जाफराबाद (संभाजीनगर) येथे अवैधरित्या कत्तलीसाठी आणण्यात आलेल्या ७६ गोवंशियांची पोलिसांकडून सुटका
गोरक्षणासाठी लढा देणार्या ‘ध्यान फाऊंडेशन’चे अभिनंदन !
ध्यान फाऊंडेशनच्या याचिकेनंतर न्यायालयाकडून वाहनचालकांना ८ लाख रुपयांचा दंड
मुंबई, ७ मार्च (वार्ता.) – विजयपूर (मध्यप्रदेश) येथून २ बंदिस्त कंटेनरमधून कत्तलीसाठी आणण्यात येत असलेल्या ७६ गोवंशियांची जाफराबाद (संभाजीनगर) येथील पोलिसांनी सुटका केली. (महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांनाही इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंशियांना कत्तलीसाठी कसे काय नेण्यात येते ? कायद्याचे रक्षक म्हणवणार्या पोलिसांनी कत्तलीसाठी गोवंशियांची वाहतूकच होऊ नये, यासाठी कठोर पावले उचलावीत ! – संपादक) प्राण्यांना क्रूरपणे वागणूक दिल्याप्रकरणी वाहनचालक हकीम घासी खाँ आणि प्रधान जाट यांच्या विरोधात जाफराबाद पोलीस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. न्यायालयाने हकीम घासी खाँ आणि प्रधान जाट यांना ८ लाख रुपये दंड ठोठावला आहे, तसेच गोवंशियांचे पालनपोषण करण्यासाठी संभाजीनगर येथील श्री गुरु गणेश श्री गुरु मिश्री या धर्मादाय संस्थेला ठराविक रक्कम देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
१९ फेब्रुवारीला माहोरा, संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोलिसांनी ही गोवंशियांची अवैध वाहतूक रोखली. कंटेनरमध्ये अतिशय निर्दयीपणे गोवंशियांना कोंबण्यात आले होते. यांतील काही गोवंशीय दृष्टीहीन, अपंग आणि वयोवृद्ध होते.
गोवंशियांना विकत घेणार्यांकडून श्री गुरु गणेश श्री गुरु मिश्री संस्थेला धमकी
‘संभाजीनगर येथील ज्या स्थानिकांनी गोवंशियांची खरेदी केली, त्यांच्याकडे गोवंश सुपुर्द करू नयेत’, यासाठी श्री गुरु गणेश श्री गुरु मिस्वी वतीने जालना येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. गोवंश खरेदी करणार्यांकडून येणार्या धमक्यांमुळे श्री गुरु गणेश श्री गुरु मिश्री संस्थेकडून हा खटला मागे घेण्यात आला. त्यानंतर ध्यान फाऊंडेशनच्या वतीने केलेल्या याचिकेवरून न्यायालयाने गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्यांना हा दंड ठोठावला.
‘गोवंशियांना शेतीच्या कामासाठी आणण्यात येत आले होते’, असे मत गोवंशियांना खरेदी करणार्या स्थानिकांच्या अधिवक्त्याने न्यायालयात मांडली. ‘ध्यान फाऊंडेशन’च्या वतीने न्यायालयात बाजू मांडतांना अधिवक्ता विष्णु शिंदे यांनी ‘काही गोवंश अपंग, दृष्टीहीन आणि वयोवृद्ध असतांना ते शेतीची कामे कशी करू शकतात ?’ असा प्रश्न न्यायालयात उपस्थित करून गोवंशियांना कत्तलीसाठी आणण्यात आल्याचे न्यायालयाला पटवून दिले.