साधिकेच्या मनात संतांविषयी कृतज्ञताभाव दाटून आल्यावर देवाने तिला ‘सूक्ष्म शक्ती कशा त्रास देतात ?’, हे दृश्यरूपात दाखवणे
१. आश्रमात केलेला होम पाहिल्यावर ‘बाहेरचे वातावरण एवढे गढूळ आहे, तरी देव आपल्यासाठी पुष्कळ कष्ट घेतो’, असा विचार मनात येऊन कृतज्ञताभाव जागृत होणे
‘ रामनाथी आश्रमात होम केला होता. तो होम पाहिल्यावर माझ्या मनात कृतज्ञतेचा भाव दाटून आला. मला परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. होम झाल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ काही साधकांसह बोलत असत. तेव्हा ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना डोळे भरून पाहून हृदयात स्थापन करूया’, असा मनात विचार करून मी त्यांनाच पहात होते. नंतर मी कृतज्ञता व्यक्त करत तिसर्या माळ्यावर आले. तेव्हा मी खाली वाकून पाहिल्यावर मला ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ तेथेच उभ्या आहेत’, असे दिसल्यावर मनात ‘बाहेर वातावरण एवढे गढूळ असूनही देव आपल्यासाठी किती कष्ट घेत आहे !’, असा विचार येऊन माझा कृतज्ञताभाव जागृत झाला. नंतर संत आणि सर्व साधक तेथून निघाले. पुरोहितांनी होमकुंडाजवळ असलेले सर्व साहित्य आवरले. मी खोलीत येऊन पलंगावर पहुडले.
२. डोळे मिटल्यावर सूक्ष्मातून ‘एक व्यक्ती होमकुंडात माती टाकून अग्नी विझवण्याचा प्रयत्न करत आहे; पण अग्नी न विझल्याने ती निघून गेली’, असे दृश्य दिसणे
मी डोळे मिटून पडल्यावर मला डोळ्यांसमोर दिसले, ‘मल्लयुद्ध खेळणारे जसे पुरुष असतात, तसा काळ्या रंगाचा एक पुरुष मार्गिकेत उभा आहे. त्याचे डोळे लाल होते आणि बाहू फुगलेले होते. तो मार्गिकेत उभा राहून होमकुंडाचे निरीक्षण करत होता. तेथून काही अंतरावर २ व्यक्ती होमकुंडाचे निरीक्षण करत होत्या. त्यातील एक व्यक्ती उंच होती, तर दुसरी ठेंगणी होती. दोन्ही व्यक्तींची अंगकाठी एकदम बारीक होती. त्यांच्या डोक्यावरील जटा मानेपर्यंत लोंबकळत होत्या. मार्गिकेतून ज्या दिशेने संत गेले, त्याच दिशेने तो काळा माणूस गेला. तो माणूस गेल्यावर त्या दोन व्यक्तींतील एका व्यक्तीने होमकुंडाजवळ जाऊन हाताने माती उचलली आणि होमकुंडात पेटत असलेल्या अग्नीवर रागाने मारली. त्याने ५ – ६ वेळा असे केले. त्याला अग्नी माती मारून विझवायचा होता. ते पाहून माझ्या मनात विचार आला, ‘अरे, तुम्ही कितीही माती मारून अग्नी विझवण्याचा प्रयत्न केलात, तरी ती मातीही पेटणार’, हे लक्षात घ्या आणि खरेच मातीनेही पेट घेतल्याचे मला दिसले. ‘होमकुंडातून धूर येत आहे’, हे पाहून त्या दोन्ही व्यक्ती पहिला माणूस गेला, त्या दिशेने गेल्या.’
दुसर्या दिवशी सकाळी मी होमकुंडाजवळ जाऊन पाहिल्यावर मला तेथील भूमी सारवलेली दिसली. ‘आजूबाजूला मातीही नव्हती’, असे लक्षात आले.
३. ‘साधना वाढवल्यावरच भगवंत रक्षण करणार आहे’, असे वाटणे
त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘जेथे साक्षात् महाविष्णु मानवरूपात वास्तव्य करत आहे, तेथे कुणालाही त्रास होणार नाही. त्यासाठी आपल्याला साधनाच वाढवायला हवी. आपण ज्या भावाने साधना करणार, तेवढ्याच प्रमाणात भगवंतही आपले रक्षण करणार. ‘देवाला शरण जाणे’, हाच पर्याय आहे.’
माझ्या मनात परात्पर गुरु डॉक्टर, सद्गुरु आणि संत यांच्याप्रती कृतज्ञतेचे विचार येत असतांना देवाने ‘सूक्ष्म शक्ती कशा त्रास देतात’, हे मला दृश्यरूपात दाखवले. त्याविषयी मी देवाच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (मार्च २०२०)
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |