साधकांना अखंड चैतन्य आणि आनंद यांची अनुभूती देणारा अन् ‘रथ म्हणजे चालता बोलता आश्रमच आहे !’ या परात्पर गुरु डॉक्टरांच्या बोलाची प्रचीती देणारा सनातन संस्थेचा शक्तीरथ !
‘१९.२.२०२० (माघ कृष्ण पक्ष एकादशी) या दिवशी सनातन संस्थेच्या शक्तीरथाचे (MH 46 BM 3634) सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात आगमन झाले. ४ – ५ दिवसांनी लगेचच तो गुरुसेवेत कार्यरत झाला. या रथाला ९.३.२०२१ या दिवशी, म्हणजेच माघ कृष्ण पक्ष एकादशीला १ वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त एका साधकाला रथाच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. शक्तीरथाच्या ‘ग्रिल’ची उंची वाढवण्याची सेवा करतांना प.पू. भक्तराज महाराज यांचे अस्तित्व जाणवणे
शक्तीरथाच्या ‘ग्रिल’ची उंची वाढवण्याची सेवा चालू होती. त्या वेळी मी प.पू. भक्तराज महाराज यांना प्रार्थना करून सेवेला प्रारंभ केला. तेव्हा ‘प.पू. बाबाच आमच्याकडून सेवा करून घेत आहेत आणि सेवा करत असतांना ते आम्हाला पहात आहेत’, असे जाणवायचे.
२. रथावर ज्या ठिकाणी सेवा चालू होती, त्या भागात ‘ॐ’ उमटल्याचेही दिसले.
३. शक्तीरथ रामनाथी आश्रमात गेल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ रथात बसणे अन् त्यांच्या माध्यमातून रथाला गुरुदेवांची भेट झाल्याचे जाणवून भावजागृती होणे
उंची वाढवण्याची सेवा पूर्ण झाल्यावर मी शक्तीरथ घेऊन रामनाथी आश्रमात गेलो होतो. तेथे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ काही वेळ शक्तीरथात बसल्या होत्या. ‘त्यांच्या रूपात रथाला साक्षात् गुरुदेवांचेच दर्शन झाले आणि अप्रत्यक्षरित्या त्यांची भेट होऊन दैवी स्पर्शही लाभला’, असे वाटून माझी पुष्कळ भावजागृती झाली. ‘जसे साधक आश्रमात आल्यावर त्यांना संतांचे दर्शन होते किंवा संतांची भेट होते, तशाच प्रकारे रथाचेही भावपूर्ण वातावरणात आगमन आणि स्वागत झाले’, असे मला जाणवले.
४. दळणवळण बंदीच्या कालावधीत शक्तीरथाच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवा करण्याची संधी मिळाल्याने अखंड गुरुसेवेत रहाता येणे
दळणवळण बंदी चालू झाल्यापासून अद्यापपर्यंत साधारणतः ९ – १० मासांच्या कालावधीत रथाच्या माध्यमातून सनातनच्या सर्वत्रचे आश्रम आणि सेवाकेंद्रे येथील साधकांना धान्य, भाजीपाला पुरवणे, साधकांचे साहित्य पोचवणे आदी सर्व अत्यावश्यक सेवा करता आल्या. अशा आपत्कालीन स्थितीतही रथामुळे मला सेवेची संधी मिळाली आणि गुरुसेवेत रहाता आले.
५. ‘रथ म्हणजे चालता बोलता आश्रमच आहे’, या परात्पर गुरुदेवांच्या वाक्याची वेळोवेळी प्रचीती येणे
परात्पर गुरुदेव एकदा म्हणाले होते, ‘‘रथ म्हणजे चालता बोलता आश्रमच आहे !’’ याची प्रचीती मला या संपूर्ण कालावधीत घेता आली. दळणवळण बंदीमुळे अन्य कोणत्याही साधकांकडे नेहमीप्रमाणे निवासासाठी जाता येत नव्हते. तेव्हा ४ – ५ दिवस आम्हाला (मी आणि सहसाधक) रथातच रहावे लागायचे. दिवसरात्र रथासमवेतच रहावे लागायचे. रात्री रथात झोपतांनाही मला वेगळे काही वाटले नाही. ‘जणू मी आश्रमातच वास्तव्यास आहे’, असे जाणवत होते.
६. ‘रथ म्हणजे जणू पुष्पक विमानच आहे’, असे वाटणे
मला रथाच्या माध्यमातून सेवा मिळाली; म्हणून मला अखंड कृतज्ञता वाटत होती. ‘ज्याप्रमाणे संत तुकाराम महाराज यांना वैकुंठाला घेऊन जाण्यासाठी पुष्पक विमान आले होते, त्याचप्रमाणे मला रामनाथीला नेण्यासाठी, तसेच सर्वत्रच्या साधकांना अत्यावश्यक सेवा पुरवता याव्यात, यासाठी रथ म्हणजे जणू पुष्पक विमानच आहे’, असे मला वाटायचे. रथाच्या माध्यमातून रामनाथीला गेल्यावर ‘जणू रथ मला वैकुंठ दर्शन करून आणत आहे’, असे जाणवायचे.
७. साधकांच्या मनात शक्तीरथाप्रती असलेला भाव
७ अ. साधकांच्या माध्यमातून परात्पर गुरुदेव रथाचे कौतुक करत असल्याचे जाणवणे : एकदा शक्तीरथ वर्धा येथे गेला होता. तेव्हा तेथील साधकांनी रथासाठी मोठा हार सिद्ध केला होता. तेव्हा लक्षात आले की, साधकांच्या माध्यमातून गुरुदेवांनाच या रथाचे किती कौतुक आहे ! ज्याप्रमाणे एखाद्या साधकाने चांगली सेवा केली की, त्याला संतांकडून खाऊ मिळतो, तसेेच रथाच्या संदर्भातही आहे.
७ आ. दक्षिण भारतातील साधकांचा रथाप्रतीचा भाव अनुभवता येणे : दक्षिण भारतात गेल्यावर तेथील साधकांच्या मनात रथाप्रती असणारा भाव अनुभवता आला. ‘रथ म्हणजे साधे वाहन नाही’, हा भाव अंतरी ठेवून साधक रथाला प्रदक्षिणा घालत होते. त्यामुळे स्वतःला चैतन्य मिळत असल्याचे त्यांना अनुभवता यायचे.
दळणवळण बंदी असल्याने कुणालाही बाहेर पडता येत नव्हते; मात्र काही अत्यावश्यक सेवा असल्याने सर्व शासकीय अनुमती घेऊन मला रथाच्या माध्यमातून महाराष्ट्र किंवा गोवा येथपर्यंत हा प्रवास करता आला. त्याविषयी रथाप्रती आणि प.पू. गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होत होती.’
– एक साधक (१.२.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |