बनावट कागदपत्रे सिद्ध करणारी टोळी कह्यात !
८०० व्यक्तींना बनावट कागदपत्रे बनवून दिल्याचे उघडकीस !
लोकांची फसवणूक करणार्या अशा आरोपींना कठोर शासन व्हायला हवे !
पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षापथकाने येथील आशीर्वाद कॅफेवर धाड टाकून बनावट कागदपत्रे सिद्ध करणार्या टोळीला कह्यात घेतले आहे. आतापर्यंत ८०० व्यक्तींना आरटीओ फिटनेस, टॅक्स पावती, वाहन इन्शुरन्स, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट अशी बनावट कागदपत्रे बनवून दिल्याचे समोर आले आहे. आशीर्वाद कॅफेचा मालक राहुल गौड त्याच्या ५ साथीदारांसह बनावट कागदपत्रे सिद्ध करत होता. राहुल गौड सह त्याच्या इतर ३ साथीदारांना पोलिसांनी कह्यात घेतले असून इतर २ आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींकडून १ लाख २१ सहस्र रुपयांचा मुद्देमाल, बनावट कागदपत्र तयार करण्याचे साहित्य, प्रिंटर, पेन ड्राइव्ह, झेरॉक्स मशीन यांसह सर्टिफिकेट, मोबाईल आणि रबरी स्टॅम्प शासनाधीन केले आहेत. सामाजिक सुरक्षापथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश वाघमारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.