सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात प्रश्नसंच सिद्ध करण्याच्या कामासाठी प्राध्यापकांची टाळाटाळ !
६ सहस्र १०० विषयांचे बिनचूक प्रश्नसंच काढण्याचे आव्हान !
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या परीक्षेच्या दिनांकाचा प्रश्न संपत नाही, तोपर्यंत परीक्षेसाठी प्रश्नसंच सिद्ध करण्याच्या कामासाठी प्राध्यापक टाळाटाळ करत असल्याने हे काम संथपणे चालू असल्याचे समोर आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील प्रथम सत्राच्या परीक्षा १५ ते २० मार्चपासून टप्प्याटप्प्याने चालू होतील, असा निर्णय ९ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेतला असला, तरी याविषयीचे परिपत्रक जाहीर करण्यात आले नाही. अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न काढण्यात आले होते; मात्र त्यामध्ये असंख्य चुका झाल्याने परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. आता प्रथम सत्र परीक्षेसाठी विषयांची संख्या आणि विद्यार्थी संख्या अधिक असल्याने पूर्वीपेक्षा काळजीपूर्वक हे काम करावे लागणार आहे. प्रथम सत्र परीक्षेमध्ये सर्व विद्याशाखेचे मिळून अंदाजे ६ सहस्र १०० विषय असून त्यासाठी साडेसहा लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. अभ्यास मंडळांच्या अध्यक्षांची चर्चा केल्यानंतर प्रश्नसंच तयार करण्यासाठी अजून १० ते १२ दिवस लागतील हे समोर आले आहे.
प्रश्नसंच काढण्याच्या कामात टाळाटाळ करणार्या प्राध्यापकांवर कारवाईचा प्रस्ताव परीक्षा प्रमाण मंडळापुढे सादर केला जाईल, असे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले आहे. टाळाटाळ करणार्या शिक्षकांविषयी लेखी तक्रार परीक्षा समन्वय कक्षाकडे पाठवल्यास संबंधितांवर विद्यापीठ अधिनियम ४८ (४) अन्वये कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.