कुख्यात गुंड गजा मारणे याला मेढा (सातारा) येथे अटक !
सातारा, ७ मार्च (वार्ता.) – पुणे पोलिसांना हवा असलेला कुख्यात गुंड गजानन उपाख्य गजा मारणे याला त्याच्या सहकार्यासह मेढा (जिल्हा सातारा) येथे पोलिसांनी अटक केली. मेढा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
गजानन मारणे याची पुणे येथील २ खूनांच्या गुन्ह्यांतून निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर तळोजा कारागृहातून गजानन मारणे आणि त्याच्या सहकार्यांनी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर उर्से पथकरनाक्यापर्यंत ३०० हून अधिक वाहनांसह फटाके वाजवून मिरवणूक काढली. तसेच दहशत पसरवली. या प्रकरणी गजानन मारणे आणि त्याच्या सहकार्यांविरोधात तळेगाव-दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्याला अटक करण्यापूर्वीच तो पळून गेला. पुणे पोलीस त्याच्या मागावर होते. तो सातारा जिल्ह्यातील मेढा, वाई, महाबळेश्वर परिसरात वास्तव्यास होता. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी शोध चालू केला. कुडाळमार्गे येणार्या क्रेटा गाडीला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र ती थांबली नाही. पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून गाडीला आडवले. गाडीमध्ये गुंड गजानन मारणे असल्याची निश्चिती झाल्यानंतर त्याला कह्यात घेण्यात आले.