य करून येथील संस्कृती, उच्चतम व्यवस्था नष्ट करून भारताला अक्षरशः लुटले. त्यास हे राजघराणेही उत्तरदायी आहे. अशांच्या सासू-सुनांच्या भांडणांना आम्ही महत्त्व काय द्यायचे ? ब्रिटन आणि ब्रिटीश राजघराणे यांच्याविषयी भारतियांच्या मनात सूडाग्नी धगधगत ठेवणे आवश्यक आहे. भारतीय प्रसारमाध्यमांनी या राजघराण्याविषयी वृत्तांकन करतांना याचे भान राखावे !

वादग्रस्त राजघराणे !

कौटुंबिक वादविवाद, कलह हा बहुतांश घरात दिसून येतो. ‘घरोघरी मातीच्या चुली’, असे सांगत भारतात अशा घटनांकडे पुष्कळ गांभीर्याने बघण्याचा भाग होत नाही. अमेरिका, ब्रिटन हे देश सुधारणावादी आणि पुढारलेले समजले जातात. अशा या सुधारणावाद्यांना ‘ब्रिटीश राजघराण्यातील कुटुंब कलह चघळायला आवडतो’, हे या मुलाखतीतून समोर आले. ब्रिटीश राजघराणे आणि त्यातील अंतर्गत वादावादी, भानगडी हे विषय जगाला तसे काही नवीन नाहीत; मात्र ते राजमहालाच्या बाहेर कधीच येत नसत. २५ वर्षांपूर्वी प्रथमच प्रिन्स हेरी यांची आई आणि मेगन मर्केल यांची सासूबाई प्रिन्सेस डायना यांनी प्रथम त्यांच्यात आणि त्यांचे पती प्रिन्स चार्ल्स यांच्यातील अंतर्गत वाद एका मुलाखतीद्वारे चव्हाट्यावर आणले. त्या वेळी त्यांनी प्रिन्स चार्ल्स यांचे विवाहबाह्य संबंध आणि स्वतःचेही परपुरुषांशी असलेल्या संबंधांविषयी सांगितले. त्यानंतर राजघराण्यावर टीकेची झोड उठली आणि पुढील अनेक वर्षे प्रसारमाध्यमांनी त्याला लक्ष्य केले. आताही मेगन मर्केल यांनी राजघराण्यावर प्रहार केल्यानंतर त्यांना ‘डायना यांचा खर्‍या अर्थाने वारसा चालवणार्‍या सूनबाई’ म्हणून पाहिले जात आहे.

गुलामी मानसिकता सोडा !

ब्रिटीश राजघराण्यांमध्ये चालू असलेल्या घटनांची भारतियांनी नोंद अवश्य घ्यावी; मात्र त्याचे चर्वितचर्वण करणे, हे लज्जास्पद आहे. ही गुलामी मानसिकता म्हणावी लागेल. या राजघराण्याने भारतावर राज्य करून आमच्या पूर्वजांवर अनन्वित अत्याचार केले याविषयी क्षमा मागितली आहे का ? एवढेच कशाला भारतातून नेलेला कोहिनूर हिरा राणीच्या मुकुटावर आहे. तो परत करण्याची मागणी भारतियांनी बर्‍याच वेळा केली आहे; मात्र त्याकडे सतत दुर्लक्षच केले गेले.

हिंदु राजा आणि योद्धे यांच्या अनेक वास्तू ब्रिटिशांनी अक्षरशः उद्ध्वस्त केल्या; मात्र हिंदूंच्या मनातील विरांच्या स्मृती ब्रिटीश पुसू शकले नाहीत. ‘पराक्रमी हिंदु योद्ध्यांची स्मृतीचिन्हे जर सुरक्षित ठेवली, तर सहस्रो भारतीय त्यातून प्रेरणा घेऊन ब्रिटिशांच्या विरोधात पुन्हा पराक्रम गाजवतील’, याची त्यांना भीती होती. असे हीन कृत्य करणारे बकिंगहॅम पॅलेसमध्ये वास्तव्य करणार्‍या ब्रिटीश राजा-राणीच्या आज्ञेतील सैनिक होते. ब्रिटीश साम्राज्याचा केंद्रबिंदू असलेला बकिंगहॅम पॅलेस गेली कित्येक दशके विविध कारणांमुळे अस्वस्थ आणि अशांत आहे. या राजघराण्याची भरभराट होण्याऐवजी त्याचे अधःपतन होत गेले. याउलट या राजघराण्याच्या आज्ञेने ब्रिटिशांनी जी हिंदु संस्कृती आणि हिंदुत्व मिटवण्याचा प्रयत्न केला, तिला आज पुन्हा मान-सन्मान मिळत आहे. भारतियांवर पाशवी अत्याचार करण्यास सहमती असणार्‍या या राजघराण्याला भारतियांचे शिव्या-शाप मिळाले आहेत. हे राजघराणे आज सुख-समाधानी नसणे, हा कालमहिमा आहे. भारताचा द्वेष करणार्‍या किंवा भारतविरोधी कारवाया करणार्‍यांनी हे पक्के लक्षात ठेवणे आवश्यक आहे. या देवभूमीचे वाईट चिंतणार्‍या कुणाचेही भले झाले नाही, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. ब्रिटीश सूनबाईंच्या कथेतून या इतिहासाची उजळणी करणे आवश्यक आहे !