अंध विद्यार्थ्यांमधून पात्र ठरणार्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी सौ. प्रांजली पाटील (राजपूत) !
८ मार्च २०२१ या दिवशी ‘महिलादिन’ आहे. यानिमित्ताने…
‘आज एका असामान्य जिद्दीचे आपल्या देशातील एकमेवाद्वितीय असे उदाहरण आहे की, जे आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शन करून जिद्द निर्माण करणारे आहे. तसे पाहिले, तर आज आपल्या देशाच्या इतिहासात एक गौरवदिन आहे; कारण गेल्या वर्षी (वर्ष २०१६ मध्ये) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (‘यू.पी.एस्.सी’च्या) परीक्षेत पहिल्या दृष्टीहीन विद्यार्थिनी सौ. प्रांजली लहेनसिंग पाटील (वय २८) या ७७३ गुणानुक्रमाने उत्तीर्ण झाल्या. अंध विद्यार्थिनींमधून पात्र ठरणार्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
समाजात अनेक ठिकाणी फिरतांना असे चित्र दिसते की, आज कुठेतरी अंध आणि दिव्यांग (अपंग) असे प्रतिभावंत जे विद्यार्थी आहेत, ते मागे रहातात. ना रोजगार ना कायमस्वरूपी निवास; पण आता काळ पालटत आहे, याचा सर्व पदवीधर विद्यार्थ्यांनी योग्य वयात उपयोग करून घ्यावा. त्यांना नक्कीच मार्गदर्शन मिळू शकते.
लहानपणापासून दृष्टी कमकुवत असलेल्या सौ. प्रांजली यांनी विविध परीक्षांमध्ये मिळवलेले यश
मलकापूर तालुक्यातील वडजी हे प्रांजलीचे मूळ गाव. लहानपणापासून दृष्टी कमकुवत असल्याने शालेय जीवनातच प्रांजलीला अंधत्व आले; मात्र आई-वडिलांच्या प्रोत्साहनाने प्रांजलीने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. विद्यापिठात कला शाखेमध्ये प्रथम येण्याचा मान तिने मिळवला. त्यानंतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी प्रांजलीने प्रयत्न चालू केले. आज तिच्या प्रयत्नांना यश आले आणि देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या (जे.एन्.यू.) निवड चाचणीत सहस्रो मुलांच्या निवडीतून प्रांजलीची निवड झाली. जे.एन्.यू.मध्ये तिने एम्.फील. केले. याच विद्यापिठात ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ या विषयात ती पी.एच्.डी. करत आहे. प्रांजलीने कोणतीही खासगी शिकवणी न लावता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. ओझरखेडा (जिल्हा जळगाव) तिचे सासर असून सध्या ती पतीसमवेत उल्हासनगर येथे स्थायिक आहे.
राजपूत महिलेने मिळवलेले यश
जवाहरलाल नेहरू विद्यापिठात राहूनच तिने स्पर्धा परीक्षेची सिद्धता केली, अभ्यासाशी नेहमी मैत्री केल्याने आजवरचा प्रवास आनंददायी ठरला आहे. दोन्ही डोळ्यांना अंधत्व आल्याने अनेक अडचणींना समोरे जावे लागले; परंतु आई-वडील आणि पतीच्या साथीने यश मिळाले. तिने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतांना कुठलेही दडपण न घेता पुस्तकांशी मैत्री केली. प्रांजलीला यश मिळाल्यानंतरही ती शांत बसली नाही. तिने परत परीक्षा दिली आणि वरची रँक (श्रेणी) मिळवली. आता तिची रँक १२४ आहे. जसे सौ. प्रतिभाताई पाटील यांनी पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळवला, त्याच प्रकारे या राजपूत महिलेने, हे यश मिळवले !’
(संदर्भ : मासिक ‘क्षात्रधर्म’, जून २०१७)