आंतरजातीय विवाह केला म्हणून जावयाला केला जिवे मारण्याचा प्रयत्न !
कायदा हातात घेणारे लोकप्रतिनिधी समाजाला कायदा आणि सुव्यवस्था काय शिकवणार ?
नगर – भारतीय जनता पक्षाचे पाथर्डी तालुका अध्यक्ष माणिक खेडकर यांनी मुलगी ऋतुजा हिने बंटी उपाख्य प्रशांत राजेंद्र वाघ याच्या समवेत आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. खेडकर हे नेवासे येथील बंटी याच्या घरी मारहाण करण्यासाठी सुपारी देऊन ९ जणांना समवेत घेऊन गेले होते, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात ही घटना घडली आहे. या प्रकरणी नेवासे पोलीस ठाण्यात बंटी उपाख्य प्रशांत वाघ याने दिलेल्या तक्रारीवरून दहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. अटक केलेले आरोपी हे बीड जिल्ह्यातील शिरूर येथील आहेत. त्यांच्याकडून एक मोटार, एक पिस्तूल, एक एअरगन, चाकू, गुप्ती आदी हत्यारे जप्त केली आहेत. न्यायालयाने अटक केलेल्या आरोपींना पोलीस कोठडी दिली आहे. माणिक खेडकर, त्यांचा चुलत भाऊ आणि हृषिकेश खेडकर हे पसार आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.