ब्रिटीश राजघराण्याला जन्माला येणार्या माझ्या बाळाच्या काळ्या रंगाची चिंता होती ! – प्रिन्स हॅरीची पत्नी मेगन मार्कल हिचा गौप्यस्फोट
ब्रिटिशांनी भारतावर राज्य करतांना वर्णद्वेषातून भारतियांवर किती अत्याचार केले, याला सीमाच नाही. मेगन मर्केल यांच्या आरोपात तथ्य असेल, तर अशा ब्रिटिश राजघराण्यात स्वतःच्या मुलांविषयी कसा विचार केला जातो, यातून त्यांची मानवताविरोधी मानसिकता अधिक स्ष्ट होते. अशा घराण्यावर जगानेच वर्णद्वेषावरून बहिष्कार घातला पाहिजे !
लंडन (ब्रिटन) – ब्रिटनच्या राजघराण्याचे युवराज प्रिन्स हॅरी यांची पत्नी मेगन मर्केल यांनी एका मुलाखतीमध्येे, ‘राजघराण्याला तिच्या होणार्या मुलाचा रंग काय असेल, याची चिंता वाटत होती. याविषयी तेथे चर्चा करण्यात आली. बाळाचा रंग काळा असल्यास त्याला सुरक्षा पुरवण्यास राजघराणे इच्छुक नव्हते. हॅरी याने कुटुंबियांनी त्याच्याशी केलेल्या चर्चेविषयी मला माहिती दिली होती.’ या वेळी मेगन यांनी चर्चा करणार्या कुटुंबातील सदस्याचे नाव उघड करण्यास नकार दिला. ‘नाव उघड करणे त्यांच्यासाठी अतिशय हानीकारक ठरेल’, असे मेगन हिने मुलाखतीत म्हटले. मेगन आणि हॅरी यांनी गतवर्षी राजघराण्याचे सदस्यत्व सोडले होते. मेगन मर्केल ही अफ्रो-अमेरिकन वंशाची आहे.
मेगन पुढे म्हणाली की, राजघराण्याशी जोडले गेल्यानंतर माझ्या स्वातंत्र्यावर पुष्कळ बंधने आली. राजघराण्यात वावरत असल्यामुळे पुष्कळ एकटेपणा आला होता. अनेक दिवस मला एकटेपणा जाणवत होता. याआधी इतका एकटेपणा मला कधीच जाणवला नव्हता. मला अनेक नियमांनी बांधून ठेवले होते.