‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेनेच दोष अन् अहं नष्ट होऊ शकतात’, याची साधकाला झालेली जाणीव !
स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची प्रक्रिया राबवत असतांना ‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेनेच दोष अन् अहं नष्ट होऊ शकतात’, याची साधकाला झालेली जाणीव !
१. जहाजावरील ‘वरिष्ठ समुद्री अभियंता’ या पदावर कार्यरत असतांना काही गोष्टी करण्यास नकार दिल्याने अचानक आस्थापनाने त्या पदावरून काढून टाकणे आणि पू. जयराम जोशी यांनी ‘परत जहाजावर जाऊ नकोस’, असे सांगणे
‘एप्रिल २०१७ मध्ये मी एका चिनी मालकीच्या जहाजावर ‘वरिष्ठ समुद्री अभियंता’ या पदावर कार्यरत होतो. जहाजावर एक विशेष दुरुस्ती प्रकल्प राबवण्याच्या कामात यथाशक्ती योगदान देऊनही केवळ काही कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास आणि काही आक्षेपार्ह कामगिरी करण्यास मी स्पष्ट नकार दिल्याने मला २ मासांनी (महिन्यांनी) नोकरीवरून अचानक घरी पाठवण्यात आले. मी मिरज आश्रमातील पू. जोशीआजोबा (पू. जयराम जोशी) यांना वरील प्रकार सांगितला. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘यापुढे तुम्ही जहाजावर जायला नको.’’ त्यानंतर पू. जोशीआजोबांनी मला पूर्ण वेळ साधना करण्यास सुचवले. गुरुकृपेने घरासाठीचे एक वर्षाचे आर्थिक नियोजन झाले असल्याने मी पूर्ण वेळ साधना करू लागलो.
२. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी रामनाथी येथील आश्रमात जाण्याची संधी मिळणे अन् स्वतःमधील दोषांची जाणीव होऊन ‘अध्यात्मात साधना करत असल्याचे ढोंग करता येत नाही’, याची जाणीव होणे
सप्टेंबर २०१७ मध्ये उत्तरदायी साधकांनी मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी एक मास गोव्यातील रामनाथी येथील आश्रमात पाठवले. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना माझ्या लक्षात आले, ‘व्यवहारात जसे पैशाचे सोंग आणता येत नाही, तसे अध्यात्मात साधना करत असल्याचे ढोंग करता येत नाही.’ माझ्यात ‘दिखाऊपणा करणे, स्वकौतुकाची अपेक्षा करणे, कर्तेपणा घेणे’, हे स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू आहेत’, हे प्रक्रियेत मार्गदर्शन करणार्या सहसाधकांनी लक्षात आणून दिले. यासमवेतच आश्रमातील वास्तव्याच्या कालावधीत मनात अचानक अयोग्य विचार येत असल्याचे माझ्या लक्षात आले आणि ‘तो आध्यात्मिक त्रासाचा भाग होता’, हे मला नंतर कळले.
३. आश्रमातील संतांचा सत्संग लाभणे आणि पूर्ण वेळ साधक होणार असल्याचे सांगितल्यावर त्यांनी सूचक मौन बाळगल्याने काळजी वाटणे
स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या कालावधीत मला संतांचा सत्संग लाभला. या सत्संगात ‘माझ्या मनातील नेव्हीचे (पूर्वी मी मर्चंट नेव्हीत ‘मरीन इंजिनिअर’ या पदावर कार्यरत होतो.) विचार गेल्याविना माझ्यात खरे साधकत्व निर्माण होणार नाही’, हे देवाने लक्षात आणून दिले. सत्संगात संतांनी सांगितले, ‘‘दोष असलेला घरी असणार आणि दोष गेले की, चालला हिमालयात ! (म्हणजे दोष आणि अहं गेल्यावर त्याची प्रगती होणार.)’’ या सत्संगात माझी ओळख करून देतांना मी ‘पूर्ण वेळ साधना करण्याचा विचार करत आहे’, असे सांगितल्यावर संत निर्विकार झाले होते. त्यांनी सूचक मौन धारण केल्याने माझ्या मनाला चुटपूट लागून मनात काळजी निर्माण झाली. खरे तर ‘देवाने त्या एका क्षणात मला अंतर्मुख होण्यास उद्युक्त करून ही स्वभावदोष आणि अहं यांची प्रक्रियाच घडवून आणली होती’, हे कालांतराने माझ्या लक्षात आले.
४. व्यष्टी साधनेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आध्यात्मिक त्रासात वाढ होणे, एका सत्संगात पुष्कळ राग आल्याने तेथून निघून जाणे आणि कालांतराने स्वतःमधील दोषाची जाणीव होणे
काही घरगुती अडचणींमुळे मी रामनाथी आश्रमातून परत मिरजेला घरी आलो आणि सेवेला आरंभ केला. मी सुराज्य अभियान, ग्रामीण भागातील प्रसार सेवा, हिंदु जनजागृती समितीचे उपक्रम आणि अन्य अनेक सेवांमध्ये सहभागी होत होतो; परंतु माझे व्यष्टी साधनेकडे दुर्लक्ष होत गेले. फेब्रुवारी २०१८ मध्ये माझ्या आध्यात्मिक त्रासात वाढ झाली. त्या वेळी झालेल्या एका सत्संगात उत्तरदायी साधकांनी मला माझ्या व्यष्टी साधनेच्या संदर्भात विचारले. तेव्हा मी समाधानकारक उत्तर देऊ शकलो नाही. मला पुष्कळ राग येऊन मी तेथून निघून गेलो. काही काळाने गुरुमाऊलींनी एका प्रसंगाच्या माध्यमातून मला माझ्यातील दोषांची जाणीव करून दिली.
५. आर्थिक नियोजनाच्या अभावामुळे पुन्हा नोकरी शोधणे; परंतु काही कारणास्तव नोकरीवर जाऊ न शकणे
आर्थिक नियोजनाच्या अभावामुळे एप्रिल २०१८ नंतर मी पुन्हा नोकरी शोधण्यास प्रारंभ केला. इतर पर्याय उपलब्ध नसल्याने मी परत जहाजावर जाण्याचे ठरवले. त्याविषयी मी एका संतांना विचारले. त्यांनी ‘स्वतःचा निर्णय स्वतःच घ्या आणि जिथे असाल, तिथे साधना आणि नामजपादी उपाय करत रहा’, असे सांगितले. सर्व कार्यालयीन प्रक्रिया आणि औपचारिकता पूर्ण होऊनही काही कारणामुळे मी नोकरीसाठी जहाजावर जाऊ शकलो नाही. नातेवाईक आणि सहकारी अर्थार्जन करण्यासाठी माझ्यावर दबाव आणत होते.
६. आईसमवेत ‘अल्ट्राव्हायोलेट हिलींग थेरपी’द्वारे उपाय करणार्या एका व्यक्तीकडे गेल्यावर आलेली गुरुतत्त्वाची प्रचीती !
याच कालावधीत नाईलाजाने मी आईसमवेत ‘अल्ट्रावॉयलेट हिलींग थेरपी’द्वारे उपाय करणार्या सांगली येथील सौ. मंजुबेन शहा यांच्या घरी गेलो होतो. उपाय केल्यानंतर सौ. शहा यांनी मला सांगितले, ‘‘तुम्ही तुमच्या गुरूंच्या बंधनात बद्ध असल्याने नोकरी करू शकत नाही आणि हे बंधन तुम्ही स्वतः स्वीकारले आहे. तुम्हाला तुमच्या गुरूंनी कोणतेही बंधन घातलेले नाही. काही कालावधी गेल्यावर तुम्ही योग्य वेळी नोकरी करणार आहात.’’ त्या वेळी मी सौ. शहा यांना सांगितले, ‘‘मी नृसिंहवाडी येथील पुजारी असल्याने जन्मतःच गुरुसेवक आहे. त्यामुळे मी स्वाभाविकच गुरूंच्या बंधनात असणार.’’ त्या वेळी त्या मला म्हणाल्या, ‘‘तुम्ही नृसिंहवाडीच्या गुरूंच्या बंधनात नाही.’’ त्या वेळी मला गुरुतत्त्वाची प्रचीती आली. आम्ही त्यांच्याकडून निघतांना त्यांनी माझ्या आईला सांगितले, ‘‘तुमचा मुलगा एकदम वेगळा आहे.’’
७. ‘साधनेत अधोगती होत आहे’, असे वाटून नैराश्य येणे
या कालावधीत पू. जोशीआजोबांनी मला २ – ३ वेळा ‘‘तू जहाजावर जाऊ नकोस. जवळपास एखादी नोकरी कर’’, असे सांगितले होते; परंतु इतर पर्याय उपलब्ध नसल्याने मी जहाजावर जाण्याचा निर्णय घेतला होता. मी जुलै २०१८ च्या मिरज येथील गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या सेवेत सहभागी झालो होतो. तेव्हा ‘गुरुपौर्णिमा झाल्यावर लगेचच मुंबईला जाऊया’, असा विचार माझ्या मनात होता. ‘या कालावधीत साधनेत माझी अधोगती होत आहे’, असे वाटून मला नैराश्यही आले होते.
८. समुद्री प्रशिक्षण देणार्या एका आस्थापनात ‘प्रशिक्षक’ पदावर नेमणूक होणे, त्या वेळी रामनाथी आश्रमातून प्रसाद येणे आणि प.पू. गुरुदेवांच्या निरपेक्ष प्रेमाची अनुभूती येणे
१९.७.२०१८ या दिवशी नवीन मुंबई येथील समुद्री प्रशिक्षण देणार्या एका आस्थापनात मुलाखत होऊन १.८.२०१८ पासून माझी ‘प्रशिक्षक’ पदावर थेट नेमणूक झाली. पू. जोशीआजोबांना हे सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेचहे घडून आले आहे.’’ एप्रिल २०१७ ते जुलै २०१८ या कालावधीत पूर्ण वेळ साधना करत असतांना मला रामनाथी आश्रमातून कधीच प्रसाद आला नव्हता; परंतु १.८.२०१८ या दिवशी मी नवी मुंबईत नोकरी करू लागल्यावर रामनाथी आश्रमातून माझ्यासाठी प्रसाद आला. यावरून प.पू. गुरुमाऊलींचे माझ्यावर किती निरपेक्ष प्रेम आहे !’, हे मला शिकायला मिळाले.
९. ‘केवळ प.पू. गुरुदेवांच्या कृपेनेच स्वभावदोष आणि अहं नष्ट होऊ शकतो’, याची अंतर्मनात जाणीव करून देणार्या गुरुदेवांप्रती अपार कृतज्ञता वाटणे
‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याची प्रक्रिया करत रहाणे, हे साधकाचे अंतिम ध्येय असले, तरीही केवळ प.पू. गुरुदेवांच्या कृपेनेच स्वभावदोष आणि अहं नष्ट होऊ शकतो’, ही जाणीव प.पू. गुरुदेवांच्या कृपेने माझ्या अंतर्मनात निर्माण झाली आहे. माझ्यासारख्या एका शूद्र जिवावर पदोपदी अनंत कोटी कृपा करणार्या करुणासागर, कृपावत्सल आणि साक्षात् श्रीमत् नारायणस्वरूप गुरुमाऊलींच्या चरणी अनंतकोटी कृतज्ञता ! ‘साधनेच्या या प्रवासात माझ्यासारख्या अज्ञानी बालकावर आपली अखंड आणि अनन्य कृपा राहो’, ही परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांच्या कोमल चरणी प्रार्थना करतो.’
– श्री गुरुचरणांचा दास,
श्री. गिरीश शरद पुजारी, मिरज, जिल्हा सांगली. (२७.८.२०१८)
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |