मानसिक तणावातून पोलिसांच्या वाढत्या आत्महत्या !
पोलीस साहाय्यक उपनिरीक्षक संतोष नाईक यांनी त्यांच्या रहात्या सदनिकेमध्ये नुकतीच आत्महत्या केल्याचे प्रकरण
विद्यार्थी, पोलीस, प्रशासकीय अधिकारी कुणीही असले, तरी केवळ उच्च शिक्षण देऊन चालणार नाही, तर सर्वांना साधना शिकवणे अपरिहार्य आहे !
पणजी – कामाचा ताण, वरिष्ठ पोलीस अधिकार्याकडून छळवणूक, आरोग्यविषयक समस्या किंवा मानसिक तणाव आदींमुळे टोकाची भूमिका घेऊन काही पोलीस कर्मचार्यांनी आत्महत्या केल्या आहेत किंवा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पोलीस दलाच्या वतीने या घटनांचे सखोल अन्वेषण कधीच झाले नाही. पोलीस साहाय्यक उपनिरीक्षक संतोष नाईक यांनी त्यांच्या रहात्या सदनिकेमध्ये नुकतीच आत्महत्या केली. या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ माजून हे खाते पुन्हा चर्चेत आले आहे.
१. यापूर्वी वेर्णा पोलीस ठाण्याशी निगडित एका महिला पोलीस हवालदाराने ऑगस्ट २०१८ मध्ये उपनिरीक्षकाच्या लैंगिक छळाला कंटाळून आत्महत्या करून जीवन संपवले होते.
२. उत्तर गोवा पोलीस अधीक्षक कार्यालयातील एका महिला हवालदाराने मार्च २०१७ मध्ये पर्वरी येथील रहात्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती.
३. वर्ष २०१५ मध्ये पेडणे पोलीस ठाण्यात असलेला पोलीस उपनिरीक्षक गौतम मलिक यांनी स्वत:च्या रिव्हॉल्वरमधून गोळी छाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र वेळीच वैद्यकीय उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला होता.
४. डिसेंबर २०१५ मध्ये ‘आय.आर्.बी.’चे पोलीस हवालदार देविदास सिनारी याला एका खुनाच्या आरोपाखाली पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्याने कोठडीतच गळफास लावून आत्महत्या केली होती.
५. गुन्हे अन्वेषण विभागातील हवालदार चंद्रू गावस याने केलेली आत्महत्या बहुचर्चित झाली होती.
६. मे २०१२ मध्ये वरिष्ठांच्या छळवणुकीला कंटाळून एका हवालदाराने विष पिऊन आत्महत्या केली होती.
७. डिसेंबर २००६ मध्ये गुन्हे अन्वेषण विभागाचे हवालदार सुधीर फडते, वर्ष २००९ मध्ये पेडणे पोलीस ठाण्याशी निगडित रूपेश वळवईकर आणि वर्ष २०१६ मध्ये पेडणे पोलीस ठाण्याशी निगडित हवालदार निखिल आरोंदेकर यांनी आत्महत्या केल्या आहेत.
पोलीस दलातील आत्महत्यांची कारणे शोधल्यास पोलीस दलाचीच अपकीर्ती होऊ शकते आणि या भितीने कोणताही अधिकारी या घटनांमागील कारणांचा शोध घेण्याचे धाडसही करत नाही, असे सूत्रांनी सांगितले.
पोलीसदलात मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योग, ध्यानधारणा आदींवर भर दिला जाणार !
पोलीस दलातील आत्महत्येच्या घटना खूप दु:खदायक आहेत. यामुळे चांगले पोलीस कर्मचारी आम्ही गमावले आहेत. यांपैकी काहींनी नव्याने पोलीसदलात भरती होऊन त्यांच्या कारकिर्दीला प्रारंभ केला होता. पोलीसदल असे प्रकार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पोलीसदलात पुन्हा एकदा मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योग, ध्यानधारणा आदींवर भर दिला जाणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने दिली. (वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी योग, ध्यानधारणा आदींवर भर देण्याचे ठरवले ते योग्यच झाले. त्यासमवेतच साधनाही शिकवायला हवी; कारण आत्महत्यांमागे मानसिक कारणांसमवेतच आध्यात्मिक कारणेही असू शकतात ! – संपादक)