प्राचीन मंदिरांचे जतन आणि संवर्धन यांसाठी ८ प्राचीन मंदिरांची निवड

  • केवळ १०१ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद

  • धार्मिक क्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडून योजना !

मुंबई – राज्यातील प्राचीन मंदिरांचे जतन आणि संवर्धन यांसाठी अर्थसंकल्पामध्ये १०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात श्री धूतपापेश्‍वर मंदिर (राजापूर, जिल्हा रत्नागिरी), कोपेश्‍वर मंदिर (शिरोळ, कोल्हापूर), श्री एकवीरामाता मंदिर (मावळ, जिल्हा पुणे), गोंदेश्‍वर मंदिर (सिन्नर, जिल्हा नाशिक), खंडोबा मंदिर (सातारा, जिल्हा संभाजीनगर), भगवान पुरुषोत्तम मंदिर (माजलगाव, जिल्हा बीड), आनंदेश्‍वर मंदिर (दर्यापूर, जिल्हा अमरावती) आणि शिव मंदिर (चार्मोशी, जिल्हा गडचिरोली) या ८ मंदिरांचा समावेश करण्यात आला आहे. राज्याचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ८ मार्च या दिवशी सादर केला. त्यात मंदिरांच्या संदर्भात वरील घोषणा करण्यात आली.

तीर्थक्षेत्रे आणि स्मारके यांच्या विकासाची घोषणा; मात्र निधीची तरतूद नाही !

देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रातील श्री क्षेत्र परळी वैजनाथ (परळी, जिल्हा बीड), श्री क्षेत्र आैंढा नागनाथ (आैंढा, जिल्हा हिंगोली), श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर (त्र्यंबकेश्‍वर, जिल्हा नाशिक), श्री क्षेत्र भीमाशंकर (खेड, जिल्हा पुणे) या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा शासनाने केली आहे. यासह हिंगोली जिल्ह्यातील संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थान, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील संत बसवेश्‍वर महाराज स्मारक, वाशिम जिल्ह्यातील श्री क्षेत्र पोहरादेवी या धार्मिक क्षेत्रांचा विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा शासनाने केली आहे; मात्र ‘किती निधी देणार ?’, हे अर्थसंकल्पात नमूद करण्यात आलेले नाही.