कोरोनासह इतर विषाणूंपासून रक्षण होण्यासाठी देशातील पहिल्या ‘विषाणू रक्षक’ आयसोलेशन चेंबर्सची निर्मिती
मुंबई – कोरोनासह इतर विषाणूंपासून रक्षण होण्यासाठी देशातील पहिल्या ‘विषाणू रक्षक’ आयसोलेशन चेंबर्सची निर्मिती जे.जे. रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाच्या आधुनिक वैद्यांच्या चमूने केली आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते या चेंबर्सचे उद्घाटन करण्यात आले. कोरोनाबधित किंवा इतर कोणत्याही विषाणूबाधित रुग्णापासून आरोग्य कर्मचारी आणि रुग्णाचे नातेवाईक यांना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी या चेंबर्सची निर्मिती करण्यात आली आहे.
१. या चेंबरमध्ये विषाणूबाधित रुग्णावर सोनोग्राफी करणे, ‘व्हेंटिलेटर’वर लावणे, इतर पडताळणी आणि उपचार योग्य ती दक्षता घेऊन करता येतात. रुग्णाला एका जागेवरून दुसर्या जागी नेतांनासुद्धा विषाणू संसर्गाची शक्यता अल्प असते. बाहेरील व्यक्तीपासून संसर्ग होऊ नये, अशा रुग्णांना या चेंबर्समध्ये ठेवता येणार आहे.
२. फ्रान्स, जर्मनी या देशांत अशा प्रकारच्या चेंबर्सचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्याचे मूल्य या देशात अनुमाने १८ लाख रुपयांपर्यंत आहे. आपल्या आधुनिक वैद्यांनी हा विषाणू रक्षक चेंबर ३ लाख रुपयांमध्ये सिद्ध केला आहे.
३. प्रायोगिक तत्त्वावर हे चेंबर मुंबईतील शासकीय रुग्णलयात वापरण्यात येणार असून त्याचा वापर पाहून भविष्यात याची संख्या वाढवली जाऊ शकते.
४. मुख्यत्वे करून ‘पॉझिटिव्ह प्रेशर’ ज्यामध्ये बाहेरील हवा चेंबरच्या आत येऊ शकत नाही, अशा पॉझिटिव्ह प्रेशर मोडला चेंबरच्या आतील व्यक्तीला विषाणू संसर्ग होत नाही, तर निगेटिव्ह प्रेशर मोडवर आतील हवा किंवा विषाणू बाहेर जात नाहीत. ते अल्ट्राव्हायोलेट किरणांनी नष्ट केले जातात.
५. चेंबरमध्ये ०.३ मायक्रोमीटर आकाराचे फिल्टर बसवले असून सूक्ष्मातील सूक्ष्म विषाणू याद्वारे नष्ट होतो. यामध्ये इबोला, कोरोना, टीबी आणि इतर विषाणू (बॅक्टेरियल) संसर्गापासून रुग्णाचे रक्षण होते.