कर्नाटक राज्यात ‘देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघ, कर्नाटक’च्या वतीने ‘मंदिर संरक्षण उपक्रमा’चा शुभारंभ !
सभासदांनी बैठकीच्या माध्यमातून ठरवली पुढील कार्याची दिशा !
मंगळुरू – मंदिरांचे सरकारीकरण झाल्यामुळे भ्रष्टाचार, धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप यांसारखे अनेक अपप्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे हिंदूंची मंदिरे असुरक्षित आहेत. या पार्श्वभूमीवर ‘देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघ, कर्नाटक’च्या वतीने मंदिर संरक्षण उपक्रमाला चालना देण्यात येत असून ३ मार्च या दिवशी येथे उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. उपक्रमाची दिशा सुनिश्चित करणे आणि मंदिरांच्या सद्य:स्थितीविषयी अवगत करणे यांसाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत धर्मप्रेमी श्री. प्रभाकर नायक, श्री. श्रीनिवास, उद्योगपती श्री. दिनेश एम्.पी., सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा, महासंघाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट, महासंघाचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा आणि अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते. या बैठकीनंतर मंगळूरू येथील ग्रामदेवता श्री मंगळादेवीला मंदिर संरक्षण उपक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
श्री. सुनील घनवट यांनी महाराष्ट्रात सरकारच्या कह्यातील मंदिरांत चालू असलेला भ्रष्टाचार, मंदिर भूमी अधिग्रहण यांविषयी माहिती दिली. महासंघाचे कर्नाटक राज्याचे समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी कर्नाटकातील मंदिरेही सरकारच्या कह्यात जाणार असल्याने येथील मंदिरांची दु:स्थिती आणि त्यांचे संरक्षण यांच्या दृष्टीने आपल्याला काय प्रयत्न करणे अपेक्षित आहे ? याविषयी अवगत केले.
पू. रमानंद गौडा यांनी ‘मंदिरे आपले आधारस्तंभ असून श्रद्धास्थानही आहेत. त्यांचे रक्षण करणे, हे आपल्या सर्वांचे दायित्व आहे. या कार्यात भगवंताचा आशीर्वाद अवश्य लाभेल’, असे आशीर्वचनरूपी मार्गदर्शन केले.