फोंडा, गोवा येथील सनातनच्या साधिका वैद्या (सौ.) मंगला लक्ष्मण गोरे (वय ७२ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
मंगलात झाले मंगल । भगवंताने पैलतिरी नेले ‘मंगला’स (*) ।
साधकजन झाले आनंदित । कृतज्ञताभाव झाला अपार ॥
रामनाथी (फोंडा, गोवा) – दासनवमीच्या मंगलदिनी सनातनच्या साधकांसाठी ‘भूवैकुंठ’ असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात साधिका वैद्या (सौ.) मंगला लक्ष्मण गोरे (वय ७२ वर्षे) या जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्याची आनंदवार्ता आश्रमातील फलकाद्वारे घोषित करण्यात आली. या आनंददायी वार्तेनंतर सनातनच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सौ. मंगला गोरे आणि त्यांचे कुटुंबीय यांची भेट घेतली. सौ. गोरे यांना ही वार्ता कळल्यावर भावाश्रू अनावर झाले. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सौ. गोरे यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी सौ. गोरे यांचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले पती श्री. लक्ष्मण गोरे आणि नात कु. योगिनी आफळे हे उपस्थित होते, तर डहाणू येथून त्यांची मोठी कन्या सौ. अर्चना हेमंत अंधारे, पनवेल येथून धाकटी कन्या आणि दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘समर्थ’ बोधचित्रकर्त्या सौ. गौरी आफळे अन् ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले जावई श्री. वैभव आफळे, तसेच आयुर्वेदाच्या औषधांशी संबंधित सेवा करणारे त्यांचे सहसाधक यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे जोडण्यात आले होते.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी गोरे आणि आफळे कुटुंबीय यांची भेट घेतली असता आरंभी त्यांनी सौ. गोरे यांना त्यांनी दळणवळण बंदीच्या काळात वैद्यकीय सेवेच्या अनुषंगाने केलेले प्रयत्न अन् आलेले अनुभव यांविषयी सांगण्यास सांगितले. तेव्हा सौ. गोरे म्हणाल्या, ‘‘ देव माझ्या स्वप्नात येऊन प्रसंग घडवत असे आणि त्यातून माझ्यातील दोष अन् अहं दाखवून देत असे. त्यामुळे माझी दोष निर्मूलनाची तळमळ वाढायची. माझ्यात एकाग्रता नसणे, आज्ञापालन न करणे, प्रेमभाव नसणे आदी दोष आहेत. प्रेमभाव वाढवण्यासाठी आपण साधकांचे गुणच आठवायला हवेत. त्यासाठी ‘गुणांची बेरीज करायची, त्यांचा गुणाकारच करायचा’, हे मी ठरवले. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांमधील गुण पाहूनच त्यांना जवळ केले आहे, ते लक्षात घेऊन प्रयत्न केले. ‘जहां देखो, वहां तुम ही तो हो’, असा भाव ठेवण्याचा प्रयत्न केला. ‘मी आयुष्यभर पुष्कळ चुका केल्या असूनही देवाने मला क्षमा केली आहे, तर कृतज्ञताभावात राहिले पाहिजे’, हे मी प्रतिदिन मनाला सांगत असे. ‘देवाने या उतारवयातही साधना करण्यासाठी आणखी एक दिवस दिला आहे, आपण साधना वाढवायला हवी’, असे वाटू लागले. कर्तेपणावर प्रयत्न करतांना मला वाटत असे, ‘जन पळभर म्हणतील हाय हाय । तू जाता राहील कार्य काय ?’ नंतर काही रहाणार नाही, तर आजच प्रयत्न केले पाहिजेत. आता मला ‘केवळ ईश्वरच हवा आहे’, असे वाटते. ’
(टीप : काव्यातील (*) म्हणजेच सौ. मंगला लक्ष्मण गोरे)
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी या मंगलप्रसंगी केलेले अनमोल मार्गदर्शन !१. जशी साधकांची भाव-भक्ती वाढेल, तशी प्रगती करण्याची त्यांची गतीही वाढणार असणे‘६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त करणे म्हणजे त्या जिवाला देवाचे अधिक प्रमाणात साहाय्य मिळू लागते. पातळी हे सात्त्विकतेचे दर्शक असते. सर्वकाही करणारा हा भगवंतच आहे. आपली पातळी टिकवून ती वाढण्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करायचे असतात. आपण प्रत्येक प्रसंगातून शिकणे भगवंताला अपेक्षित आहे. दत्तगुरूंनी २४ गुणगुरु केले, तसे प्रत्येकाकडून, जे घडते, त्यातून शिकण्याचा प्रयत्न करूया. विद्यार्थी जेव्हा अनेक दिवसांनी शाळेत जातो, तेव्हा तो उत्साही असतो. तसा उत्साह साधना करतांनाही टिकून रहायला हवा. साधना हे नित्यकर्म न होता ‘आश्रम हे भूवैकुंठ आहे’, ही जाणीव मनात ठेवून भावाच्या स्तरावर त्याचा लाभ करून घेण्याचा प्रयत्न करावा. जसजशी साधकांची भाव-भक्ती वाढणार, तसतशी साधकांची प्रगती होण्याची गतीही वाढणार आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. २. अध्यात्मात तळमळीला सर्वाधिक महत्त्व असणेआपल्यातील तळमळ, भाव आणि गुण यांमुळे देव आपल्याला पुढे नेतो. अध्यात्मात तळमळीला ८० टक्के महत्त्व आहे. ‘मला पुढे जायचे आहे’, अशी सतत तळमळ हवी. स्वत:ला पालटण्याची तळमळ आपण वाढवायला हवी. आपली मुक्ती ही भगवंताने ठरवली आहे. सर्वकाही तोच घडवत आणि करत असतो. ३. ‘देवाने अमुक साधकाला जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून का मुक्त केले’, असा विचार करून कृती करणे अपेक्षित असणेआपण दैनिकात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या साधकांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांनी केलेले प्रयत्न वाचतो; पण ते अंतर्मुख होऊन अन् शिकण्याच्या स्थितीत राहून वाचतो का, हे पहायला हवे. देवाने अमुक साधकाला जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून का मुक्त केले, अशा प्रकारे आपण शिकण्याच्या स्थितीत राहून प्रयत्न करायला हवेत. सर्वांनी आपल्या मनाची शुद्धी करण्याचा प्रयत्न करूया. अंतर्मुख राहून कृती केली की, आपली साधना होऊन आपल्याला आध्यात्मिक लाभ होतो. ४. आश्रमात साधना अन् सेवा करण्याचे महत्त्व पुष्कळ असणेआपल्याला आश्रमात राहून सेवा करण्याविषयी कृतज्ञता वाटते का, हे आपण पहायला हवे. तो कृतज्ञताभाव टिकवून ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा. देवाने आपल्याला अनुभूती देऊन शिकवलेले सातत्याने लक्षात ठेवणे त्याला अपेक्षित आहे. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी ‘आपल्याला वैकुंठात साधना आणि सेवा करण्याची संधी मिळत आहे’, असा भाव जागृत ठेवूया. ५. स्वत:च्या, तसेच इतरांच्या दोषांत अडकू नये !‘आपल्या साधनेची दिशा योग्य आहे ना, हे प्रत्येक क्षणी पहाणे अपेक्षित आहे. आपल्याला अपेक्षा करणे या अहंच्या पैलूमुळे त्रास होतो. याउलट आपण कृतज्ञताभावात राहिलो, तर आपले प्रसंगांकडे लक्ष जात नाही. देव, कुटुंबीय, सहसाधक यांच्याप्रती सतत कृतज्ञताभावात रहाण्याचा प्रयत्न करूया. ‘माझ्यात अनेक दोष आहेत, मला हे जमत नाही, ते जमत नाही’, असा विचार करून स्वत:च्या मनाचे खच्चीकरणही करायला नको. दुसर्यांमधील दोष न पहाता त्यांच्यातील गुण शिकून ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया. थोडक्यात सांगायचे, तर स्वत:च्या, तसेच इतरांच्या दोषांत अडकू नये. साधकांचे दोष लक्षात आल्यास ते त्यांना सांगून साहाय्यही अवश्य करावे.’ |
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सौ. मंगला गोरे यांच्याविषयी सांगितलेली वैशिष्ट्ये
‘आपल्याला अनेक वेळा जागृतावस्थेतही आपल्यातील दोष आणि अहं यांची जाणीव नसते. गोरेकाकूंना तर स्वप्नावस्थेतही देवाने दोष आणि अहं यांची जाणीव करून दिली. यातून काकूंची स्वत:ला पालटण्याची तळमळ लक्षात येते. आपल्याला स्वत:ला पालटण्याचा ध्यास सतत लागायला हवा. त्यासाठी आपण गुरुकृपायोगानुसार साधनेचे सर्व प्रयत्न प्रामाणिकपणे करणे आवश्यक आहे.’
कुटुंबीय, तसेच सहसाधक यांनी व्यक्त केलेले भावस्पर्शी मनोगत !
१. श्री. लक्ष्मण गोरे (पती)
त्या मला सांभाळून घेतात. मला हृदयविकाराचा त्रास आहे. त्या मला घरगुती आयुर्वेदाची औषधे बनवून देतात. त्यांच्या औषधांनीच मला बरे वाटते. त्यामुळे आधुनिक वैद्यांकडे मला सहसा जावे लागत नाही.
२. सौ. अर्चना हेमंत अंधारे (मोठी कन्या)
‘आई साधनेत आल्यापासून २० वर्षे आजच्या दिवसाचीच वाट पहात होती. आईने पुष्कळ गोष्टींचा त्याग केला आहे. परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता ! गुरुदेवांनी आम्हा सर्वांकडूनही असेच प्रयत्न करवून घेऊन आम्हालाही पुढे न्यावे, अशी प्रार्थना करते.’
३. सौ. गौरी आफळे (धाकटी कन्या)
‘आईविषयी एका ओळीत सांगायचे झाले, तर ‘आई माझा गुरु । आई कल्पतरु’, असे आहे. आई कधीच मायेत अडकली नाही. आम्हाला पूर्णवेळ साधना करण्यास तिने नेहमीच प्रेरणा दिली आहे. गेल्या दिवाळीपासून आईमध्ये आमूलाग्र पालट जाणवत आहे. आईचा जन्म देवाला शोधण्यासाठीच झाला आहे. आम्हालाही तिने प्रत्येक स्थितीत देव शोधण्यास शिकवले.’
४. श्री. वैभव आफळे (जावई)
‘काकू नेहमी स्वत:तील दोष आणि अहं यांच्याविषयी आम्हाला विचारत असतात. रात्री स्वप्नात दिसणार्या दोषांवर काय प्रयत्न करावे, हेही त्या नियमित विचारत असत. कर्तेपणावर मात करण्यासाठी त्या आमचे साहाय्य घेतात. त्यांनी आम्हाला ‘मायेत अडकायचे नाही’ असे सांगून नेहमीच धीर दिला आहे. त्यांनी आणि गोरेकाकांनी आम्हाला साधनेसाठी बळ दिले. यासाठी भगवंत आणि त्या दोघांप्रती कोटीश: कृतज्ञता !’
५. कु. योगिनी आफळे (नात)
‘आजी इतरांचा पुष्कळ विचार करते. तिच्यात पुष्कळ प्रेमभाव आहे. ती सतत शिकण्याच्या स्थितीत असते. ती प्रतिदिन दैनिकात प्रसिद्ध झालेल्या साधनेच्या प्रयत्नांतून प्रेरणा घेऊन तळमळीने प्रयत्न करते.’
६. वैद्या (कु.) शर्वरी बाक्रे (व्यष्टी साधनेच्या आढावासेविका)
‘काकूंची स्वत:ला पालटण्याची तळमळ गेल्या एक-दीड मासापासून पुष्कळ वाढली असल्याचे लक्षात येते. त्या सतत देवाशी बोलतात. त्यांचे भावजागृतीचे प्रयत्नही वाढले आहेत. त्यांचे वय आणि अनुभव अधिक असूनही त्या नेहमी शिकण्याच्या स्थितीत असतात.’
या वेळी सौ. गोरे यांच्यासह सेवा करणार्या अन्य सहसाधकांनीही त्यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली.
सौ. मंगला गोरे यांनी शरणागत भावाने व्यक्त केलेले मनोगत !
‘माझ्यासारख्या पामराला गुरुदेवांनी चरणांशी घेतले. मी काहीच केले नाही, तसेच मला त्यांच्या चरणांपाशी जागा मिळणे, हे मी अलौकिक, अद्वितीय आश्चर्य समजते. सर्वच साधकांनी मला पुष्कळ साहाय्य केले आहे. कु. वैष्णवी वेसणेकर घेत असलेला व्यष्टी आढावा आणि भाववृद्धी सत्संग यांत मला आनंद मिळत असे. आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांचेही मला साधनेत साहाय्य झाले. ‘साधक माझ्यासाठी एवढे प्रयत्न करत आहेत, मीच स्वतःसाठी प्रयत्न का करू नयेत ?’, असे मला वाटले. थोडेसे प्रयत्न केल्यास एवढी मोठी भावभेट मिळू शकते, तर गुरूंनी सांगितलेल्या साधनेचे तंतोतंत आज्ञापालन केल्यास काय होऊ शकते, याची कल्पनाही करता येणार नाही. सर्व साधकांची प्रगती होणे, हेच गुरुदेवांचे ध्येय आहे. आपण सर्व साधकांनी गुर्वाज्ञापालन करून त्यांना आनंद देऊया. मी लहानपणी अनेक पोथ्या-देवतांच्या कथा वाचत असे. तेव्हा मला वाटत असे की, देव भेटणे किती कठीण आहे. त्यापेक्षा आपण नामजपच करूया. सनातनच्या माध्यमातून साधना करू लागल्यानंतर मला ईश्वरप्राप्तीची सहज सोपी दिशा मिळाली. माझा आत्मविश्वास आता पुष्कळ वाढला असून ‘मला प्रेमभाव वाढवण्यासाठी आणि आज्ञापालन करण्यासाठी गुरुदेवांनी शक्ती द्यावी’, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते.’
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतांना सौ. गोरे म्हणाल्या, ‘‘श्रीसत्शक्ति सौ. बिंदामातांनी मला स्वकोशातून बाहेर काढले. चुकांच्या सत्संगाद्वारे मला त्यांनी माझे दोष लक्षात आणून दिले आणि त्यांच्या निर्मूलनाची प्रेरणा दिली, यासाठी मी त्यांच्या चरणीही कोटीश: कृतज्ञ आहे.’’
‘दासनवमी’ला जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्याचे दैवी नियोजन !
सौ. मंगला गोरे यांच्या धाकट्या कन्या सौ. गौरी आफळे यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हटले, ‘आई सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करण्यास आरंभ करण्यापूर्वी प्रत्येक वर्षी दासनवमीच्या निमित्ताने ८ दिवस नाशिक येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. दीनानाथ गंधे यांच्या कीर्तनाला जात असे. आज दासनवमीच असल्याने भगवंताने आजच्या दिनीच तिला किती मोठी भावभेट दिली आहे ! यासाठी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते.’
या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणाल्या, ‘आजच्या दिवसाचे नियोजन ईश्वरानेच कसे केले होते, ते या प्रसंगातून लक्षात येते. सर्वकाही ईश्वरच कसे करतो, त्याची लीला कशी असते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.’
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |