मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करा ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
|
मुंबई, ९ मार्च (वार्ता.) – मनसुख हिरेन यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या जबाबात येथील गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तवार्ता पथकाच्या प्रभारीपदी नियुक्त असलेले सचिन वाझे यांनी मनसुख यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे सरकारने वाझे यांना निलंबित करून त्वरित अटक करावी, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या आमदारांनी ९ मार्च या दिवशी विधानसभेत केली.
या मागणीवरून विरोधकांनी सभागृहात विविध घोषणा देत गोंधळ केला. त्यामुळे विधानसभेचे कामकाज ८ वेळा स्थगित करण्यात आले. नंतरही विरोधकांचा गोंधळ चालूच राहिल्यामुळे अध्यक्षांनी दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज स्थगित केले. फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांची पत्नी विमला यांचा पोलीस जबाबच सभागृहात वाचून दाखवला.
देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांवरच व्यक्त केली शंका !
‘या प्रकरणात नेमकी कुणा कुणाची नावे समोर येणार आहेत ? वाझे यांना वाचवण्याठी सरकारवर कुणाचा दबाव आहे का ? गृहमंत्री एका अपराध्याला पाठीशी घालत आहेत. वाझे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. यामागे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे काही कारण असावे’, असे म्हणत फडणवीस यांनी थेट अनिल देशमुख यांच्यावरच शंका व्यक्त केली.
सचिन वाझे यांनी मनसुख यांचे वाहन ४ मास वापरले !
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, सचिन वाझे व्यवसायाच्या निमित्ताने माझ्या पतीचे ओळखीचे होते. पती मनसुख यांची हत्या वाझे यांनीच केली असावी, असा मला संशय आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेले स्कॉर्पिओ वाहन सचिन वाझे यांना नोव्हेंबर २०२० मध्ये वापरण्यास दिले होते. हे वाहन ४ मास त्यांच्याकडेच होते. २६ फेब्रुवारी या दिवशी वाझे यांच्यासमवेत माझे पती मुंबई गुन्हे शाखेत गेले होते. हिरेन यांची चौकशी फक्त वाझे यांनी केली आणि त्यांच्या सांगण्यावरून तक्रार प्रविष्ट केली. चौकशी झाल्यानंतरही जो तक्रार अर्ज देण्यात आला, तोही वाझे यांच्या सांगण्यावरून दिला होता. वाझे यांनी ‘माझ्या पतीला अटक करायला सांगितले होते. मग २-३ दिवसांत बाहेर काढू’, असे सांगितले, तसेच मनसुख यांनी भावाला अधिवक्त्यांशी बोलून घ्यायला सांगितले होते. वर्ष २०१७ मध्ये सचिन वाझे आणि धनंजय गावडे यांनी ४० लाख रुपयांची खंडणी मनसुख यांच्याकडे मागितली होती. मनसुख यांचे शेवटचे ठिकाण त्यांच्या मृतदेहापासून ४० कि.मी. दूर आढळले आहे. त्यांचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत फेकण्यात आला; पण ओहोटी असल्यामुळे मनसुख यांचा मृतदेह बाहेर आला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देण्यास साहाय्य पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी नकार दिला आहे. |
८ वेळा विधानसभेचे कामकाज स्थगित !
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी विधानसभेत विरोधकांनी गोंधळ घातल्यानंतर विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी ३ वेळा, १५ मिनिटांसाठी २ वेळा आणि ३० मिनिटांसाठी ३ वेळा कामकाज स्थगित करण्यात आले. स्थगित ठेवल्याच्या कालावधीत विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीनंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा चालू करण्यात आले. त्या वेळी वाझे यांना अटक करण्याच्या मागणीवरून विरोधकांनी पुन्हा जोरदार गोंधळ घातला.
सभागृहात अर्थसंकल्पावर कोणतीही चर्चा नाही !
विधानसभा अध्यक्षांनी अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचे निर्देश दिले; मात्र सचिन वाझे प्रकरणी सभागृहात विरोधकांनी गोंधळ केल्याने अर्थसंकल्पावर सभागृहात कोणतीही चर्चा झाली नाही.
भाजपचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी करा ! – अनिल परब, संसदीय कार्यमंत्री
संसदीय कार्यमंत्री अनिल परब म्हणाले की, हिरेन यांना न्याय मिळालाच पाहिजे; मात्र भाजपचे दादर-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबई येथे येऊन आत्महत्या केली. त्यांनी लिहिलेल्या पत्रात भाजप नेत्यांची नावे आहेत. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी डेलकर यांचे पत्र सभागृहात दाखवून ‘त्या पत्रात भाजपमधील कोणत्याही नेत्यांची नावे घेतलेली नाहीत’, असे स्पष्ट केले.
डेलकर आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष अन्वेषण पथकाची नियुक्ती
गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, मोहन डेलकर यांनी २२ फेब्रुवारी या दिवशी मुंबई येथे आत्महत्या केली. या प्रकरणाचे अन्वेषण करण्यासाठी विशेष अन्वेषण पथकाची (‘एस्.आय.टी.’ची) स्थापना करण्यात येत आहे. डेलकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यांना वारंवार त्रास दिला जात होता. सामाजिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रफुल्ल खेडा पटेल हे प्रशासक आहेत. ते आधी गुजरातमध्ये गृहमंत्री होते. मनसुख हिरेन यांचा मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे. त्यांच्या हत्येविषयी पत्नीचा जबाब बाहेर आलेला आहे. हिरेन आणि वाझे प्रकरणाचे अन्वेषण आतंकवादविरोधी पथक (ए.टी.एस्.) करत आहे. या प्रकरणी जर विरोधकांकडे अधिक कागदपत्रे असतील, तर ती त्यांनी ए.टी.एस्. किंवा माझ्याकडे जमा करावीत. ए.टी.एस्. या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी करेल.
‘व्यावसायिक अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी माझी चौकशी करा !’
देवेंद्र फडणवीस यांचे गृहमंत्र्यांना खुले आव्हान
या प्रकरणी चर्चा चालू असतांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘फडणवीस मुख्यमंत्री असतांना अन्वय नाईक प्रकरण दाबले गेले’, असा आरोप केला. त्यानंतर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी ‘अन्वय नाईक प्रकरणाची चौकशी होऊ नये म्हणून सचिन वाझे यांना लक्ष केले जात आहे’, अशी टीका केली. ‘डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये कुणाचेही नाव नाही. अन्वय नाईक प्रकरणी सरकार आणि गृहमंत्री यांनी माझी चौकशी करावी. त्यांना माझे खुले आव्हान आहे. आम्हाला धमकी देऊ नका. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला असून ‘कर नाही त्याला डर कशाला’ असे फडणवीस यांनी या वेळी प्रत्युत्तर दिले.
मी ‘सी.डी.आर्.’ मिळवला असून माझी चौकशी करा !
काँग्रेसचे सदस्य नाना पटोले यांनी ‘देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा सी.डी.आर्. मिळवल्याविषयी त्यांची चौकशी करावी’, अशी मागणी केली होती. यावर फडणवीस यांनी, ‘हो, मी सी.डी.आर्. (कॉल डिटेल रेकॉर्ड) मिळवला आहे. माझी चौकशी करा’ असे प्रत्युत्तर दिले; मात्र त्यासमवेतच ज्यांनी तो सी.डी.आर्. लिहिला, त्याचीही चौकशी करा. सभागृहात बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे. तुम्ही आम्हाला धमकी देता का ?’ असेही ते म्हणाले.
कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करणार्यांवर कारवाई करा ! – नाना पटोले
सचिन वाझे प्रकरणावरून विरोधकांनी सभागृहातच आंदोलन चालू केले. सर्व विरोधकांनी स्वतःच्या जागेवरून मोकळ्या जागेत येत घोषणा दिल्या. त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन झाले. ‘कोरोनामुळे अधिवेशनामध्ये त्याविषयीचे काही नियम लागू केले आहेत. असे असतांना विरोधक एकत्र येत गदारोळ करत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करणार्यांवर कारवाई करावी’, अशी मागणी सदस्य नाना पटोले यांनी या वेळी केली.