अंबाजी, फातोर्डा, मडगाव येथे दुहेरी हत्याकांड : २ वृद्धांची हत्या
मडगाव, ८ मार्च (वार्ता.) – अंबाजी, फातोर्डा येथे दुहेरी हत्याकांडाची घटना उघडकीस आली आहे. या हत्याकांडाच्या घटनेने मडगाव येथे खळबळ माजली आहे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. मिगेंल मिरांडा (वय ६५ वर्षे) आणि त्याची सासू कॅटरिना पिंटो (वय ८५ वर्षे) या दोन्ही वृद्धांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हे दोन्ही मृतदेह बांधून ठेवलेल्या अवस्थेत घराच्या मागील खोलीमध्ये लपवून ठेवण्यात आले होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मयत रहात असलेल्या घरातच भाड्याने रहात असलेले ३ कामगार सकाळपासून पसार आहेत. पोलिसांना मयताच्या घरातून सकाळपासून गायब झालेली स्कूटी वास्को रेल्वेस्थानकाकडे सापडली आहे. गोवा एक्सप्रेस रेल्वेतून प्रवास करणार्या काही संशयितांना वास्को आणि मडगाव येथून पोलिसांनी कह्यात घेतले आहे. फातोर्डा पोलिसांच्या मते दुहेरी हत्याकांडामागील हेतू अजूनही स्पष्ट झालेला नाही; मात्र संशयितांचा शोध चालू आहे.
प्राप्त माहितीनुसार मालकाने खोली भाड्यावर देतांना पोलिसांचा ‘व्हेरिफेकेशन’ अर्ज भरलेला नव्हता आणि यामुळे संबंधित कामगारांची कोणतीही माहिती मिळणे कठीण झाले आहे. हे कामगार एका मासेमार व्यावसायिकाकडे काम करत होते. पोलीस महानिरीक्षक परमादित्य आणि पोलीस अधीक्षक (गुन्हे अन्वेषण विभाग) सोबीत सक्सेना यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचे अन्वेषण केले आहे.