नगर अर्बन अधिकोषातील बोगस कर्ज प्रकरणी माजी संचालकांना अटक
नगर, ७ मार्च – येथील नगर अर्बन अधिकोषाच्या पिंपरी-चिंचवड शाखेत २२ कोटी रुपयांच्या बोगस कर्जप्रकरणात आरोपी असलेल्या तत्कालीन संचालकांची पोलिसांनी धरपकड चालू केली आहे. कर्ज उपसमिती सदस्य, अधिकोषाचे संचालक मंडळ सदस्य यांसह आणखी ६ जणांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ७ मार्च या दिवशी पहाटे नगर शहरात धाडी टाकून तत्कालीन संचालक नवनीत सुरापुरिया यांच्यासह दोघांना कह्यात घेतले आहे. कर्ज घेणार्या यज्ञेश चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस येणार असल्याची माहिती मिळाल्याने अन्य आरोपी पसार झाले आहेत.
अधिकोषाचे अधिकारी महादेव पंढरीनाथ साळवे यांनी तक्रार दिली आहे. सध्या अधिकोषाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. अधिकोषाच्या पिंपरी-चिंचवड शाखेत प्रत्येकी ११ कोटी रुपयांची २ बोगस कर्ज प्रकरणे करण्यात आली होती. मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून अधिकोषाची फसवणूक करण्यात आली होती. (घोटाळेबाजांना कठोर शिक्षा न दिल्यानेच त्यांचे फावते. भ्रष्टाचार करणार्यांना कठोर शिक्षा होतेच, असे चित्र निर्माण झाले तरच अशा प्रकारांना आळा बसू शकेल ! – संपादक)