तत्कालीन उपवनसंरक्षकांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी करणार ! – शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर
सावंतवाडी – जिल्ह्याचे तत्कालीन उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्या भोंगळ कारभारामुळे त्यांच्या कार्यकाळात अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे माजी पालकमंत्री तथा शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. याविषयी आमदार केसरकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यात वनविभागाच्या विकासकामांसाठी आणि सौरऊर्जा कुंपणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला होता. दोडामार्ग येथे प्राणी संशोधन केंद्र चालू झाले होते; परंतु चव्हाण यांच्या निष्क्रीय कारभारामुळे ही कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. हत्ती आणि माकड यांपासून शेतकर्यांची हानी होत आहे. याविषयीही सचिवांशी चर्चा करणार आहे.’’
‘शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांनी त्यागपत्र दिल्याने त्यांचे पद रिक्त झाले आहे. त्यामुळे या पदावर तुमची वर्णी लागेल का ?’, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता केसरकर म्हणाले, ‘‘मी कुठल्याही पदासाठी कुणापुढेही लाचार होणार नाही. पद असो वा नसो, मी जनतेसाठी काम करत रहाणार आहे. मी पालकमंत्री असतांना जिल्ह्यासाठी ‘चांदा ते बांदा’ योजना कार्यान्वित करून कोट्यवधी रुपयांचा निधी आणला; मात्र ही योजना बंद करून त्यासाठीचा निधीही अडवण्यात आला. याचे शल्य मनात कायम आहे. त्यामुळे हा निधी परत कसा आणता येईल, या दृष्टीने माझे प्रयत्न आहेत.’’