कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून पसार झाल्याचा संशय असलेले बंदीवान कारागृह परिसरातच सापडले
पणजी – कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून ५ मार्च या दिवशी सायंकाळी पलायन केल्याचा संशय असलेले दोघे कैदी (बंदीवान) उपेंद्र नाईक आणि हुसेन कोयडे या दोघांना ५ मार्चला मध्यरात्री ३.३०च्या सुमारास कह्यात घेण्यात आले. हे दोघेही कारागृहातील जुन्या कार्यालयात रात्रभर लपून बसले होते आणि पहाटे संरक्षक भिंत ओलांडण्याच्या प्रयत्नांत असतांना दोन्ही कैद्यांना कारागृह प्रशासनाने कह्यात घेतले.
कैदी उपेंद्र नाईक (वय २३ वर्षे) हा मूळचा ओडिसा येथील आहे आणि एका खुनाच्या प्रकरणात त्याच्या विरोधात खटला चालू आहे. कैदी हुसेन कोयडे (वय ३७ वर्षे) हा मूळचा कर्नाटक येथील असून तो मोतीडोंगर, मडगाव येथे रहात होता. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट असून खटला चालू आहे. कैद्यांनी कारागृहातून पलायन केल्याच्या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. पहाटे ३.३० च्या सुमारास त्यांनी कारागृहाच्या संरक्षण भिंतीवरून पलायन करण्याचा प्रयत्न केला असता मनोर्यावर असलेल्या पोलीस सुरक्षारक्षकाने त्यांना पाहिले आणि नंतर त्यांना कह्यात घेण्यात आले. या वेळी एका कैद्याने संरक्षण भिंतीवरून उडी घेण्याचा प्रयत्न केला असता, तो खाली पडून घायाळ झाला.
कैद्यांचे पलायन होण्याच्या घटनांमध्ये काही कारागृहरक्षक गुंतल्याचा संशय !
कैद्यांचे पलायन होण्याच्या घटनांमध्ये काही कारागृहरक्षक गुंतल्याचा संशय आहे. यामुळे कैद्यांनी पलायन केल्याच्या घटनेचे गुन्हे अन्वेषण विभाग अन्वेषण करत होता. प्राप्त माहितीनुसार कारागृहात ५ मार्च या दिवशी या कैद्यांना नेहमीप्रमाणे संध्याकाळी मोकळ्या हवेसाठी कारागृहाच्या आतील आवारातच सोडण्यात आले होते. एक पाण्याचा टँकर आला होता. पाण्याचा टँकर निघून गेल्यापासून हे कैदी कारागृहाच्या आवारात दिसले नव्हते. संध्याकाळी कैद्यांना कारागृहाच्या खोल्यांमध्ये नेतांना हे २ कैदी न दिसल्याने हा प्रकार उघडकीस आला आणि त्यानंतर शोधमोहीम आरंभली होती. यापूर्वी कारागृहातून एका कैद्याने पलायन केल्यावर तेथील पोलीस सुरक्षा कर्मचारी पालटण्यात आले होते; मात्र तरीही कैद्यांनी पलायन करण्याचे प्रकार थांबत नसल्याने यामागे कटकारस्थान असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.