पुणे येथील ओशो आश्रमातील २ भूखंड आश्रम विश्वस्तांकडून विक्रीला !
अनुयायांच्या विरोधानंतर धर्मादाय आयुक्तांची १५ मार्चला सुनावणी !
पुणे – कोरेगाव पार्क येथील १८ एकर परिसरात ओशो आश्रम आहे. ओशोंवर श्रद्धा असलेले अनेक अनुयायी या आश्रमाशी जोडलेले आहेत; मात्र येथील प्रत्येकी दीड एकराचे दोन असे एकूण ३ एकराचे भूखंड आश्रम विश्वस्तांनी विक्रीला काढले आहेत. या विक्रीला ओशो रजनीश यांच्या अनुयायांनी विरोध दर्शवला असून धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. या सगळ्या प्रकरणावर १५ मार्च या दिवशी सुनावणी होणार आहे. सध्या या आश्रमाची मालकी स्वित्झर्लंडमधील झुरिच येथील ‘ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन’कडे आहे. याच फाऊंडेशनच्या माध्यमातून येथील विश्वस्तांनी हे भूखंड विक्रीस काढले असून त्याची सर्वांत अधिक म्हणजे १०७ कोटी रुपयांची बोली राहुल बजाज यांनी लावली.
दळणवळण बंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात आश्रमाची हानी झाली. खर्च वाढल्याने आश्रमाला पैशाची गरज असल्याने भूखंड विक्रीला काढल्याचे ट्रस्टने सांगितले. विक्रीसाठी आश्रम ट्रस्टने मुंबईतील वर्तमानपत्रात विज्ञापन दिले होते.