सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नावाचा वापर करून समाजाची दिशाभूल करणार्‍या भोंदूंपासून सावध रहा !

सनातनच्या साधकांसाठी महत्त्वाची सूचना आणि ‘सनातन प्रभात’च्या वाचकांना विनंती !

सनातन संस्थेचे कार्य पूर्वी उत्तर भारतातील काही ठिकाणी चालू होते, अशा भागांत सनातन संस्थेचे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे नाव वापरून काही जण ‘सनातन प्रभात’चे वाचक, तसेच सनातनचे साधक यांची दिशाभूल करत असल्याचे लक्षात आले आहे. याची काही उदाहरण पुढे दिली आहेत.

उदाहरण १. ‘परात्पर गुुरु डॉ. आठवले मला आतून सुचवतात’, असे खोटे सांगून –

अ. साधक आणि वाचक यांना विविध मंत्रजप किंवा नामजप करण्यास सांगतात.

आ. आध्यात्मिक उपायांसाठी विविध उत्पादने बनवून ती साधक आणि वाचक यांना विकतात.

इ. साधक आणि वाचक यांना भावी आपत्काळाच्या संदर्भातही स्वतःच्या मनाप्रमाणे कृती सांगतात.

ई. साधक आणि वाचक यांचा मनाप्रमाणे व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप बनवून त्याद्वारेही वरील कृती करतात.

अशा विविध कृती करत असल्याचे लक्षात आले आहे.

(‘सनातन प्रभात’चे वाचक आणि सनातन संस्थेचे साधक यांनी अशा व्यक्तींपासून सावध रहावे. परात्पर गुरु डॉ. आठवले हे कोणालाही आतून सुचवून वरील प्रकारच्या कृती स्वतः करा किंवा इतरांना करण्यास सांगा, असे सांगत नाहीत. साधक आणि समाज यांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन वेळोवेळी ‘सनातन प्रभात’मध्ये, तसेच सनातनच्या विविध ग्रंथांमध्ये छापून येते. तरी ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि सनातनचे साधक यांनी ‘सनातन प्रभात’ आणि सनातनचे ग्रंथ यांत प्रसिद्ध झालेले मार्गदर्शन प्रमाण मानून, तसेच सनातनच्या धर्मप्रसारक संतांनी केलेल्या मार्गदर्शनानुसारच साधना आणि सेवा करावी.)

उदाहरण २. अशाच एका ठिकाणी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लागू झालेल्या दळणवळणबंदीच्या काळात एका भोंदूने एक साप्ताहिक सत्संग आरंभ केला. या परिसरात काही वर्षांपूर्वी सनातनचा सत्संग चालत होता. त्या वेळी सनातनच्या सत्संगात येणार्‍या जिज्ञासूंना या नवीन सत्संगासाठी बोलावण्यात आले. या सत्संगातील एका जिज्ञासूने कुटुंबातील एका सदस्याची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितल्यावर त्या भोंदूने उपाय म्हणून एक लॉकेट त्या जिज्ञासूला दिले आणि त्यासोबत एक मंत्रही दिला, तसेच आता त्यांना बरे वाटेल, असेही आश्‍वस्त केले. यासाठी त्या भोंदूने जिज्ञासूंकडून १५०० रुपये घेतले.

(सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनी अध्यात्माचे ज्ञान विनामूल्य दिले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांचीच शिकवण प्रत्यक्षात आणत सनातनचे कार्य विनामूल्य आरंभले आणि अद्यापही विनामूल्यच चालू आहे. सनातनचे सत्संग, प्रवचने, बालसंस्कारवर्ग, प्रदर्शने आदी सर्व अध्यात्मप्रसाराचे कार्य हे विनामूल्य चालते. सनातनचा साधक होणे, सत्संगात सहभागी होणे, कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन वा आध्यात्मिक उपाय सांगणे, सनातनच्या आश्रमांना भेट देणे आदींसाठीही कोणत्याही स्वरूपाचे मूल्य आकारले जात नाही. तरी ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि सनातनचे साधक यांनी अशा भोंदूंपासून सावध रहावे.)

उदाहरण ३. या सत्संगातील अन्य एका प्रसंगात भावी आपत्काळाविषयी अयोग्य माहिती दिल्यामुळे एका जिज्ञासूला सनातन संस्थेच्या आपत्काळाच्या संदर्भातील प्रकाशनांविषयी विकल्प निर्माण झाले.

(अशा प्रकारे सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नावाचा किंवा शिकवणीचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याचे लक्षात आल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करता यावी, यासाठी त्याची माहिती खालील पत्त्यावर आम्हाला त्वरित कळवा.)

– श्री. वीरेंद्र मराठे, विश्‍वस्त, सनातन संस्था.

नाम आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पता : sanatan.sanstha2025@gmail.com

पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१